Translate

Saturday, February 28, 2015

पू. बाबांनी पीएच डी का केले नाही?


पूज्य बाबांची एक गोड आठवण-

मी केशवरावांना एकदा विचारलं, 'केशवराव, तुम्ही पीएच.डी. का झाला नाहीत? त्यांनी उत्तर दिलं, 'बापूसाहेब, मनात आलं होतं एकदा आपण पीएच डी व्हावं म्हणून. पण तुम्हाला सांगू का, पीएच डी करायला वेगळा गुरू करावा लागतो. गाईड. मी तर एक गुरू केलेला आहे. मग? साध्वी बाईने दोन नवरे करायचे? आपण पतिव्रता आहोत. आता एकदा लग्न झालं त्यांच्याशी. सर्वस्व दिलं. उडत गेली पीएच डी. काय गोड आहे नाही? आणि महाराजांनी माझी जी इच्छा आहे, त्याच्यातही काही कमी केलं नाही. पीएच डी चे स्टुडंट शिकवायचं काम माझ्याकडेच आलं. आता काय करायचंय पीएच डी होऊन? पीएच डी होऊन जे करायचं ते पीएच डी न होताच करतोय. म्हणजे मी किंग मेकर झालो. जरी किंग नसलो तरी. मग महाराजांनी माझं अजून कोणचं कौतुक पुरवायचं? :-) 

(श्री. बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणी)

नामसाधना व्हावीशी वाटते पण होत नाही. का?


श्रीराम.आपल्या सर्वांना मनापासून नाम व्हावं - साधन व्हावं असं वाटतं. पण मग होत का नाही? याला कारण आपलं दृश्यात अडकलेलं मन. जोवर दृश्यातून सुटून ते अदृश्यात जायला असुसलेलं होत नाही तोवर साधनाची तक्रार राहणार! याला थोडं बंधनात राहणं आवश्यकच आहे. खाणं, बोलणं या दोन गोष्टींवर बंधन तर हवंच पण आजकाल करमणुकीवर देखील बंधन हवं हे लक्षात घ्या. माझे एक अमेरिकेला जाऊन आलेले मित्र म्हणतात, तिथले वातावरण साधनेला अनुकूल (Conducive) नाही. दृश्याचा आणि करमणुकीचा अतिशय मारा आहे. तेच लोण आपल्याकडे येणार!

गुरुदेव रानडे एकदा आपल्या खोलीत बसले असताना बाहेर रस्त्यावर जोरात गाणी लावली गेली. सगळे लोक बाहेर धावले की काय आहे ते पहावे म्हणून. गुरुदेव काही गेले नाहीत. नंतर विचारल्यावर म्हणाले, जो अंतःकरणातल्या नामाच्या नादात बुडालेला आहे त्याला बाहेरचा नाद भुलवू शकत नाही. हे नुसते आपण ऐकून सोडून देऊ नये. त्यांनी केलं, आपल्याला काय अशक्य आहे? गुरूच्या शब्दांवर निष्ठा मात्र हवी!

प्रारब्धाची गती देहापर्यंतच आहे. मनाला प्रारब्धाचे बंधन नाही याचा स्पष्ट दाखला योगवासिष्ठात मला मिळाला. तेव्हा हे शक्य आहे!

~ परमपूज्य बाबा बेलसरे

सगुणभक्तीचे मर्म--


श्रीराम. सामान्य माणसाला ईश्वर जवळ असून दूर झाला आहे. अंतर्यामी ईश्वराच्या निकट पोचून त्याच्याशी तदाकार होण्यास अंतःकरण पात्र व्हावे लागते. ती पात्रता येईपर्यंत ईश्वरावर प्रेम कसे करावे ही खरी अडचण आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने मोठमोठ्या भक्तांनी अव्यक्त ईश्वराला व्यक्त सगुणात आणला. भक्तांनी प्रेम केलेले ईश्वराचे सगुण रूप त्याच्या रसस्वरूपाचे प्रतीक असते. त्या मूर्त रूपाशी प्रेमाने समरस होता आले, तर ईश्वराच्या प्रेमस्वरूपाचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही. हे होण्यासाठी काय करावे?

