"आता उपायवन वसंतु | जो आज्ञेचा आहेव तंतु |
अमूर्तचि परि मूर्तु | कारुण्याचा ||"
भगवंताच्या प्राप्तीची जी साधने आहेत, ती एका अरण्य किंवा वनासारखी आहेत. अरण्य-वन म्हणजे कितीतरी झाडं असतात. तर ते मार्ग अरण्यासारखे आहेत. या उपायांना फुलवणारा जो वसंत ऋतू तो माझा गुरु आहे. तुम्ही कितीही उपाय करा; जर गुरु नसेल तर उपाय फुलणार नाहीत. पुढे म्हणाले, आज्ञेचा आहेव तंतू, आहेव तंतू म्हणजे मंगळसूत्र! गुरु आहे म्हणजे सौभाग्य आहे. आज्ञा- आ याचा अर्थ सर्व बाजूंनी आणि ज्ञा म्हणजे जाणणे; आज्ञा म्हणजे सर्वज्ञ. म्हणजेच ब्रह्मविद्येचे सौभाग्य असेल तर माझा गुरु आहे. जर माझा गुरु नसेल तर ब्रह्मविद्या सौभाग्यवती नाही.
यापलीकडे माझा गुरु अमूर्त आहे, हा देहधारी नव्हे, तर अतींद्रिय आहे; तो सर्वव्यापी Omnipresent आहे. अमूर्त असूनही तो कारुण्याची मूर्ती आहे. आपण त्यांचे ऐकत नाही तरी अनेक वेळा ते आपल्याला सांगतात. आपल्यासारख्या अज्ञानी लोकांबद्दल अपार करुणा त्यांच्यात असते. आपल्यासारख्यांना मार्गाला लावायचे म्हणजे खरेच काय अंतःकरण असेल त्यांचे! अशा या सद्गुरूंचे ऋण फिटणेच अशक्य! श्रीराम !!
No comments:
Post a Comment