Translate

Saturday, May 30, 2015

प्रेमसूत्र दोरी | नेतो तिकडे जातो हरी ||


श्रीराम. भगवंताच्या / सद्गुरूंच्या भक्तीने बांधला गेलेला भक्त कसा त्यांना संपूर्ण अर्पण होतो याचे अत्यंत सुरेख वर्णन तुकोबांच्या या अभंगात!
प्रेमसूत्र दोरी | नेतो तिकडे जातो हरी ||
मनेसहित वाचा काया | अवघे दिले पंढरीराया ||
सत्ता सकळ तया हाती | माझा जीव काकुळती ||
तुका म्हणे ठेवी तैसे | आम्ही राहो त्याचे इच्छे ||
~ श्रीहरीविषयी भक्ताच्या ठायी असलेले प्रेम ही एक प्रेमाची दोरी आहे. भक्त भगवंताच्या मागे जाईल यात नवल ते काय; पण इथे प्रेमसूत्राने बांधला गेलेला भगवंत भक्त नेईल तिकडे जातो. पण हे उगीच घडत नाही. त्यासाठी भक्ताने त्याला मन, काया, वाचा सर्वच्या सर्व अर्पण केलेले असते. तुकोबा म्हणतात, अहो सर्वसत्ताधीश आहे तो! सर्वस्व अर्पिल्यावर त्याला माझी दया येणार नाही का? तो जसे ठेवील तसेच आम्ही राहू!
~ मन अर्पण केले! म्हणजे सगळ्या व्यथेचे मूळच अर्पण केले. मन एव कारणं बंध
मोक्षयो:| हे जर खरे तर सर्व ताप त्या मनाचाच आहे. अजून एके ठिकाणी जसे तुकोबा म्हणतात, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली! तेव्हा हे षड्विकार ज्याच्यात आहेत ते मन त्याला अर्पण केल्यावर माझे असे उरले काय? श्रीमहाराज जेव्हा सांगतात, तुमच्या काळजीचं गाठोडं रामाच्या पायापाशी ठेवून जा, त्यात हाच अर्थ आहे! महाराज म्हणतात, मला स्वतःचा संसार करता आला नाही पण मला दुसऱ्याचा संसार मात्र चांगला करता येतो, पण काय करू, कुणी माझ्यावर सोपवीत नाही! कोण म्हणेल असं? आपल्या प्रपंच आणि परमार्थाची जबाबदारी एवढ्या छातीठोकपणे कोण घेईल? हे जर साधले नाही आपण तर खरेच "अदृष्ट उभे ठाकले पण म्या दार लावूनि घेतले" अशी आपली अवस्था होईल.
परमपूज्य बाबा अनेक ठिकाणी प्रवचनात सांगतात ते आपण ऐकलेच आहे- आपण महाराजांना अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज अशा पदव्यांनी गौरवितो ते तसे ते खरेच आहेत म्हणून गौरवितो ना? मग त्यानुसार आपण वागले पाहिजे, तरच आपल्या बोलण्याला अर्थ राहील. भाऊसाहेब जेव्हा म्हणतात, त्यांच्या कानावर घातलं की आपली जबाबदारी संपली! ह्यात खरे मर्म आहे. पू. बाबा म्हणतात तसे आपण कानावर घालतो पण जबाबदारी संपवत नाही. ते करतील की नाही ही शंका मन पोखरत राहते. मग यास निष्ठा म्हणणे योग्य का? अहो ती आई आहे ना? मग आईस सांगण्याची गरज असते का? फक्त एवढेच की त्या आईला आपल्या अंतिम हिताची खरी इच्छा असते आणि त्यामुळे ती आपल्या हिताचे असेल तेच करील. भाऊसाहेब म्हणत ना, महाराजांना कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुम् अशी शक्ती आहे. फक्त एकच गोष्ट त्यांच्या शक्ती बाहेरची आहे ती म्हणजे त्यांना कधी कुणाचे अकल्याण करता येत नाही! यापरते पाहिजे ते काय? तेव्हा त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे म्हणजे शरणागती होय आणि ती साधणे म्हणजे परमार्थ मार्गावर खरी वाटचाल करणे होय! श्रीराम समर्थ!!!

No comments:

Post a Comment