एखाद्या सुंदर मानव देहाकार मूर्तीमध्ये ईश्वराची / सद्गुरूंची भावना करावी. तिच्याशी प्रेमसंबंध जोडावा. तिच्या सेवेने जीवन भरून टाकावे. येथे भक्ति आरंभ पावते. सगुणाच्या उपासनेमध्ये रमलेल्या माणसाचे अंतःकरण ईश्वराने - सद्गुरूंनी भरून जाते. जीवनाच्या सर्व व्यवहारांमध्ये आपली उपास्यदेवता संगत सोबत करते असा प्रत्यक्ष अनुभव भक्ताला येतो. तिच्या नजरेखाली त्याची सर्व कर्मे घडतात. त्याचे आचरण आपोआप सदाचरण व सत्कर्माचरण होते. ईश्वर चरणी त्याला रति उत्पन्न झाल्याने अन्य सर्व ठिकाणी त्याला विरक्ती प्राप्त होते.

अशा भक्ताच्या अंतर्यामी उपासना मूर्तीचा आवेश होऊन तिच्यातील सुप्त चैतन्य प्रतिसाद देऊ लागते. भक्ताच्या जीवनाचा भार त्याची उपास्य देवता उचलते. तीच त्याला आपल्या अधिक निकट ओढून घेते. मी देह आहे असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत तो देह कुणाच्या तरी हाती सोपवल्याशिवाय त्यावरील माझेपण क्षीण होत नाही. सगुणोपासनेचे हे मर्म आहे!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (प्रेमयोग)

Wednesday, February 25, 2015

देहाला वेगळेपणाने पाहण्याची युक्ती!


श्रीराम. चारपाच वर्षे नियमाने आणि निष्ठेने अभ्यास झाल्यावर देहाला वेगळेपणने पाहण्याची युक्ति थोड्या प्रमाणात मला साधली. त्याचे प्रत्यंतर असे आले.

एकदा मला फ्लूचा ताप आला. ताप एकशे साडेचार डिग्री होता. डोके व सारे अंग विलक्षण ठणकत होते. गरम पाण्याने हातपाय धुवून मी अंथरुणावर पडलो आणि देहाला म्हटले की, "अरे! आज तुला बरे नाही. तुला औषधपाणी देतो व गरम पाण्याने शेकतो. पण माझ्या नामाच्या आड यायचे नाही हे लक्षात ठेव." तीन दिवसांनी माझा ताप खाली आला. तोपर्यंत मला गुंगी होती, बाहेरचे फारसे भान नव्हते. पण आतमध्ये मात्र नाम घेण्याइतकी शुद्ध टिकली आणि माझे नाम सुरेखपणे तसेच संथपणे चालू राहिले. इतक्या स्वस्थपणे नाम घेण्याची संधी मिळाली म्हणून ताप आल्याचे सुद्धा एक समाधान लाभले.

नंतर या अभ्यासात मी किंचित फरक केला. 'देहाहून मी वेगळा आहे' असे म्हणण्याऐवजी मी स्वतःला असे म्हणतो की, "अरे! देहाने वा मनाने आता तू श्रीसद्गुरूंचा आहेस. भगवंताच्या नामासाठी त्यांनी तुला ठेवला आहे. ज्या अवस्थेत ते तुला ठेवतील त्या अवस्थेत आनंदाने (म्हणजे समाधान टिकून) राहा. आणि काही झाले तरी नामाला विसरू नको"

या वृत्तीचा रंग थोडासा मनावर चढल्यामुळे सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असला तरी त्यामध्ये मला त्यांचा कल्याण करणारा प्रेमाचा हात दिसतो आणि सुखदुःखाची नांगीच मोडल्यासारखी होते.

~परमपूज्य बाबा बेलसरे (आनंद साधना)

शिष्याची हार ही गुरूची जीत असते!


श्रीराम. एके दिवशी असं झालं की मी गोंदवल्यात बसलो होतो आणि एक गोव्याचा मनुष्य आला. तो अंगानं चांगला होता पण कमरेखाली पार लुळा होता. दोन माणसांनी धरून त्याला आणला. त्याच्याबरोबर त्याची आई आणि बायको होती. मी त्याच्या बायकोला विचारलं की बाई, तू बी.ए. बी.एड. शिक्षिका आहेस, तू याला पसंत कसं केलेस? ती म्हणाली, याला पाहिल्यावर हा माझा आहे असं वाटलं!

तसं अर्जुनानं श्रीकृष्णाला पाहिल्याबरोबर त्याला हा माझा आहे, असं वाटलं. बस, संपलं. हे परमार्थातलं भाग्य आहे लक्षात घ्या! तिथे संशय नाही. इतकं व्हावं भगवंताचं की त्यालाच आपल्याशिवाय चैन पडू नये. हे खरं प्रेम! विवेकानंद जर आले नाहीत, तर रामकृष्णांना चैन पडत नसे. हा आपलं ज्ञान घेण्यास पात्र आहे याचा आनंद सद्गुरुंना फार मोठा असतो.

