Translate

Sunday, August 3, 2014

प. पू. बाबा बेलसरे यांनी सांगितलेल्या साधनी माणसाच्या सहा खुणा --


१) स्वस्वरूपी भगवंताचे साक्षात दर्शन हे साधनी माणसाचे जीवन-ध्येय असते. बाहेरचे जग संपूर्ण खरे नाहीहे पटले की साधनी माणसाच्या जीवनात क्रांती सुरु होते. तो आत वळायला तयार होतो. समाधानाचे स्थान आतमध्ये आहे याची जाणीव झाली की परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. म्हणून जी परिस्थिती आहेतिच्याबद्दल नाराजी न वाटता तक्रार करणे थांबणे ही साधनी माणसाची पहिली खूण आहे. 

२) दृश्याकार झालेले मन बदलून आत्माकार बनवायचे आहे. ते साधण्यास आपलेपणाने आत्मस्वरूपाचे सतत स्मरण व चिंतन करावे लागते. साधक हे मनाचे रूपांतर क्रमाक्रमाने घडवून आणतात. म्हणून आत्म्याचे स्मरण- म्हणजेच आत्म्याच्या अस्तित्वाचे भान अखंड सांभाळण्याचा अभ्यास ही साधनी माणसाची दुसरी खूण आहे. 

३) आत्म्याच्या स्मरणाची ज्योत सतत पेटती ठेवावी लागते. जगाच्या दडपणाखाली ती सारखी पेटती ठेवणे ही सामान्य माणसाच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. म्हणून उन्मनी भोगणा-या संताकडून अनुग्रहरूपाने ते स्मरण स्वीकारावे लागते. त्या जिवंत स्मरणामध्ये आपला मी अधिकाधिक विरघळवणे ही साधनी माणसाची तिसरी खूण आहे.

४) प्रपंचामध्ये आईबापभाऊबहिणनवराबायकोमुलेबाळे या व्यक्ती एकत्र येतात. त्यांचे काही कर्म समान असले तरी काही कर्म प्रत्येकास स्वतंत्रपणे भोगावे लागते. ते भोगताना अनेक आघात होतात. अशा प्रसंगी भगवंताला किंवा सद्गुरूला दोष न देता मन डळमळू न देणे आणि पूर्ववत नामस्मरण चालणे ही साधनी माणसाची चौथी खूण आहे.

५) श्रीसद्गुरुकडून मिळालेले स्मरण यथासांग चालले म्हणजे मनाला सूक्ष्मता येऊ लागते. त्याने मनाचे समाधान वर्धमान होते. पण माणसाचे विकार संपलेले नसतात. सूक्ष्म मन जास्त संवेदनशील असल्यानी त्या विकारांचे उद्दीपन लवकर होते. एखाद्या क्षुल्लक प्रसंगी कामक्रोधद्वेषपरनिंदाकाळजीआसक्ती इत्यादी दोष मनाला व्यापतात. प्रत्यक्ष कृती घडली नाही तरी या दोषांचा आवेग मनाची सूक्ष्मता घालवून टाकतो. त्यामुळे अनेक दिवसांचे नामस्मरण करून न केल्यासारखे होते. या मार्गात मिळवणे कठीण नाहीपण ते टिकवणे सोपे नसते. म्हणून मनावर सारखे लक्ष ठेवावे लागते. अखंड सावधानता ही साधनी माणसाची पाचवी खूण आहे.

६) साधन करणा-या सामान्य माणसाची विचारसरणी पुढील प्रकारची असते. तो म्हणतो, "श्रीसद्गुरूंनी मला नाम दिले आहे. ते मी मनापासून घेतो. मला आत्मदर्शनापर्यंत नेण्याची जबाबदारी त्यांची आहे. पण माझी साधना बरोबर चालली आहेयाची खूण मला पाहिजे." ही विचारसरणी बदलून साधनी माणसाने असा विचार करावा की, "हा जन्म मी साधनाला देऊन टाकला आहे. आता माघार घेण्याचा प्रश्नच नाही. मी अनंत काळ प्रतीक्षा करीन. मग अडचण कोठे राहिली?" निष्कामवृत्तीने साधनाला वाहून घेणे ही साधनी माणसाची सहावी खूण आहे.

2 comments:

  1. श्रीराम जयराम जयजयराम

    ReplyDelete
  2. ॥श्रीराम जयराम जय जय राम॥

    ReplyDelete