श्रीराम. अध्यात्मामध्ये मनाची जागृती म्हणजे "मी देहाचा नसून आत्म्याचा आहे" हे भान बाळगणे. ते बाळगण्यास भगवंताच्या नामाचे स्मरण ठेवण्यासारखा दुसरा सहज पचनी पडणारा मार्ग नाही. नामस्मरणाने स्वतःच्या देहाची आसक्ती सुटते. देहाची आसक्ती क्षीण झाली की सर्व दृश्याची आसक्ती शून्य होते. साधकाने आपल्या अंगच्या वैराग्याचे मोजमाप स्वतःच्या देहाबद्दल वाढणाऱ्या अनासक्तीवरून करायचे असते.
स्वदेहाच्या वैराग्याने संपन्न माणूस खाणेपिणे, पैसाअडका, मान व सत्कार, लौकिक व प्रतिष्ठा, स्तुती व कीर्ती या गोष्टींना यत्किंचितही भुलत नाही. वैराग्यवान साधकाचे सर्व लक्ष हृदयस्थ आत्मस्वरूपाच्या चिंतनात गुंतून राहते. त्या चिंतनाच्या नादात जन्म घालवणे हे वैराग्याचे फलित आहे. वैराग्याचा उदय झाला की कोणतेही शरीरसुख साधकाला आकर्षित करीत नाही. त्याचप्रमाणे कोणतेही शरीरदुःख त्याला उदास करू शकत नाही.
*** "आज नाही पण उद्या आपण सुखी होऊ" ही कल्पनाच गळून पडते. मानवीजीवनात असे काही उरत नाही, की जे मिळाले नाही तर जीवन व्यर्थ होईल. वैराग्य ही साधकाच्या जीवनाची खरी शोभा आहे. साधकाचे ते अध्यात्मिक ऐश्वर्य आहे! ***
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाचे अभ्यासाची रूपरेषा)
No comments:
Post a Comment