याला एकच आवश्यक असतं. कर्तेपणा गेला, आता केवळ तूच असा भाव आला की गुरू कडेवर घेतो! शिष्याची हार ही गुरूची जीत असते!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी प्रवचन)

सर्वोच्च अथवा परमोच्च मूल्य कोणते?


श्रीराम. जीवनात आपण सर्वोच्च मूल्य कशाला देतो याला फार महत्त्व आहे. सर्वोच्च अथवा परमोच्च मूल्य कोणते? तर जे मूल्य मी गेलो तरी माझ्याबरोबर येते ते परमोच्च मूल्य आहे. मी गेल्यावर माझ्याबरोबर नामस्मरण केलेले येणार हे नाम घेत गेल्यानेच कळून येईल. हे कळले म्हणजे त्याला सर्वोच्च मूल्य देता येईल. इतर सर्व मूल्ये ही इथेच या जगात राहतात. हे पक्के समजणे म्हणजे ध्येय निश्चिती होणे होय! मग माझे जगणे आता नामाकरता आहे ही जाणीव दृढ होऊ लागेल!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी प्रवचन)

या अस्वस्थतेच्या काळात जे भगवंताला धरून राहिले तेच तरले

श्रीराम. आपल्या भोवती प्रपंचाचा किती गदारोळ आहे? इतका आहे की त्यात भगवंताचं नाव घ्या असं सांगणारा मूर्ख ठरावा. ज्ञानेश्वरीचं कसं होतं, तर एखादी गोळी घ्यावी म्हणजे काही काळ कसं छान वाटतं; तसं काही काळ श्रवण झालं की चांगलं वाटतं. पेनकिलर सारखं होतं. आता जिथे कायम प्रपंचाचा विचार आहे तिथे 'ईश्वराचं स्मरण करा' हे सांगणं किती कठीण आहे! पण जितकं कठीण आहे तितकंच आवश्यक आहे.

ज्यांना मधुमेह (Diabetes) आहे, ते इन्सुलिनचं इंजेक्शन घेतात आणि गोड खातात. तसं ज्ञानेश्वरीचं इंजेक्शन घेऊन समाजात राहावं.

****या अस्वस्थतेच्या काळात जे भगवंताला धरून राहिले तेच तरले****

महाराजांनी ९० वर्षांपूर्वी सांगितलं होतं की पुढे काळ फार कठीण येणार आहे. ते पुढे म्हणाले, 'माणसं गुरासारखा विषय भोगतील!' आज खऱ्या अर्थानं ही परिस्थिती आलेली आहे. या सगळ्या गदारोळामध्ये ज्ञानेश्वर महाराज आत्म्याच्या आनंदाच्या गोष्टी सांगतात. ही कादंबरीच वाटेल. परंतु आपण सद्गुरूंचे म्हणवतो ना, मग आपण ते वातावरण टिकवण्याची कोशिश करा. आजच्या जगात परमेश्वराच्या नामाला चिकटून जो राहील तोच तरेल.

****हे मी स्वानुभवाने सांगतो की याला सद्गुरूने दिलेल्या नामाशिवाय पर्याय नाही नाही नाही!****

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी)

तीन गोष्टी दुर्लभ आहेत!


श्रीराम. तीन गोष्टी दुर्लभ आहेत. देवाची कृपा असली तरच त्या मिळतात. त्या कोणत्या? तर, मनुष्य देह, मोक्षाची इच्छा आणि सत्पुरुषांचा, महापुरुषांचा सहवास! असं आहे, सत्पुरुषांच्याकडे अनेक लोक जातात. त्यांना आपलं म्हणतात पण तो सत्पुरुष त्यांना आपलं म्हणत नाही. त्याने कोणाला आपलं म्हणणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आणि त्या जिवाचा उद्धार होईपर्यंत त्याची जबाबदारी घेणं ही सामान्य गोष्ट नव्हे. त्याने आपला म्हणण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं तर "मी तुझ्या चरणाशी आलो आहे, मी खरा कर्ता नाही" हे म्हटलं की त्याची कृपा होते.

