Translate

Wednesday, August 13, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ५ -

नाम-

५) नामाचे साधन हे ‘फास्ट’ गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे नेऊन पोचवते.

~~ श्रीराम. जेव्हा सद्गुरू एखादे साधन सुचवतात, तेव्हा त्या साधनाचा उद्देश शिष्याला आत्मज्ञानापर्यंत पोहोचवण्याचा असतो ह्यात शंका नाही. ते साधन गुरुमुखातून आलेले असल्याने त्यात गुरूंची सर्व शक्ती सामावलेली असते. परंतु, शिष्याने ते साधन कोणताही विकल्प मनात न आणता प्रसन्न मनाने उच्च ध्येयाने प्रेरित होऊन अखंडितपणे करायचे असते. त्याला काल-मर्यादा घालू नये. जसे, पुष्कळ लोक नाम मिळाल्यानंतर ठराविक दिवसांत आपल्याला अखंड समाधान प्राप्त व्हावे आणि साधनातले जे अनुभवांचे मुक्काम असतात तेही प्राप्त व्हावेत अशी इच्छा धरतात. अर्थातच हे सर्वांना प्राप्त न झाल्याने त्यांच्या मनात साधनाविषयी विकल्प येण्यास सुरुवात होते आणि विकल्पाला खत-पाणी घातले की विषाचे रोप फोफावते आणि साधकदशा उध्वस्त होते. हे असे न व्हावे.

ब्रह्मानंद महाराजांविषयी श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, त्यांनी स्वतःपेक्षा जास्त प्रेम नामावर केले त्यामुळेच ते तरले! “नामापरते तत्व नाही रे अन्यथा” ही ज्ञानदेव उक्ती ते अक्षरशः जगले. अशांवर सद्गुरू कृपा होते हे खरेच. परंतु, नाम घेऊ लागल्यावर काहीतरी अनुभव यावेत अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते. त्या विषयी महाराज सांगतात, नामस्मरण हे साधन सूक्ष्मातले आहे. स्थूलामध्ये त्याचे अनुभव पाहणे तितकेसे बरोबर नाही. आपले सूक्ष्म असे जे अंतःकरण त्यात काय बदल झाला आहे हे पाहणे जास्त महत्त्वाचे. नामाने जर ध्यानापर्यंत प्रगती झाली तर रंग दिसणे, सुगंध येणे किंवा ज्योत दिसणे असे अनुभव येऊही शकतील; परंतु त्यांचे तितकेसे महत्त्व नाही.


एकदा महाराजांकडे एक देशाच्या उत्तर भागातील साधू आले होते. त्यांनी महाराजांना विचारले, मला साधन सुरु केल्यावर काही वर्षांनी ज्योतीचे दर्शन होत असे; पण आता ते होत नाही. म्हणजे मी मागे आलो की काय? महाराजांनी विचारले, साधन चांगले चालू आहे ना? ते म्हणाले, हो उत्तम चालू आहे! त्यावर महाराज म्हणाले, ही स्थूलातली दर्शने ही मार्गावरील स्टेशने आहेत. तुम्ही ह्याच्या पुढे गेला आहात; मागे नाही! भगवंत जसा जसा समीप भासू लागतो, तसतशी ही अनुभवांच्या मागे धावण्याची उर्मीच कमी होते. राहतो तो फक्त आनंद, शांती आणि समाधान! या स्थितीपर्यंत साधकाने पोहचायचे आहे. ह्याला सद्गुरू कृपा आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवून अखंड साधन हाच पर्याय आहे! नामात राहावे; अधिकाधिक नाम घ्यावेसे वाटावे, यापलीकडे परमार्थ नाही! 

1 comment: