नाम –
१०) तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखे नाम
घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. आपल्या
शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. गाडी उतरंडीला लागली की जशी अति
वेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे.
~~ श्रीराम. नामाचा
उद्रेक अशी ही स्थिती आहे! “अमृताची उकळी नाम तुझे” म्हणणारे तुकोबा नामात रंगून
जातात यात नवल ते काय? आपल्या भारतात होऊन गेलेल्या जवळ जवळ सर्व संतांनी नामाची महती
वर्णिली आहे. नाम म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम- ही भावना जेव्हा साधकाच्या
मनात दृढ होईल त्या दिवशी नाम घ्यावे लागणार नाही तर नाम आपोआप ओठी येईल असे संत
सांगतात. भक्तिरसात बुडालेला भक्त आत्यंतिक प्रेमाने फक्त भगवंताला आर्त स्वरात
हाक मारतो आणि ही हाक म्हणजेच त्याचे नाम! अशी हाक मारल्यावर तो भगवंत त्याचे
कोड-कौतुक पुरवतो—त्याला परमार्थ मार्गात हात धरून पुढे घेऊन जातो.
वाचा अनावर होऊन नाम
येणे ही अवस्था कान्हनगडचे स्वामी रामदास सुद्धा वर्णन करतात. ब्रह्मानंद
महाराजांना जेव्हा त्यांचे पुतणे भीमराव यांनी विचारले, तुम्ही इतके शास्त्रपठण
केलेले; मग तुम्ही इतके नाम कसे काय घेऊ शकलात? यावर ब्रह्मानंद महाराजांनी फार
सुरेख उत्तर दिले आहे. ते म्हणाले, काही वेल भरमसाठ वाढतात. तसे जो कोणी मनापासून
नामाला चिकटतो, त्याला नामच हात देते आणि शक्तीबाहेर नाम वाढत जाते. ती शक्ती वरील
वचनात म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंताची शक्ती असते.
जो साधक दृश्य विश्वाला
बाजूला सारून व सद्गुरूंना शरण जाऊन अखंड नामात राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला
सद्गुरूच हात देतात. हेच सद्गुरूंचे ‘function’ आहे असे गुरुदेव रानडे म्हणत. हे
साध्य होण्यासाठी गुरुदेव रानडेंनी दिलेला मंत्र मला फार उपयोगी पडला असे परमपूज्य
बाबा बेलसरे मुद्दाम सांगतात- ते म्हणाले, “मी सुरुवात १० मिनिटांपासून केली आणि
रोज १ मिनिट वाढवले. महिन्याभरात अर्धा तास वाढला!” याप्रमाणे प्रयत्न आणि सद्गुरू
कृपा यांचे फळ म्हणजे वर विषद केलेला अनुभव!
No comments:
Post a Comment