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ५ वा)

Wednesday, February 18, 2015

ईश्वरप्राप्तीचे किंवा स्वस्वरूपानुभवाचे ध्येय माणसाने ठेवावयास पाहिजे!


श्रीराम. मानवी जीवनामध्ये केव्हा काय घडेल याचा नेम नसतो. प्रसंग गुदरला म्हणजे त्यास मुकाट्याने तोंड देण्यापलीकडे माणसाला काही करता येत नाही. यामध्ये एक मोठा आशेचा किरण सापडतो. तो हा की, माणसाने कशासाठी जगावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. माणूस आपले ध्येय ठरवून त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचा साचा बनवू शकतो. 

प्रत्यक्षात असे आढळते की, आधीच अपूर्ण असलेल्या जीवनाला अपूर्ण म्हणजे तात्पुरत्या ध्येयांची जोड दिल्याने माणसाचे या जगामधील जीवन जास्तच अपूर्ण बनते. अशा जीवनामध्ये विकारांचा धुमाकूळ असतो, वासनेचा विलास असतो, अहंकाराचा बडेजाव असतो, आशा-ममता यांची कैद असते. माणसाच्या अंतर्यामी सदैव खेचाखेच चालल्यामुळे त्याला शांती व समाधान कधीही अनुभवास येत नाही.

ही शोकांतिका टाळायची असेल तर ईश्वरप्राप्तीचे किंवा स्वस्वरूपानुभवाचे ध्येय माणसाने ठेवावयास पाहिजे. जगाला चालवणारी सत्ता म्हणजेच ईश्वर होय. अंतर्यामीपणाने तो आपल्या अंतःकरणात आहे. त्याला मनापासून शरण गेल्यास संसाराच्या संकटात तो खरोखर हात देतो. आपले जीवन आनंदमय करून लोकांना आनंद देण्याचा हाच खरा मार्ग आहे!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (वैराग्य निरूपण- दासबोध)

Tuesday, February 17, 2015

ध्यानेन आत्मनि पश्यन्ति|


श्रीराम. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट महाराजांनी सांगून ठेवली आहे. महाराज म्हणाले की 'काशी विश्वेश्वर हे आपलं पवित्र मंदिर आहे. एक माणूस बंगाल मधून आला, एक पंजाबमधून आला, एक महाराष्ट्रातून आला, एक गुजरातमधून आला अशी चार पाच माणसं त्या विश्वेश्वराच्या दर्शनाला आली. त्यांचे येण्याचे मार्ग भिन्न होते परंतु त्यांना विश्वेश्वराच्या दर्शनाला आत जाताना एकाच दारातून जावं लागेल. तसं सांगून ठेवतो आपल्याला की, तुमचे उपासनेचे कोणतेही मार्ग भिन्न असोत पण शेवटी सगळ्यांचं पर्यवसान ध्यानामध्ये व्हायला पाहिजे. ध्यान लागलं की साधक तयार झाला.

ध्यानात त्याला विचारशून्यता आली पाहिजे. ही विचारशून्यता तुम्ही दोन मार्गांनी आणू शकता. एक मार्ग आहे मन रिकामं करायचं, याला Vacant Mind म्हणतात. हा ज्ञानमार्ग किंवा योगमार्ग म्हणजेच सांख्यमार्ग आहे.

दुसरा मार्ग आहे आपलं मन एकाच विचाराने भरणं, म्हणजे रात्रंदिवस दुसरं काही नाहीच. 'जागृती स्वप्नी पांडुरंग' असं आपल्या तिन्ही अवस्थांमध्ये ते भरून टाकायचं. हा भक्तिमार्ग आहे. आपल्याला हा अनुभव आहे. आपल्या मनात सतत प्रपंचाचा विचार असतो की नाही, त्या ऐवजी सत्पुरुष म्हणतात, ते योग ज्ञान जाऊ द्या. तुमचं अंतःकरण तुम्ही भगवंताने भरा आणि त्याला नामस्मरणासारखा उपाय नाही!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ५ वा)

कर्ता बदलला की सगळं जीवन बदलतं!


