Translate

Sunday, May 31, 2015

तुका म्हणे आता करी माझे हित | काढावे जळत आगीतुनी ||


श्रीराम. परवा एका साधकांनी श्रीमहाराजांचे एक अप्रतिम वचन पोस्ट केले होते. ते असे- “परमार्थ मार्गामध्यें अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढें जाणारे साधक फार थोडे असतात. मोठें मोठें साधनी लोक लौकिकाच्या नादीं लागून भगवंताच्या जवळ येऊन घसरतात!” हे होऊ नये व यापासून मला दूर ठेवावे यासाठी रचलेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अप्रतिम आणि अर्थपूर्ण अभंग-

नाही सुख मज न लगे हा मान | न राहे हे जन काय करू ||
देह उपचारे पोळतसे अंग | विषतुल्य चांग मिष्टान्न ते ||
नाइकवे स्तुती वाणीता थोरीव | होतो माझा जीव कासावीस ||
तुज पावे ऐसी सांग काही कळा | नको मृगजळा गोवू मज ||
तुका म्हणे आता करी माझे हित | काढावे जळत आगीतुनी ||

~ हे देवा, मला मान नको. त्यापासून मला थोडेही सुख नाही. पण हे लोक माझा मान केल्यावाचून राहात नाहीत. त्याला मी काय करू? लोक माझ्या देहाला सुख होईल असे उपचार करतात. पण त्याने माझे शरीर पोळत आहे. गोड अन्नसुद्धा मला विषाप्रमाणे कडू वाटते. कोणी माझी स्तुती केली, माझा मोठेपणा वर्णन केला तर मला ऐकवत नाही. माझा जीव कासावीस होतो. देवा, तुझ्या ठायी मी एकरूप होईन असा काही उपाय तू मला सांग. अशी युक्ती सांग. या मृगजळात आता मला गुंतवू नकोस. देवा, आता माझ्या हिताचा विचार करा आणि मला या त्रिविध तापरूपी अग्नीतून बाहेर काढा.

~ लौकिकदृष्ट्या खरा साधक कसा असतो किंवा कसा असावा यासाठी यापेक्षा चांगला अभंग नाही असे वाटते. श्रीमहाराज म्हणत, मानाची इच्छा ही रक्तातली साखर आहे. ती दिसत नाही पण साधकाला खाली खेचते. लौकिकाला जो भुलला त्याचा परमार्थ बुडाला हे तत्त्व अतिशय सावधपणे अंगी बाणवावे. पूज्य बाबा बेलसरे यांची अफाट बुद्धिमत्ता लक्षात घेऊनच महाराजांनी त्यांना अखेरपर्यंत अमानित्वाचा अभ्यास सांगितला आणि या महात्म्याने हे व्रत आयुष्याच्या अखेरपर्यंत प्राणापलीकडे सांभाळले. जगभरात प्रसिद्धी मिळण्याची ज्याची योग्यता त्या माणसाने केवळ सद्गुरू-आज्ञा प्रमाण मानून लौकिक दृष्ट्या जिथे मान मिळाले अशा जागी जाणे देखील टाळले. ज्ञानेश्वरीत तर ज्ञानोबा सांगतात, "मला मान मिळू नये म्हणून तो साधक वेड्यासारखा वागतो".

पूज्य बाबा काय म्हणतात, “तुम्ही विचाराल हे लौकिक दृष्ट्या खरेच शक्य आहे का? तर लौकिकात तुम्हाला आपले गुण दाखवावे लागतील हे मान्य. उद्या जर तुमचा interview आहे आणि तुम्ही म्हणालात की मी माझे गुण कसे दाखवू तर तो वेडेपणा होईल. पण हे आपण अध्यात्मिक दृष्ट्या बघत आहोत ना. लोक मला विचारतात, आमचा साडेतीन कोटी जप होऊन सुद्धा का साधत नाही? तर त्यासाठी बाधक गोष्टी कमी झाल्या पाहिजेत; तर ते साधणार! आणि मानाची इच्छा ही परमार्थातील एक अतिशय बाधक गोष्ट आहे.” नाम कसेही घेतले तरी त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहात नाही हे जरी खरे असले, तरी साधक गोष्टींचा अभ्यास आणि बाधक गोष्टी सोडणे याशिवाय मनाला जी सूक्ष्मता यायला हवी ती साधणार नाही! आणि नाम सूक्ष्मातले असल्याने अखंड समाधान जे साधायचे ते त्याशिवाय साधणार नाही!

