नाम –
८) इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते
असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल, ते कायमचे साधेल, कारण नामाने
मुळापासून सुधारणा होते.
~~ श्रीराम. एखादा मनुष्य परमार्थाला लागला म्हणजे नेमके काय? तर दृश्य जगाचे
मिथ्यापण कोणत्या ना कोणत्या कारणाने मनावर ठसल्यामुळे तो अदृश्य ईश्वराप्रत चालला
किंवा जाऊ घातला. किंवा जर गतजन्माच्या पुण्यायीने सद्गुरू भेट आयुष्यात लवकर झाली
तर त्यांच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास ठेवून तो त्याची कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने
करू लागला की तो परमार्थी बनला. ह्या परमार्थ मार्गावर टिकून राहण्यासाठी सद्गुरू
साधन सांगतात. ज्या ज्या माणसाची जशी जशी अध्यात्मिक तयारी असेल त्याप्रमाणे गुरु
मार्गदर्शन करतात. परंतु, आत्ताच्या यंत्रयुगात ईश्वर-सन्मुख बनण्यासाठी सर्वोत्तम
साधन श्रीमहाराजांनी सांगून ठेवले आहे आणि ते म्हणजे भगवंताचे नाम!
योग / ध्यान इत्यादी साधने देखील ईश्वर-सन्मुख बनवतात ह्यात शंका नाही; परंतु,
या मार्गांमध्ये मनुष्याला अतिशय मर्यादाशील जीवन जगणे आवश्यक असते. म्हणजे या इतर
साधनांची सुरुवात आधी स्वतःला सुधारण्यात आहे आणि हे किती कठीण काम आहे हे आपण
जाणतोच आणि योग वगैरे साधने सुरु केल्यावर घसरण्याची शक्यता जास्त; म्हणजेच ह्यात
चढ-उतार जास्त आहेत.
नामाचे महत्त्व कशात असेल तर नामामुळे हे “ईश्वर-सन्मुख होण्यास आवश्यक असलेले
बदल” सहजच घडतात आणि साधकाने जर मनापासून सद्गुरू-निष्ठेने नाम जपले तर हे
Positive Changes कायमचे असतात. मनुष्याचे अंतरंग सुधारण्याची जबरदस्त ताकद
सद्गुरूंनी दिलेल्या नामात आहे. किंबहुना महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे की
आपल्या अवगुणांची जाणीव होणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि ही जाणीव सतत
नियमाने नाम घेत गेल्याने होते. त्यामुळे नामसाधक साहजिकच सद्गुरुकडे आपले अंतरंग
सुधारण्याची वरचेवर प्रार्थना करतो. सद्गुरू-कृपेने आणि नामसाधनेने हे सहजच घडून
येते. परंतु, साधकाने आत्यंतिक निष्ठेने नामात राहिले मात्र पाहिजे.
एक सुरेख गोष्ट महाराज सांगत. नामसाधना ही आईसारखी आहे. जर पोर रडवेले, घाणीत
बरबटलेले असेल तरी आई त्याला जवळ घेते, कुरवाळते, अंघोळ घालून स्वच्छ करते. मात्र
योगसाधना बापासारखी आहे. ती म्हणेल, आधी स्वच्छ होऊन ये! तेव्हा असे हे नाम जर सतत
घेतले – घेण्याचा प्रयत्न केला तर सद्गुरूंना आवडेल ह्यात शंका नाही. पूज्य बाबा
बेलसरे म्हणत, “प्रेम असो वा नसो, जो कोणी मनापासून नाम घेईल, त्याला महाराज
पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतील!” यापरते दैव ते कोणते?
No comments:
Post a Comment