श्रीराम. माझ्या मते श्रीकृष्णाचं खरं कौतुक असेल या सगळ्या वेदांतामध्ये तर त्याने कर्म, साधन, भक्ती या सर्वांच्या आधी कर्ता कसा बदलेल याला महत्त्व दिलेलं आहे. कर्ता बदलला की सगळं जीवन बदलतं एकदम. कर्ता सुधारणं, बदलणं याचा अर्थ त्याचा दृष्टिकोन सुधारणं, त्याच्या वासना बदलणं हे आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आतमध्ये नवा मनुष्य तयार करणं हा परमार्थ आहे. तो कसा तयार होईल? तर आज तो जो हे सगळं माझं माझं म्हणतो, ते तो तुझं आहे असं म्हणेल. इतकंच नव्हे तर तो पुढे म्हणेल की, "मी सुद्धा तुझाच आहे, मग तू ठेवशील तसा मी राहीन", म्हणून तो मनुष्य आतून नवा बनतो. कृष्णमूर्तींचं वाक्य आहे ना The only revolution is the inner revolution. ही आतली क्रांतीच आहे आणि भगवद्गीतेचा आरंभ या आतल्या क्रांतीमध्ये आहे!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड 5 वा)

खऱ्या साधकाच्या आड प्रकृती येत नाही!


श्रीराम. एकदा एका भक्ताने श्रीमहाराजांना सांगितले, "माझ्या तब्येतीला नेहमी काही ना काही होतच असते. काय करावे? मी अगदी बेजार झालो आहे." त्यावर श्री म्हणाले, "ज्याची प्रकृती कायम चांगली आहे, तो उत्तम साधक होणे कठीण आहे. खऱ्या साधकाच्या आड प्रकृती येत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुरुदेव रानडे. साधक कसा असावा हे त्यांच्याकडून शिकावे. त्यावर ती. बाबा म्हणाले, "गुरुदेव रानडे यांनी म्हटले आहे, की गेल्या ४० वर्षात मला असा एकही दिवस आठवत नाही की जेव्हा माझी प्रकृती चांगली होती. पण ते माझ्या साधनेच्या आड आले नाही." श्रीमहाराज नंतर म्हणाले, "त्याची इच्छा असेल तसे तो ठेवील, असे मनापासून वाटले पाहिजे." भक्ताचे समाधान झाले.

(सहज बोलणे हितउपदेश)

Sunday, February 8, 2015

आज पूज्य बाबांची जयंती!!!


श्रीराम. ८ फेब्रुवारी १९०९ रोजी जन्म झाला महाराजांचे एक निस्सीम भक्त आणि शिष्योत्तम पूज्य श्री केशवरावजी बेलसरे (बाबा बेलसरे) यांचा. आज यांची जयंती. या महात्म्याला शतशः नमन! बाबांच्याबद्दल काही लिहावे हे म्हणजे समुद्राला कमंडलूत पकडण्यासारखे आहे. हो, बाबा म्हणजे ज्ञानाचा समुद्र...साधनेचा समुद्र...सदाचरणाचा समुद्र...शिष्याने कसे वागावे याचा ज्ञानकोष! श्रीमहाराजांची शिकवण अखेरपर्यंत साधकांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व!

महाराजांच्या अनेक लोकांनी यांना प्रत्यक्ष पहिले आहे, त्यांची अमृतवाणी कानांनी ऐकली आहे आणि त्यांची असंख्य पुस्तके वाचली आहेत. पण आमच्यासारख्या या पिढीतील अनेक जणांना त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले नाही. परंतु, जसे म्हटले जाते की सत्पुरुषांना त्यांच्या देहात पाहायचेच नसते. त्यांच्या विचारांना आचरणात आणले तर आपण त्यांना जिवंत ठेवण्याचेच काम करत असतो. अर्थात हे सोपे नाही. एकच वाटते, बाबांचा एक अत्युत्तम गुण म्हणजे आत्यंतिक प्रांजळपणा. जो मनुष्य स्वतःशी इतका प्रांजळ होऊ शकतो, तोच आपले अवगुण दूर सारून साधनात पुढे पाऊल ठेवू शकत असला पाहिजे.

महाराजांची शिकवण आपल्यापुढे मांडून बाबांनी अक्षरशः हिमालायापेक्षा मोठे काम करून ठेवले आहेत. असे म्हणतात, की भगवंत समजावा यासाठी सद्गुरूंची गरज असते. पण आमच्यासारख्या परमार्थात शून्य माहिती असणाऱ्यांसाठी सद्गुरू काय सांगताहेत याचे आकलन होण्यासाठी देखील एका साधक मध्यस्थाची गरज असते. या गरजेला पूज्य बाबा पुरून उरले यात शंका नाही!

असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी बाबांच्या ऑडीओ व्हिडिओ पुस्तके यांची पारायणे केली आहेत आणि एकदा बाबांना ऐकले की अजून कुणाला ऐकण्याची गरज भासत नाही इतके त्यांचे सांगणे प्रभावी आहे. अर्थात असे ते प्रभावी होण्यामागे त्यांची अविरत आणि आत्मप्रचीतीने युक्त अशी साधना आहे. अनेकदा डोळ्यात पाणी आणून, कळवळून "नाम घ्या रे" असे सांगणारे पूज्य बाबा सूक्ष्म रूपात अजूनही चांगल्या साधकांना मदत करताहेत. परंतु आपण नुसते ऐकून ते सोडून न देता त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर तीच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली आदरांजली ठरेल! शेवटी पूज्य बाबांच्याच शब्दात, "निदान ऐकून ठेवा; या जन्मात साधेल न साधेल, पण ऐकून ठेवा!" :-) खरोखर शब्द तोकडे आहेत या शिष्योत्तमासाठी!!!  ____/|\____ 

Saturday, February 7, 2015

साधनात स्वतःशी कठोर झालं पाहिजे! ~ श्री बापूसाहेब मराठेंनी सांगितलेली एक आठवण


श्रीराम! 1963 साली महाराज जाऊन 50 वर्षं झाली म्हणून मोठा उत्सव झाला गोंदवल्यात. त्या उत्सवाचं स्मरण म्हणून पू. बाबांनी दोन गोष्टी सोडल्या. एक- कोणत्याही रिसेप्शनला इतःपर जायचं नाही आणि कुठलंही पत्र आलं तरी त्याला उत्तर लिहायचं नाही. ते म्हणत याच्यात वेळ फार जातो. रिसेप्शन म्हणजे दोन दिवस आधीपासून आहेर काय द्यायचा ही कटकट. त्यांच्याकडून मागे काय आहेर आला होता त्याप्रमाणे दिला पाहिजे असल्या भानगडी. पत्र लिहिण्यात सुद्धा फार वेळ जात होता आणि त्यामुळे साधन लटकं पडत होतं म्हणून!

हे समजल्यावर आम्हाला हे बरं वाटलं आणि मी पू. तात्यासाहेबांना विचारलं, "तात्यासाहेब, केशवरावांनी काय सुरेख निर्धार केलाय. मी करू का तो?" तात्यासाहेब म्हणाले, "वा! चांगला विचार आहे, असू दया, आता तू बँकेत नोकरीला आहेस, वरून तिसऱ्या पोझिशनला आहेस. पगारही भरपूर आहे. हे असूनही अजून वरची जागा मिळावी असं वाटतंच की नाही? एक लक्षात ठेवावं. तुला त्यांचं अनुकरणच करायचंय ना, तर कोणत्या गोष्टीचं अनुकरण करायचं ते बघ. हे रिसेप्शनला न जाणं वगैरे म्हणजे नुसती नक्कल होईल. ते जसे साधनेत स्वतःशी कठोर होतात तसं कठोर व्हायचा अभ्यास आधी करावा. तो साधला तर पुढचं बघू. नाहीतर साधन तर व्हायचंच नाही आणि नातलगांशी संबंध गमावून बसशील.

केशवरावजी अत्यंत कठोर आहेत साधनेत स्वतःशी. लाड नाहीत. साधन व्हायचं म्हणजे व्हायचं. त्यावेळी चार तास जप व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्हाला जरा अंग मोडून आलं की काढू भरून पुढल्या दिवशी कधीतरी. असं होता कामा नये!

~ श्री बापूसाहेब मराठे

Friday, February 6, 2015

साधकांनी शक्तिपात टाळणे अपरिहार्य!


श्रीराम. साधना करताना जी शक्ती साठते त्याची गंमत अशी आहे, की त्या शक्तीला विरुद्ध काही आलं – त्या शक्तीस्वरूपाच्या उलट काही मध्ये आलं तर ती शक्ती नाहीशी होते. आपली शक्ती – भगवंताच्या स्मरणाची शक्ती सूक्ष्म आहे. त्याच्या उलट स्थूल गोष्टी आहेत. त्या सूक्ष्मात जर स्थूल मिसळलं तर मिळवलेली शक्ती नाहीशी होते. आपल्याला शिकायचं काय आहे, तर जग हे परमात्मस्वरूप आहे. “कै ऐशी स्थिती येईल माझ्या अंगा| अवघे देखे जन ब्रह्मरूप||” सगळीकडे तोच आहे अशी माझी स्थिती व्हायची आहे. यासाठी आवश्यक काय आहे, तर सबंध जग निर्दोष पहायचंय. दोष पाहणं त्याच्या उलट.

