Translate

Thursday, August 14, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ६ -

नाम -

६) नामात राहणारा पुरुष फार थोर असला पाहिजे.

~~ “जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण” हे शेवटचे बोल असणारे आपले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे प्रत्यक्ष नामावातार होत. स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे असे महाराज सांगत. म्हणजे भगवंताचे स्मरण जोवर देहबुद्धी आहे तोवर एक समजून करावी लागणारी कृती आहे. आणि ह्या कृतीचा पाया जर असेल तर ते म्हणजे भगवंताचे नाम. किंबहुना नाम आणि भगवंत दोन नाहीतच असे ते सांगत. तेथे द्वैत नाही. तेव्हा स्मरण ही कृती सहजसाध्य होण्यास, म्हणजेच अनुसंधान टिकण्यास नाम ही कृती आहे; त्याचबरोबर विस्मरण टाळण्यास अथवा इतरही वृत्तींवर ताबा आणण्यास देखील नाम हीच गुरुकिल्ली आहे. असे नामाचे अखंड स्मरण ज्याला असते तो थोर असला पाहिजे ह्यात शंकाच नाही.
                              

ह्यात अजून एक मुद्दा स्पष्ट होतो, तो म्हणजे, नाम हेच साधन आहे आणि नाम हेच साध्य आहे. जेव्हा सद्गुरू आपल्याला नाम देतात, तेव्हा त्यातून अजून काही मिळवायचे नसून नामाचे प्रेम मिळवायचे आहे. नामाचे प्रेम आले की भगवंताचे प्रेम त्याला लागूनच येते. नामानुसंधान सांभाळणे म्हणजेच भगवंताचे स्मरण सांभाळणे. महाराज म्हणतात, तुमचे देहावर जितके प्रेम आहे, तितके ब्रह्मानंद बुवांचे नामावर होते. म्हणजे देहाला काही झाले तर कसा जीव कासावीस होतो, तसे नामानुसंधान भंगले म्हणजे त्यांचा जीव कासावीस होई. असा पुरुष महाराजांना परमप्रिय शिष्य झाला ह्यात नवल ते काय! तेव्हा हा आदर्श ठेवून आपण आपल्या अध्यात्मिक जीवनाला नामानुकूल वळण कसे दिले पाहिजे याचे चिंतन होणे आवश्यक आहे! 

No comments:

Post a Comment