Translate

Thursday, August 21, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ७ -

नाम -

७) नाम उपाधिरहित असल्यामुळे आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. 

~~ श्रीराम. "नाम घेणे" आणि "नाम येणे" यात थोडासा फरक आहे. सुरुवातीला जेव्हा साधक सदगुरूंकडून नामानुग्रह प्राप्त करतो, तेव्हा तो एक नियम पाळायचा म्हणून नाम घेतो. हे महत्त्वाचेच आहे यात शंका नाही. असे नियमाचे नाम घेता घेताच हळू हळू साधकाला सद्गुरु कृपेने नामात रमण्याची कला अवगत होते. मग नाम घ्यावे लागत नाही तर ते आपोआप ओठी येते; किंबहुना नामाला बसण्यास वेळ झाला नाही तर जीवाची तळमळ होते. हे नामाचे प्रेम थोडे तरी उत्पन्न झाल्याने होते यात शंका नाही.  परंतु, खरेखुरे नामाचे प्रेम येण्यास "देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी" हे समर्थ-वचन सदा नजरेसमोर असावे. 

ही देहबुद्धि सांडणे म्हणजेच उपाधिरहित होणे होय. उपनिषदात साधन-चतुष्टय वर्णिले आहे. आत्मानात्म विवेक, वैराग्य, तितिक्षा आणि नीती या भक्कम आधारावर हे चतुष्टय उभे आहे. हे जोवर मनापासून आत्मसात केले जात नाही, तोवर प्रेम येण्यास उशीर लागेल असे पूज्य बाबा बेलसरे देखील अनेक ठिकाणी सांगतात. हे अंगी बाणण्यास-मुरण्यास सुरुवात होणे ही उपाधिरहित होण्याकडे वाटचाल आहे असे समजण्यास हरकत नाही. अनेक लोक ह्या देखील उपाधीच आहेत असा पक्ष मांडताना दिसतात. परंतु, इथे साधकाने एक लक्षात घेतले पाहिजे की ह्या उपाधी भगवंताकडे नेणाऱ्या आहेत आणि इतर देहबुद्धीला धरून असणाऱ्या उपाधी आपल्याला अंतर्यामी अखंड विराजमान असलेल्या आत्मस्वरूपापासून दूर नेणाऱ्या अहेत. तेव्हा त्याची गल्लत साधकाने करू नये. 

मान, मरातब, पैसा, सौंदर्य, मोठेपणा व यांसारख्या गोष्टींची उपाधी दूर दूर हटवल्या शिवाय नाम अंगी बिंबणे शक्य नाही. मग या उपाधी असताना नाम घेऊच नये का? तर नाही; उलट जास्त जोमाने, नेटाने आणि नियमाने नाम घेण्याची गरज आहे. त्या नामानेच उपाधी आपण किती घट्ट धरून ठेवल्या आहेत याची जाणीव हळू हळू निर्माण होऊ लागेल. त्या जाणीवेतून "माझ्या सद्गुरूंनी त्यांची सर्व अध्यात्म-शक्ती घालून दिलेले नामच मला तारेल" ही भावना दृढ होऊ लागेल. फक्त आपल्याला उपाधीकडून निरुपाधिक अवस्थेकडे जायचे आहे हे भान मात्र सतत ठेवले पाहिजे. जेणेकरून नामाचे इतके प्रेम निर्माण होईल की नामानुसंधानाशिवाय जगणेच अशक्य होइल. तेव्हा असे होवो आणि माझे नाम निरुपाधिक अवस्थेकडे जावो ही प्रार्थना सद्गुरुंजवळ करणे आणि शक्य तितके नामात राहणे आवश्यक आहे. 


महाराज म्हणत, इतके प्रेमाने नाम घ्या की परमात्मा आपल्या घरात नाचला पाहिजे! ते प्रेम तुम्हा-आम्हाला महाराजांच्या कृपेने प्राप्त होवो ही त्यांच्याच चरणी प्रार्थना! 

No comments:

Post a Comment