Translate

Tuesday, August 12, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ४ -

नाम --

४) भगवंताचे स्मरण करावे म्हणजे प्रपंच सोपा जातो.

~~ श्रीराम. हे बोधवचन म्हणजे प्रापंचिक लोकांसाठी आशेचा किरण आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पाहतोच आहोत की जग कसे चालले आहे आणि प्रापंचिक मनुष्य निराशेच्या गर्तेत अडकत चाललेला आहे. श्री महाराज अनेक ठिकाणी सांगतात की पुढे काळ फार कठीण येणार आहे. अक्षरशः माणूस माणसाला खायला उठेल. त्या वेळी सामान्य प्रापंचिकाला जर कुणी तारेल तर ते फक्त भगवंताचे नाम तारेल, कारण नामातच भगवंताचे स्मरण साठवलेले आहे. भगवंताचे स्मरण हा सर्व भवरोगांवर रामबाण इलाज आहे. महाराज एके ठिकाणी सांगतात, परमार्थ हा आपला मुख्य धंदा हवा आणि प्रपंच हा जोडधंदा. आपले उलट झाले आहे! आपण परमार्थ करताना प्रपंचाचा विचार करतो. त्याउलट सत्पुरुष आपल्याला प्रपंच करताना परमार्थाचा – भगवंताचा विचार करण्यास प्रवृत्त करतात.


सर्व प्रापंचिक संतांचे आयुष्य आपण पाहिले तर आपल्याला असे दिसेल की प्रापंचिक दृष्ट्या त्यांचे आयुष्य अजिबात डोळ्यात भरण्या सारखे नव्हते. तुकोबा काय, एकनाथ महाराज काय किंवा आपले महाराज काय! प्रपंचातली दुःखे त्या सर्वांनी सहज पचवली; कारण त्यांच्या अंतरंगात भगवंताचे अखंड अनुसंधान होते. एवढेच नाही तर स्वतः अनुसंधानात राहून हजारो लोकांना त्यांनी प्रपंचात राहून परमार्थात स्थिर होण्याचा मार्ग दाखवला! कोट्यानुकोटी उद्धरिले लोक, रामनाम एक बोधुनिया! पण अनेक लोक म्हणतात, ते मोठे संत, हे आपल्याला कसे जमावे? असा निराशावादी दृष्टीकोन परमार्थात कधीच उपयोगी पडायचा नाही. संत हे आपले आदर्श आहेत. त्या आदर्शाप्रत आपल्याला पोहोचायचे आहे. आणि त्यासाठी उत्तम, अनुभव-समृद्ध आणि गुरुप्रचीतीने युक्त असा मार्ग आपल्याला मिळालेला आहे. त्या मार्गावर न थकता चालत राहणे आणि अखंड सद्गुरूंचे स्मरण ठेवून त्यांची आपल्याला या मार्गावर ठेवण्याची प्रार्थना करणे हीच जीवन सार्थक बनवण्याची खूण आहे! 

No comments:

Post a Comment