यापुढे जाऊन पू बाबा म्हणतात, ‘यासाठी सद्गुरूंची मनापासून प्रार्थना करावी, जशी या अभंगात तुकोबा करताहेत. महाराजांची खरी कृपा असेल तर या गोष्टींपासून आपल्याला परावृत्त करण्यामध्ये आहे. खऱ्या साधकाला सद्गुरू सांभाळतातच!’ श्रीराम समर्थ!!!

Saturday, May 30, 2015

श्रीसद्गुरूंनी सत्शिष्याचे नैराश्य कसे घालवले?


श्रीराम. केशवरावांच्या (पूज्य बाबा बेलसरे) वाचनात २-३ वेळा असं आलं होतं, की नर्मदा प्रदक्षिणा जर केली, तर त्याचं पुण्य फारच आहे. चित्तशुद्धीला त्याचा फार फायदा होतो. ती अर्थात पायी व्हायला हवी; म्हणजे तिचा फार फायदा आहे चित्तशुद्धीला आणि चित्तशुद्धी झाली की मग पुढचा पल्ला फार थोडा आहे. पण ही प्रदक्षिणा अतिशय कष्टप्रद आहे पण त्याची प्रचीती अजूनही लोकांना येते. तिथे अश्वत्थाम्याची भेट होते आणि नर्मदा माई सुवासिनीच्या रूपात तुम्हाला भेट देते.

केशवरावजींना देव भेटीची अनामिक तळमळ लागली होती. त्यामुळे जर ही प्रदक्षिणा आपल्या हातून झाली तर आपल्याला लवकर पल्ला गाठता येईल असे त्यांना वाटत होते. पण तेव्हा त्यांना अशक्तपणा आला होता; त्यामुळे शक्य नाही ते अशी सारखी चुटपूट मनाला लागली त्यांच्या. ही गोष्ट केशवराव काही महाराजांना बोलले नाहीत. चार-पाच दिवस सतत ही चुटपूट लागली आणि सहाव्या दिवशी ते सहज भेटले महाराजांना. महाराज काय म्हणाले, "केशवराव, अहो खालच्या यत्तेतून एकदा पास झाल्यावर पुन्हा त्या यत्तेत कुणी बसतं का? चवथी पास झालो आणि पाचवीत गेलो. मग पुन्हा कुणी चवथीत बसतो का?" तशी केशवरावांना कळेचना महाराज हे काय म्हणताहेत ते. हे एकदम म्हणाले, "महाराज आपण काय बोलताहात याचा मला उलगडा होत नाहीये." तेव्हा महाराज म्हणाले, "चारपाच दिवस चुटपूट लागल्ये ना नर्मदा प्रदक्षिणेची? त्याला अनुसरून मी बोलतोय. आता ती कष्टप्रद आहे हे मी कबूल करतो. पण तुम्ही त्याची काळजी करण्याचे कारण नाही. अहो, गेल्या जन्मी ही प्रदक्षिणा होऊन गेल्ये आपली. तुम्ही हा विचार सुद्धा मनात आणू नका. आपली ती प्रदक्षिणा झालेली आहे. त्या पुण्यायीच्या डबोल्यावरच तर तुमची नी आमची गाठ झालेली आहे. तेव्हा आता तो विचार टाकून द्यायचा आणि मी सांगतो तसं माझं होऊन रहायचं आणि नामस्मरण जोरात करायचं. बाकी विचार करत बसायचं नाही."

