श्रीराम. केशवरावांच्या (पूज्य बाबा बेलसरे) वाचनात २-३ वेळा असं आलं होतं, की नर्मदा प्रदक्षिणा जर केली, तर त्याचं पुण्य फारच आहे. चित्तशुद्धीला त्याचा फार फायदा होतो. ती अर्थात पायी व्हायला हवी; म्हणजे तिचा फार फायदा आहे चित्तशुद्धीला आणि चित्तशुद्धी झाली की मग पुढचा पल्ला फार थोडा आहे. पण ही प्रदक्षिणा अतिशय कष्टप्रद आहे पण त्याची प्रचीती अजूनही लोकांना येते. तिथे अश्वत्थाम्याची भेट होते आणि नर्मदा माई सुवासिनीच्या रूपात तुम्हाला भेट देते.
केशवरावजींना देव भेटीची अनामिक तळमळ लागली होती. त्यामुळे जर ही प्रदक्षिणा आपल्या हातून झाली तर आपल्याला लवकर पल्ला गाठता येईल असे त्यांना वाटत होते. पण तेव्हा त्यांना अशक्तपणा आला होता; त्यामुळे शक्य नाही ते अशी सारखी चुटपूट मनाला लागली त्यांच्या. ही गोष्ट केशवराव काही महाराजांना बोलले नाहीत. चार-पाच दिवस सतत ही चुटपूट लागली आणि सहाव्या दिवशी ते सहज भेटले महाराजांना. महाराज काय म्हणाले, "केशवराव, अहो खालच्या यत्तेतून एकदा पास झाल्यावर पुन्हा त्या यत्तेत कुणी बसतं का? चवथी पास झालो आणि पाचवीत गेलो. मग पुन्हा कुणी चवथीत बसतो का?" तशी केशवरावांना कळेचना महाराज हे काय म्हणताहेत ते. हे एकदम म्हणाले, "महाराज आपण काय बोलताहात याचा मला उलगडा होत नाहीये." तेव्हा महाराज म्हणाले, "चारपाच दिवस चुटपूट लागल्ये ना नर्मदा प्रदक्षिणेची? त्याला अनुसरून मी बोलतोय. आता ती कष्टप्रद आहे हे मी कबूल करतो. पण तुम्ही त्याची काळजी करण्याचे कारण नाही. अहो, गेल्या जन्मी ही प्रदक्षिणा होऊन गेल्ये आपली. तुम्ही हा विचार सुद्धा मनात आणू नका. आपली ती प्रदक्षिणा झालेली आहे. त्या पुण्यायीच्या डबोल्यावरच तर तुमची नी आमची गाठ झालेली आहे. तेव्हा आता तो विचार टाकून द्यायचा आणि मी सांगतो तसं माझं होऊन रहायचं आणि नामस्मरण जोरात करायचं. बाकी विचार करत बसायचं नाही."
सद्गुरू असं नैराश्य घालवतात आणि इथे सद्गुरूंची अत्यंत जरूर आहे. केशवराव म्हणाले, "महाराजांनी हे केलं नसतं तर मी नुसता हाल काढत राहिलो असतो. मनाची चरफड होत राहिली असती. पण शांत झालं मन आणि नामस्मरणाला जोर आला." अजून सुद्धा बऱ्याच जणांचा हा अनुभव आहे की आपल्याला नैराश्य आलं तर सद्गुरू ते घालवतात!
~ पूज्य श्री बापूसाहेब मराठे यांच्या प्रवचनातून
श्रीराम जय राम जय जय राम
ReplyDelete