नाम --
३) आपण नामस्मरण ‘करतो’, पण ते कसे?
एका माणसाने रखेलीचे प्रेम आपल्यावर राहावे म्हणून गुरुचरित्राचा सप्ताह केला,
दुसऱ्या एकाने पुष्य नक्षत्रावर सोने विकत घेऊन आपल्या ठेवलेल्या बाईला दिले; तसे,
आपण नाम घेतो, पण त्याचा उपयोग विकारांचे दास्यत्व वाढविण्यासाठी आपण करतो!
~~ श्रीराम. संत सत्पुरुष समाजाला दोन तऱ्हेने मार्गदर्शन करतात. एक रीत समजावून सांगून
पटवून देण्याची असते आणि दुसरी रीत स्पष्ट शब्दात कानउघाडणी करण्याची असते. तशी थोडीशी
कान उघाडणी महाराजांनी या वचनात केलेली आढळते. या प्रकारची ‘स्पष्ट शब्दात काय करू
नये’ हे सांगणारी महाराजांची वचने तशी कमी आहेत; त्यामुळेच या वचनाचे महत्त्व
जास्त! पुष्कळ लोक महाराजांना आम्ही नाम घेऊन देखील आम्हाला अजून शांती-समाधानाचा
अनुभव कसा येत नाही असे विचारत. तेव्हाच महाराजांनी अशा शब्दात त्यांना पटवून दिले
असावे.
नामस्मरणाचा हेतू हा अतिशय शुद्ध, पवित्र असावा आणि असा शुद्ध हेतू म्हणजे
अधिकाधिक नाम घेण्याची इच्छा हा होय! मना वासना वासुदेवी वसू दे! ज्या काही इच्छा,
आकांक्षा, वासना असतील त्या सर्वच्या सर्व भगवंताच्या / सद्गुरूच्या चरणी
वाहिल्याशिवाय साधनेला धार येणार नाही असे पूज्य बाबा देखील अनेक ठिकाणी आवर्जून
सांगतात. पुढे एका वचनात महाराज हेतूला अतिशय महत्त्व आहे हे सांगतात. कोणतेही
कर्म असो, जोवर आपण कर्मबंधनात अडकलेलो आहोत, तोवर प्रयत्न हा हवाच! हा प्रयत्न
सत्कारणी लागणे म्हणजेच विकारांच्या दास्यातून मुक्तता होणे हा आहे. महाराज म्हणत,
विकार असू देत. पण तुम्ही त्यांच्यावर हुकुमत गाजवावी, त्यांनी तुमच्यावर नव्हे!
हे घडण्यासाठी अर्थात नामस्मरण हाच राजमार्ग आहे. नामसाधनेने हळू हळू वासना विरहित
अवस्थेकडे आपली वाटचाल होईल हे नक्की; परंतु, हा हेतू निदान मनामध्ये अविचल असावा.
तर त्याचे पर्यवसान वृत्ती सांभाळून नाम घेण्यात होईल!
No comments:
Post a Comment