म्हणून मी जर नामस्मरण करून निंदा केली तर शक्तिपात होतो. आलं ना लक्षात? समजा तास दोन तास उत्तम जप झालेला आहे आणि मग बाहेर आल्यावर तुमची सून काय करते, तुमच्याशी नीट वागत नाही का? तुमचा मुलगा काय करतो, अहो अलीकडे काळ बिघडलाय, हे झालं की तासभर केलेला जप हवा होऊन जातो. याशिवाय जर एखाद्या माणसाचा द्वेष केला तरी हेच होणार. अहो, परमात्मस्वरूपाला प्रेमाशिवाय काही चालत नाही!

आमच्या लहानपणी आम्ही काळ-काम-वेगाची उदाहरणं शिकलो. त्यात काय असे? एक पाण्याचा हौद आहे. त्याला वरून दोन तोट्या पाणी सोडतात आणि खालून चार तोट्या पाणी रिकामं करण्याच्या आहेत. काय होईल? पाणी साठेल का? फक्त ओल राहील. तसं नाम घेऊन जर अशा गोष्टींमध्ये वाया घालवला तर केवळ थोडीशी ओल राहील; फार तर पुढच्या वर्षी गोंदवल्याला दर्शनाला यावं एवढी इच्छा राहील; पण त्यापुढे साधनात पाऊल पडणार नाही. हे असं होऊ देऊ नका. शक्तीपातापासून साधकाने फार जपणं आवश्यक आहे! आणि म्हणूनच मौनाचं अतिशय महत्त्व आहे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (प्रवचन उत्सव १९९०)

Thursday, February 5, 2015

"तादात्म्य" होणं ही अवस्था महत्त्वाची!


तादात्म्य होणं ही अवस्था फार महत्त्वाची आहे. परमात्म्यासंबंधीचा भाव स्थिर व्हायला हवा. तुम्ही जन्माला आलात ते तुमचं नाव बरोबर घेऊन आलात का? तुमच्या आईबापांनी नाव दिलं, ते सारखं तुमच्या कानावर पडल्यामुळे तिन्ही अवस्थांमध्ये ते स्थिर झालं. तुम्हाला गाढ झोपेत हाक मारली तरी तुम्ही जागे होता. तसंच आपण एखादी कल्पना घट्ट धरली, त्याच्याशी तादात्म्य झालो की ती साकार झालीच पाहिजे. हा विश्वाचा नियम आहे.

ज्ञानेश्वर महाराजांनी किती जन्म श्रीकृष्णाचं चिंतन केलं असणार? सुरुवातीला ते अस्थिरच असणार. पण नंतर ते म्हणाले, "पांडवांशी सदाकाळी कृष्ण राहिला जवळी | ज्ञानदेवा हृदयकमली तैसाचि स्थिरावला ||" हा आनंदमय परमात्मा त्यांच्या हृदयात स्थिर झाला, म्हणून ते म्हणाले, "अवघाचि संसार सुखाचा करीन | आनंदे भरीन तिन्ही लोक ||" त्यांच्या हृदयात स्थिर झालेला श्रीकृष्ण त्यांना सबंध त्रिभुवनात दिसायला लागला. असं भगवंताचं - सद्गुरूंचं स्मरण होईल.

गुरूने मला जे नाम दिलं आहे ते सुरुवातीला अस्थिरच राहणार. ते जेव्हा स्थिरावेल, तेव्हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला आपला गुरूच दिसेल. हे तादात्म्य साधणं हे आपलं ध्येय पाहिजे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ८ वा)

Tuesday, February 3, 2015

पूज्य बाबांची श्री बापूसाहेबांनी सांगितलेली एक गोड गोष्ट !


श्रीराम. एकदा मी (श्री बापूसाहेब मराठे) पूज्य बाबांना विचारलं, "भगवंत फार लांब आहे. इतका तो लांब आहे की मानवी प्रयत्नांनी आपल्या आणि भगवंताच्यात जे अंतर आहे ना, ते काटलं जाईल असं नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. मात्र हे खरं का?" तर म्हणाले, "हो अगदी खरं." मी म्हटलं, "मग अगदी खरं म्हटलं तर आमची गाठ कधीच पडायची नाही देवाबरोबर, हे ही आलं त्याच्या बरोबर."