सद्गुरू असं नैराश्य घालवतात आणि इथे सद्गुरूंची अत्यंत जरूर आहे. केशवराव म्हणाले, "महाराजांनी हे केलं नसतं तर मी नुसता हाल काढत राहिलो असतो. मनाची चरफड होत राहिली असती. पण शांत झालं मन आणि नामस्मरणाला जोर आला." अजून सुद्धा बऱ्याच जणांचा हा अनुभव आहे की आपल्याला नैराश्य आलं तर सद्गुरू ते घालवतात!

~ पूज्य श्री बापूसाहेब मराठे यांच्या प्रवचनातून

खरा दाता कोण हे सांगणारा तुकोबांचा एक अप्रतिम अभंग!


श्रीराम!

दाता तोचि एक जाणा | नारायणा स्मरवी ||
आणीक नाशिवंते काय | न सरे आय ज्याच्याने ||
यावे तया काकुलती | जे दाविती सुपंथ ||
तुका म्हणे उरी नूरे | त्याचे खरे उपकार ||

~ जो संत सत्पुरुष साधकाला नारायणाचे स्मरण करवितो, तोच एक दाता आहे असे समजावे. जे कुणी इतर वस्तू दान देतात व ज्याने याचकांची तळमळ जात नाही, त्या इतर नाशवंत दानाची काय किंमत आहे? जे सन्मार्ग दाखवतात अशाच संतांपुढे काकुळती यावे. ज्यांच्या दानामुळे याचकाला कोणतीही इच्छाच राहत नाही व जीवदशा शून्यवत होते त्या दात्याचे खरे उपकार आहेत!

~~ वरील अभंग वाचल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर आपल्या श्रीसद्गुरूंची मूर्ती आली असेल हे नक्की! कारण सद्गुरुशिवाय असा दाता कोण असणे शक्य आहे? व्यवहारातला गुरू श्रेष्ठ खरा पण पारमार्थिक गुरू श्रेष्ठतम हे निश्चित! किंबहुना सद्गुरू भेटल्याशिवाय जीवाची तळमळ शांत होणे अशक्य.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज गुरु निवृत्तीनाथांना 'दातारू' असे संबोधतात. यावर श्रीमहाराजांचे विवरण अप्रतिम आहे. पूज्य बाबांनी जेव्हा त्यांना "दातारू" या शब्दामागचे रहस्य काय असा प्रश्न विचारला, तेव्हा ते म्हणले, दाता हा खरा दाता केव्हा होतो? जेव्हा घेणारा पात्र असतो तेव्हा! निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांसारखा शिष्य लाभला तेव्हा ते खरे दाता झाले. 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी' अशी अवस्था साधकाची होऊ नये हे सांगण्याचा उद्देश श्रीमहाराजांचा यामागे होता. हिंग-जिऱ्याचं गिऱ्हाईक न होता खरी वाटचाल साधक मार्गावरून व्हावी व 'लौकिकाला बळी न पडता' आपल्या ध्येयावर व सद्गुरूंच्या शब्दांवर दृढनिष्ठा हवी!

पाळशील लळे दीन वो वत्सले | विठ्ठले कृपाळे जननिये ||


श्रीराम! संतश्रेष्ठ तुकोबांचे अत्यंत निष्ठापूर्ण असे विठ्ठलाबरोबरचे बाल्यभावातले एक गोड हितगुज --

पढिये ते आम्ही तुजपाशी मागावे | जीवीचे सांगावे हितगुज ||
पाळशील लळे दीन वो वत्सले | विठ्ठले कृपाळे जननिये ||
जीव भाव तुझा ठेवियेला पायी | तूचि सर्वां ठायी एक आम्हा ||
दुजियाचा संग लागो नेदी वारा | नाही जात घरा आणिकांच्या ||
सर्व सत्ता एकी आहे तुजपाशी | ठावे आहे देसी मागेन ते ||
म्हणउनि पुढे मांडियेली आळी | थिंकोनिया चोळी डोळे तुका ||

