श्रीराम. चारपाच वर्षे नियमाने आणि निष्ठेने अभ्यास झाल्यावर देहाला वेगळेपणने पाहण्याची युक्ति थोड्या प्रमाणात मला साधली. त्याचे प्रत्यंतर असे आले.
एकदा मला फ्लूचा ताप आला. ताप एकशे साडेचार डिग्री होता. डोके व सारे अंग विलक्षण ठणकत होते. गरम पाण्याने हातपाय धुवून मी अंथरुणावर पडलो आणि देहाला म्हटले की, "अरे! आज तुला बरे नाही. तुला औषधपाणी देतो व गरम पाण्याने शेकतो. पण माझ्या नामाच्या आड यायचे नाही हे लक्षात ठेव." तीन दिवसांनी माझा ताप खाली आला. तोपर्यंत मला गुंगी होती, बाहेरचे फारसे भान नव्हते. पण आतमध्ये मात्र नाम घेण्याइतकी शुद्ध टिकली आणि माझे नाम सुरेखपणे तसेच संथपणे चालू राहिले. इतक्या स्वस्थपणे नाम घेण्याची संधी मिळाली म्हणून ताप आल्याचे सुद्धा एक समाधान लाभले.
नंतर या अभ्यासात मी किंचित फरक केला. 'देहाहून मी वेगळा आहे' असे म्हणण्याऐवजी मी स्वतःला असे म्हणतो की, "अरे! देहाने वा मनाने आता तू श्रीसद्गुरूंचा आहेस. भगवंताच्या नामासाठी त्यांनी तुला ठेवला आहे. ज्या अवस्थेत ते तुला ठेवतील त्या अवस्थेत आनंदाने (म्हणजे समाधान टिकून) राहा. आणि काही झाले तरी नामाला विसरू नको"
या वृत्तीचा रंग थोडासा मनावर चढल्यामुळे सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असला तरी त्यामध्ये मला त्यांचा कल्याण करणारा प्रेमाचा हात दिसतो आणि सुखदुःखाची नांगीच मोडल्यासारखी होते.
~परमपूज्य बाबा बेलसरे (आनंद साधना)
No comments:
Post a Comment