श्रीराम. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट महाराजांनी सांगून ठेवली आहे. महाराज म्हणाले की 'काशी विश्वेश्वर हे आपलं पवित्र मंदिर आहे. एक माणूस बंगाल मधून आला, एक पंजाबमधून आला, एक महाराष्ट्रातून आला, एक गुजरातमधून आला अशी चार पाच माणसं त्या विश्वेश्वराच्या दर्शनाला आली. त्यांचे येण्याचे मार्ग भिन्न होते परंतु त्यांना विश्वेश्वराच्या दर्शनाला आत जाताना एकाच दारातून जावं लागेल. तसं सांगून ठेवतो आपल्याला की, तुमचे उपासनेचे कोणतेही मार्ग भिन्न असोत पण शेवटी सगळ्यांचं पर्यवसान ध्यानामध्ये व्हायला पाहिजे. ध्यान लागलं की साधक तयार झाला.
ध्यानात त्याला विचारशून्यता आली पाहिजे. ही विचारशून्यता तुम्ही दोन मार्गांनी आणू शकता. एक मार्ग आहे मन रिकामं करायचं, याला Vacant Mind म्हणतात. हा ज्ञानमार्ग किंवा योगमार्ग म्हणजेच सांख्यमार्ग आहे.
दुसरा मार्ग आहे आपलं मन एकाच विचाराने भरणं, म्हणजे रात्रंदिवस दुसरं काही नाहीच. 'जागृती स्वप्नी पांडुरंग' असं आपल्या तिन्ही अवस्थांमध्ये ते भरून टाकायचं. हा भक्तिमार्ग आहे. आपल्याला हा अनुभव आहे. आपल्या मनात सतत प्रपंचाचा विचार असतो की नाही, त्या ऐवजी सत्पुरुष म्हणतात, ते योग ज्ञान जाऊ द्या. तुमचं अंतःकरण तुम्ही भगवंताने भरा आणि त्याला नामस्मरणासारखा उपाय नाही!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ५ वा)
श्रीराम जय राम जय जय राम
ReplyDelete