~~ हे भगवंता, आम्हाला जे आवडते, ते आम्ही तुझ्याकडेच मागू. आमच्या जीवनातल्या सर्व गुह्य गोष्टी आम्ही तुझ्यापाशीच उघड्या करू. हे दीनदयाळा भक्तवत्सल पांडुरंगा, तू माझी आई आहेस! तू माझे लाड आवडीने पुरवशील! आम्ही आमचा जीवभाव तुझ्या पायी अर्पण केला आहे. तूच आम्हाला सर्व ठिकाणी आसरा आहेस. दुसऱ्याचा संग आम्हास लागूच नये; दुसऱ्याबद्दलची गोडी आमच्यात निपाजुच नये. दुसऱ्याच्या घरी जायचा विचारही आम्हाला शिवू नये. कारण तू सर्व सत्ताधीश आहेस. मी जे काही मागेन ते तू मला देशील याची पक्की खात्री मला आहे. हो ना विठ्ठला? म्हणूनच तुझ्यापाशी मी हट्ट धरला आहे आणि डोळे चोळीत रडत आहे!

श्रीमहाराज, संत एकनाथ यांसारख्या संतांचे वैशिष्ट्य काय?


श्रीराम. श्रीमहाराज, संत एकनाथ यांसारख्या संतांचे वैशिष्ट्य काय? तर प्रपंचात राहून परमार्थ साधायला यांनी शिकवलं. किती प्रचंड अन्नदान यांनी केलं! प्रपंची राहून आत्म्याचे अनुसंधान जपले जाऊ शकते याचे उदाहरण म्हणजे हे संत. महाराज तर म्हणायचे, काय चोरांनी लावलाय प्रपंच? तुम्ही अग्नी-ब्राह्मणांच्या समोर लग्न केलेत ना? त्यात वावगे काय आहे? महाराज म्हणजे आनंदमूर्ती. त्यांना हसून खेळून संसार करणारे नवरा बायको, आनंदाने राहणाऱ्या सासू सुना पाहिल्या की मनापासून आनंद होई. याला समग्र दृष्टीकोन म्हणतात. Holistic View! किंबहुना महाराज म्हणत, एखादा बैरागी आहे आणि त्याने साधना केली व एक प्रपंची आहे त्याने प्रपंचात राहून साधना केली; भगवंताला दुसरा जास्त आवडेल. कारण प्रपंच सोपा नाही. त्यात पावलापावलावर तुम्हाला शिकवण्यासाठी सुखदुःखाच्या घटना आहेत. म्हणून त्यात अनुसंधान टिकवणारा खरा श्रेष्ठ!

अनुसंधान कधी जमेल? जेव्हा तुम्ही भगवंताच्या अस्तित्वावर निष्ठा ठेवून लक्ष पुरवाल तेव्हा! त्यासाठी प्रपंचातल्या गोष्टीदेखील व्यवस्थित करणे जरूर आहे. प्रपंच कसातरी करून आम्ही अध्यात्माकडे लक्ष पुरवू म्हणणारे फसतील! महाराज म्हणत, प्रत्येक कर्म मनापासून करायला शिकावे. महाराज म्हणत असत की अगदी जेवायचे असले तरी मनापासून जेवावे, बोलायचे आहे ना तर अगदी मनापासून बोलावे, अभ्यास करायचा आहे ना, तर मनापासून करावा. कोणतीही गोष्ट असो, आपल्या मनाला अशी सवय लावून घ्यावी की ती अगदी मनापासून करावी, तरच भगवंताचे नामस्मरण मनापासून होईल.

