Translate

Friday, August 8, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन १-

                                ||श्रीराम समर्थ||
नाम- 

१) नामाचे महत्त्व आपल्यासारख्याला कळणे फार कठीण आहे. आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत आणि नाम तर निरुपाधिक आहे. म्हणून संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.

~~ जन्मभर नामाचे महत्त्व सांगणारे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे साक्षात नामावातार होत. असे संत महात्मा हे जन्मापासून तयार असतात, देहबुद्धीच्या पलीकडे असतात. परंतु आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी ते आत्मज्ञानाचा मार्ग खुला करून देतात. नामसाधना हा एक असा अतिशय भरवशाचा मार्ग आहे. असे असूनही आपल्याला नामाचे महत्त्व कळत नाही. पण महाराज म्हणतात हे साहजिकच आहे. कारण नाम हे सूक्ष्मातले – देहबुद्धीच्या पलीकडचे आहे. प्रत्यक्ष आदिबीज ओंकार म्हणजेच नाम. तेव्हा रोजच्या जीवनाच्या आटाआटीत गुंतलेल्या जीवांना महाराजांसारख्या संताकडून समजून घेतल्याशिवाय नामाचे महत्त्व समजत नाही. भारतवर्षातल्या अनेक संतांनी नामाचे महत्त्व गायले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून तुकोबांपर्यंत सर्वांनी भगवंत दर्शनाच्या साधनांमध्ये नाम हे आद्य मानले आहे. याचे कारण म्हणजे नामाला कसलीही उपाधी नाही. लहान, थोर, श्रीमंत, गरीब, कोणत्याही जाती-धर्माचा आणि अडाणी मनुष्य देखील नामाचा अभ्यास करू शकतो. परंतु ते अतिशय सोपे-फुकाचे असल्यामुळेच सामान्यांना त्याचे महत्त्व कळत नाही असे इथे महाराज सांगताहेत. आपल्याला कर्माची सवय आहे. तेव्हा योगासारख्या कर्मप्रधान साधनाकडे मनुष्याची ओढ दिसते. परंतु योगप्रक्रियेला शरीराची तशीच मनाची तयारी व्हावी लागते. हा मार्ग उपाधीकडून निरुपाधिक अवस्थेकडे जातो आणि तो प्रत्येकाला सहजसाध्य नसतो. त्यामुळेच निरुपाधिक नामसाधनेचे महत्त्व जास्त! आणि नामाची खासियत म्हणजे ते घेता घेताच देहबुद्धीच्या पलीकडे जाण्याचा रस्ता सापडतो. तेव्हा खरोखर नाम मिळालेले जीव धन्य होत! 

1 comment:

  1. नाम गुरूंकडून मिळण्यासाठी काय करावे?

    ReplyDelete