तर म्हणाले, "असं नाहीये. गंमत काय आहे सांगू का? तुम्ही जेव्हा एक पाऊल टाकता तेव्हा तुमचे सद्गुरू तिकडून दोन पावलं टाकत येत असतात. भगवंत काय करतो? सद्गुरूला तिकडून दोन पावलं टाकून जायला सांगत असतो." किती सुरेख आहे!

म्हणजे काय, तुम्ही एक पाऊल टाकलं पाहिजे; म्हणजे तिकडून दोन पावलं पडतील सद्गुरूची. म्हणजे दोन तृतीयांश अंतर सद्गुरू कापेल आणि एक तृतीयांश अंतर तुम्ही कापणारात, मग आता काय अवघड आहे? आणि म्हणून गाठ पड़ते. म्हणून आत्मज्ञान होतं, सद्गुरूकृपा होते!

~ पूज्य बापूसाहेब मराठे यांच्या प्रवचनातून

Monday, February 2, 2015

साधकाला येणारे तीन अतींद्रिय अनुभव --


बहुधा असे होते की पूर्वजन्मीच्या पुण्याईने अथवा आत्मानात्मविवेकाने अथवा सद्गुरूंच्या शब्दाने भगवंताच्या अस्तित्वाची श्रद्धा बुद्धीत असते. पण त्या श्रद्धेला भावनेची जोड असत नाही. भगवंताच्या अस्तित्वाबद्दल संशय नसणे आणि तो आहे असे प्रत्यक्ष वाटणे यात फरक आहे. म्हणून **मी आहे हे जितके निःसंशयपणे वाटते तितके तो भगवंत आहे असे वाटणे हा सर्वात पहिला व मोठा मौल्यवान अनुभव आहे.** भगवंताच्या अस्तित्वाबद्दलची ही निष्ठा साधनेचा प्राण आहे असे म्हणणेच योग्य होईल.

दुसरा अनुभव असा की साधनी माणसाला आतून भगवंताची आज्ञा होते. आतून त्याचे मार्गदर्शन होते. या आज्ञेला आतला आवाज - Inner Voice असे म्हणतात. हा आवाज अतींद्रिय असतो आणि याच्या उलट जाणे अशक्य असते. साधनी माणसाच्या साधनावर आतील आवाजाची स्पष्टता आणि आवृत्ती अवलंबून असते. अशा माणसाला जीवनामध्ये समस्या उरत नाही.

तिसरा अनुभव असा की भगवंत आपला सांगाती आहे अशी साक्षात प्रचीती येते. त्याचा बाहेर न दिसणारा सहवास घडतो. साधनी माणूस त्याच्या सहवासात सर्व कर्मे करतो. त्याचा सहवास इतका तृप्त करतो की आणखी काही मिळवायचे उरत नाही. म्हणून भगवंताचा सहवास लाभलेल्या साधनी माणसाला काही मागण्याची वासनाच उरत नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत)

Sunday, February 1, 2015

अनुसंधान म्हणजे काय?


भगवंताच्या अस्तित्वाचे नित्य व सूक्ष्म अनुसंधान टिकवण्याचा अभ्यास करावा लागतो. वास्तविक हृदयातील भगवंत कोठे जात नाही किंवा कोठून हृदयात येत नाही. तो केवळ हरवल्यासारखा किंवा लपल्यासारखा झालेले आहे. त्याच्या स्मरणाने त्याच्या असण्याची प्रभावी जाणीव निर्माण करण्यासाठी गुरूने सांगितलेले साधन करायचे असते. आपण स्वतः आहोत त्यापेक्षा सुद्धा भगवंत आपल्या जवळ आहे. त्याला दृष्टीआड न होऊ देण्यास "तो मला हवा" असे सारखे वाटावे लागते. उग्र हवेपणाच्या अंगी मोठे सामर्थ्य असते. त्या सामर्थ्याने मनाची सारी यंत्रणा भगवंताचा शोध घेण्यामध्ये गुंतून जाते. मन असे गुंतले की माणूस भगवंताला अखंड सन्मुख राहतो. यासच अनुसंधान असे म्हणतात.

नित्यानित्य विवेकाला प्राधान्य देऊन या अनुसंधानाचा अभ्यास केला तर ज्ञानमार्ग होतो. निस्वार्थी प्रेमाला प्राधान्य देऊन त्याच अनुसंधानाचा अभ्यास केला तर संतांना प्रिय असलेला भक्तिमार्ग होतो.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताचे अनुसंधान- साधनेचा प्राण)