अध्यात्मिक मनुष्य हा सदैव आनंदी असला पाहिजे. माझ्या अनुभवाने मी सांगेन, माझ्या साधनेत काव्य, संगीत, विनोद यांमुळे एक रसमय प्रसन्नता आली आणि ती वाढतच गेली. विनोद हा तर माझ्या साधनेचा घटकच होऊन बसला. अशा आनंदी वृत्तीत मनापासून नामाचा अभ्यास झाला तर साधकाची प्रगती व्यवस्थित होईल आणि वृत्ती समाधानी राहील!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे

प्रेमसूत्र दोरी | नेतो तिकडे जातो हरी ||


श्रीराम. भगवंताच्या / सद्गुरूंच्या भक्तीने बांधला गेलेला भक्त कसा त्यांना संपूर्ण अर्पण होतो याचे अत्यंत सुरेख वर्णन तुकोबांच्या या अभंगात!
प्रेमसूत्र दोरी | नेतो तिकडे जातो हरी ||
मनेसहित वाचा काया | अवघे दिले पंढरीराया ||
सत्ता सकळ तया हाती | माझा जीव काकुळती ||
तुका म्हणे ठेवी तैसे | आम्ही राहो त्याचे इच्छे ||
~ श्रीहरीविषयी भक्ताच्या ठायी असलेले प्रेम ही एक प्रेमाची दोरी आहे. भक्त भगवंताच्या मागे जाईल यात नवल ते काय; पण इथे प्रेमसूत्राने बांधला गेलेला भगवंत भक्त नेईल तिकडे जातो. पण हे उगीच घडत नाही. त्यासाठी भक्ताने त्याला मन, काया, वाचा सर्वच्या सर्व अर्पण केलेले असते. तुकोबा म्हणतात, अहो सर्वसत्ताधीश आहे तो! सर्वस्व अर्पिल्यावर त्याला माझी दया येणार नाही का? तो जसे ठेवील तसेच आम्ही राहू!
~ मन अर्पण केले! म्हणजे सगळ्या व्यथेचे मूळच अर्पण केले. मन एव कारणं बंध
मोक्षयो:| हे जर खरे तर सर्व ताप त्या मनाचाच आहे. अजून एके ठिकाणी जसे तुकोबा म्हणतात, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली! तेव्हा हे षड्विकार ज्याच्यात आहेत ते मन त्याला अर्पण केल्यावर माझे असे उरले काय? श्रीमहाराज जेव्हा सांगतात, तुमच्या काळजीचं गाठोडं रामाच्या पायापाशी ठेवून जा, त्यात हाच अर्थ आहे! महाराज म्हणतात, मला स्वतःचा संसार करता आला नाही पण मला दुसऱ्याचा संसार मात्र चांगला करता येतो, पण काय करू, कुणी माझ्यावर सोपवीत नाही! कोण म्हणेल असं? आपल्या प्रपंच आणि परमार्थाची जबाबदारी एवढ्या छातीठोकपणे कोण घेईल? हे जर साधले नाही आपण तर खरेच "अदृष्ट उभे ठाकले पण म्या दार लावूनि घेतले" अशी आपली अवस्था होईल.
परमपूज्य बाबा अनेक ठिकाणी प्रवचनात सांगतात ते आपण ऐकलेच आहे- आपण महाराजांना अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज अशा पदव्यांनी गौरवितो ते तसे ते खरेच आहेत म्हणून गौरवितो ना? मग त्यानुसार आपण वागले पाहिजे, तरच आपल्या बोलण्याला अर्थ राहील. भाऊसाहेब जेव्हा म्हणतात, त्यांच्या कानावर घातलं की आपली जबाबदारी संपली! ह्यात खरे मर्म आहे. पू. बाबा म्हणतात तसे आपण कानावर घालतो पण जबाबदारी संपवत नाही. ते करतील की नाही ही शंका मन पोखरत राहते. मग यास निष्ठा म्हणणे योग्य का? अहो ती आई आहे ना? मग आईस सांगण्याची गरज असते का? फक्त एवढेच की त्या आईला आपल्या अंतिम हिताची खरी इच्छा असते आणि त्यामुळे ती आपल्या हिताचे असेल तेच करील. भाऊसाहेब म्हणत ना, महाराजांना कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुम् अशी शक्ती आहे. फक्त एकच गोष्ट त्यांच्या शक्ती बाहेरची आहे ती म्हणजे त्यांना कधी कुणाचे अकल्याण करता येत नाही! यापरते पाहिजे ते काय? तेव्हा त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे म्हणजे शरणागती होय आणि ती साधणे म्हणजे परमार्थ मार्गावर खरी वाटचाल करणे होय! श्रीराम समर्थ!!!

