||श्रीराम समर्थ||
नाम-
नाम-
२) ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमंताच्या पोटी जन्माला आलेल्या
मुलाला नोकरीचे कष्ट माहीत नसतात, त्याप्रमाणे ज्यांना नामापरते सत्य नाही ही
भावना आहे त्यांना साधनाचे कष्ट नाहीत! पण एखाद्या गरीब यात्रेकरूजवळ आगगाडीत बसून
जाण्याइतके पैसे नसले तर तो पायी यात्रा करतो आणि उशिराने का होईना पण तीर्थाला
पोचतो, तसे आज आपण नाम ‘घ्यायला’ सुरुवात करू, म्हणजे आज ना उद्या आपण नामात रंगून
जाऊ.
~~ श्रीराम. या बोधवचनात
देखील “नाम” हे साधन कसे सोपे आहे हे महाराजांनी सांगितले आहे. म्हणतात ना-
राजयाची कांता काय भीक मागे? हे जसे खरे, तसेच जे मनापासून नामाला चिकटलेले लोक
आहेत, त्यांना साधनेचे काय कष्ट? त्यातही सद्गुरू उपदिष्ट नाम असेल तर सद्गुरूंची
सर्व शक्ती त्यात सामावलेली असल्यामुळे सही सलामत साधक मुक्कामाला पोहोचतो. एके
ठिकाणी महाराजांनी एक छान उदाहरण दिले आहे- खेडेगावात बायका आठवड्याच्या बाजाराला
जातात. कडेवर मूल असतं, त्याला ऊन लागू नये म्हणून पदराने मुलाचं डोकं झाकलेलं
असतं आणि स्वतःच्या डोक्यावर टोपली असते. सगळे कष्ट त्या आईला. ते मूल निवांत
तिच्या कडेवर बसून असतं; त्याला काहीच कष्ट नाहीत. तसं, जो सद्गुरूंनी दिलेल्या
नामात रंगून जातो, त्याला सद्गुरू असे कडेवर बसवून भवसागरातून पार करतात!
मागच्या वचनात सांगितल्या
प्रमाणे नाम हे सहज सुलभ साधन असूनही अगम्य अशा विकल्पामुळे साधक उद्या घेऊ, हे
एवढे काम झाल्यावर सुरुवात करू याप्रमाणे पुढे ढकलीत असतो. इतर साधनांमध्ये लवकर
प्रगती होईल का या दुराशेने सद्गुरूंनी सांगितलेले सोडून इतर करण्याच्या भरीला
पडतो. पण जो खरा सद्गुरू-निष्ठ आहे तो सद्गुरूंवर सर्व काही सोपवून त्यांनी
सांगितले तसे, त्यांना आवडते म्हणून आणि स्वतःच्या उद्धाराच्या कळकळीने नाम जपतो!
असा साधक नामात रंगून जातो आणि नाम हा सद्गुरुंप्रमाणे त्याचाही प्राण बनतो यात
शंका नाही!
No comments:
Post a Comment