नाम
–
९) एक मनुष्य बैलगाडीमधून जाताना
रस्त्यामध्ये पडला. एका सज्जन माणसाने त्याला तेथे पडलेला पाहून उचलला आणि आपल्या
घरी नेला. तसे नुसते विषयात राहणे हा आड मार्ग आहे, नामात राहणे हा सरळ मार्ग आहे.
आपण भगवंताच्या नामात पडून राहावे. त्यात राहिले की कोणीही संत भेटतो आणि आपले काम
करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.
~~ श्रीराम. सत्पुरुषाची भेट ही आयुष्यातली सामान्य घटना नव्हे. किंबहुना
आयुष्यातल्या अनेकानेक घटनांपैकी या घटनेचा सर्वात महत्त्वाची व शुभ असा उल्लेख
करणे प्राप्त आहे. मनुष्य जेव्हा परमार्थ मार्ग आक्रमण्यास सुरुवात करतो, तेव्हा परमात्म-दर्शन
ही त्याची ओढ असते, शाश्वत शांती आणि अखंड समाधान हे त्याचे ध्येय असते. हे साध्य
होण्यासाठी शिष्याने सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनात कोणताही विकल्प न बाळगता
राहणे हा एकच पर्याय आहे. सद्गुरू-कृपा होणे हे त्यामुळेच शक्य आहे. नाहीतर नाही.
वरील बोधवचनातून अजून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, जरी अजून सद्गुरू भेट
झाली नसेल, अनुग्रह प्राप्ती झाली नसेल, तरी सज्जन व्यक्तीने निराश होण्याचे कारण
नाही. जर आपण मनापासून आणि अत्यंत तळमळीने भगवंताच्या नामात राहिलो आणि
विवेकपूर्वक चांगल्या गोष्टीच आचरणात आणल्या, तर संत तुम्हाला शोधत येतील, हे
महाराजांचे आश्वासन आहे. भक्ताला जशी भगवंताची ओढ असते, तशीच किंबहुना त्याहूनही
जास्त ओढ भगवंताला सद्भक्ताची असते. संतांना- सत्पुरुषांना देखील साधनात तत्पर
असणाऱ्या शिष्यापेक्षा दुसरा कोणी प्रिय असूच शकत नाही. “आपण सरळ मार्गात मात्र
पडले पाहिजे” हे वाक्य सर्वात महत्त्वाचे आहे. मी काहीही करीन आणि संताने मला आपला
म्हणावे हे शक्य नाही. तरीदेखील ते आपला म्हणतात कारण त्यांची करूणाच अपरंपार
असते. परंतु, एक साधक-शिष्य म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही? आणि जर अखंड
समाधानाचे ध्येय डोळ्यांसमोर कायम असेल, तर साधक साधनात - नामात राहीलच. त्याशिवाय
त्याला चैन पडणार नाही.
तेव्हा साधकाने “जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे
करावे” या समर्थांच्या ओळी सतत स्मराव्या आणि तसे आपले आचरण शुद्ध आणि पवित्र
राहावे यासाठी सद्गुरूंची प्रार्थना करावी! जो कोणी मनापासून नाम घेईल त्याला हे
साधेल यात शंका नाही!
No comments:
Post a Comment