तुका म्हणे भाव | शुद्ध बरा सोंग वाव ||


श्रीराम. साधकाच्या दृष्टीने अतिशय मार्मिक आणि आचरणयोग्य असा तुकोबांचा अजून एक अभंग-
अवगुणांचे हाती | आहे अवघीच फजिती |
नाही पात्रासवे चाड | प्रमाण ते फिके गोड ||
विष तांब्या वाटी | भरली लाऊ नये होटी |
तुका म्हणे भाव | शुद्ध बरा सोंग वाव ||

~ श्रीराम. तुकोबांच्या अभंगांचे अर्थ लावताना श्रीमहाराज म्हणत की नेहमी दुसऱ्या ओवीपासून सुरुवात करावी, म्हणजे अर्थ जास्त नीट लागतो. त्याबरहुकूम- ज्या भांड्यात पदार्थ असतो, ते भांडे महत्त्वाचे नसून त्यातला रस फिका आहे की गोड हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वतःच्या अंगच्या अवगुणांची जाणीव होणे हे अतिशय महत्त्वाचे. तरच मुमुक्षत्वाकडून साधकत्वाकडे बिनधोक प्रवास होतो. अवगुण बाळगल्याने अवघी फजिती होते याचा अनुभव आपण घेतलेला असतो. तो अनुभव आत मुरून त्यावर इलाज करावा अशी मनापासून इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. त्यातल्या त्यात सद्गुरूंच्या ताब्यात गेल्यावर अवगुणांची जाणीव होऊ लागली आणि त्यांना हे आवडत नाही हे जाणवू लागले की अजून ओशाळलेपणा येतो आणि हा भावच आपल्याला पुढे तारू शकतो. पूज्य तात्यासाहेबांसारखी व्यक्ती म्हणायची, हातून चूक झाली तर फोटोमध्ये महाराजांच्या डोळ्याला डोळा लागत नाही! काय भाव असेल!

तेव्हा चांगल्या वाईट धातूच्या भांड्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही; त्यातील चांगला रस घ्यावा आणि वाईट टाकावा. पण हे दुर्गुण टाकण्याबरोबर सद्गुण अंगी बाणवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूज्य बाबा बेलसरे तर म्हणत, आपल्या दुर्गुणांकडे देखील साधकाने फार लक्ष पुरवू नये. एकदा ते त्यागण्याचा अभ्यास सुरु झाला की आपल्यातले चांगले गुण वाढवण्याचा अभ्यास करावा; तरच साधनात शांतपणा येईल. इथे लौकिक दृष्ट्या असलेले दुर्गुण या अर्था बरोबरच साधनातील व्यग्रता जी अति वाचनाने, निरनिराळ्या माध्यमांमुळे वाढते तेही अभिप्रेत असावे. चांगले घ्यावे, पण चांगले कोणते ते कसे ठरवावे? जे ऐकले, जे वाचले, ते आपल्या सद्गुरूंच्या (ज्येष्ठ संतांच्या) सांगण्याशी किती जुळते, याचा विचार करून ते घ्यावे किंवा त्यागावे याचा विचार व्हावा असे पू. बाबा म्हणतात. यासाठी अर्थातच आपल्या सद्गुरूंचे विचार ही आपल्यासाठी काळ्या दगडावरची रेघ झाली पाहिजे! पू. बाबांचे एक वाक्य हृदयात कोरून ठेवण्यासारखे आहे- तुम्ही काय वाट्टेल ते वाचा; पण आपले सद्गुरू जे सांगतात त्याच्याशी ते विसंगत असेल, तर ते कितीही बरोबर वाटो, कधीच चिंतनाचा विषय ठरू नये!

तांबे पवित्र असते, पण तांब्याची वाटी विषाने भरलेली असेल, तर तांबे पवित्र म्हणून विष पिऊन चालेल का? तेव्हा काही चांगला विचार असेलही पण जर तो आपल्या निष्ठेशी विसंगत असेल तर ग्रहण केलाच पाहिजे असे नाही! शेवटचा चरण नेहमीप्रमाणे Crux आहे. आपले अवगुण ध्यानात येऊन त्यांची सुधारणा झाली तरच शेवटच्या ओळीत तुकोबांना अपेक्षित असलेला शुद्ध भाव साधेल. परमार्थात शुद्ध भाव, पवित्रता, भगवंताबद्दल उदात्त भावना यांनाच खरे महत्त्व आहे. ते नसेल तर नुसते शाब्दिक अवडंबर काय कामाचे? सोंग वाव!! महाराज देखील म्हणायचे- तुम्ही काही परमार्थ करू नका, नाम घेऊ नका, देवाला मानू नका पण ढोंग करू नका! तेव्हा अवगुणांचा त्याग, आत्मानात्मविवेकासहित साधना आणि शुद्ध भाव यांना गाठीशी धरूनच हा प्रवास करायचा आहे! श्रीराम समर्थ!!!

आपुलाले तुम्ही करा रे स्वहित| वाचे स्मरा नित्य राम राम||



श्रीराम. कोणतीही साधना न करता "हे करून काय होणार आहे?" असा सवाल करणाऱ्या लोकांसाठी संतश्रेष्ठ तुकोबांचा हा अभंग. केल्याशिवाय त्याच्यातले सुख कळणार कसे? नाम घेतल्याशिवाय नामाने साधणारे समाधान मिळणार कसे? प्रत्यक्ष अनुभव घेणेच महत्त्वाचे!

अन्नाच्या परिमळे जरि जाय भूक| तरी का हे पाक घरोघरी||
आपुलाले तुम्ही करा रे स्वहित| वाचे स्मरा नित्य राम राम||
देखोनि जीवन जरी जाय ताहान| तरी का साठवण घरोघरी||
देखोनिया छाया सुख न पाविजे| जंव न बैसीजे तया तळी||
हित तरी होय गाता आइकता| जरि राहे चित्ता दृढ भाव||
तुका म्हणे होसी भावेचि तू मुक्त| काय करिसी युक्त जाणिवेची||

अहो, शिजलेल्या अन्नाच्या वासाने जर भूक भागली असती, तर लोक घरोघरी स्वैपाक करून भोजन कशासाठी करत असते? प्रत्यक्ष अनुभवला महत्त्व आहे, म्हणून अहो परमार्थी जन, वाणीने नित्य रामराम म्हणून, रामाचे स्मरण करून आपले हित साधून घ्या. जर पाणी पाहूनच तहान भागात असतो तर लोकांनी घरोघरी नुसते पाणी साठवले नसते का? वृक्षाची नुसती सावली पाहून सुख मिळत नाही; त्या सावलीखाली बसल्यानेच त्यातले सुख अनुभवास येते. तेव्हा श्रीहरीचे गुण गाणे ऐकणे याविषयी चित्तात दृढ भाव राहिला तर हित साधेल. ज्ञानाच्या अहंकाराला धरून काय मिळवशील? अरे, तू केवळ एकनिष्ठ भावानेच मुक्त होशील!

पैशाचा आधार वाटू नये!


श्रीराम. सद्गुरूंवर श्रद्धा हा साधकाचा खरा आधार असतो. त्या आधाराला धक्का लागणे म्हणजे त्याचे साधकपण डळमळणे होय. पैशाची मौज अशी आहे की तो स्वतः काहीच मागत नाही किंवा म्हणत नाही. म्हणून साधक त्याच्यावर जितका भरवसा ठेवतो तितका साधकाला त्याचा आधार वाटतो. पैशाचा आधार वाटू लागला की ईश्वराचा अथवा सद्गुरूचा आधार क्षीण होतो. हे फार मोठे विघ्न आहे. यापासून साधकाने जपून असावे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे

नेहमी नामस्मरण जीवनाच्या केंद्रस्थानी!


श्रीराम. नामस्मरण जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून व्यवहार सांभाळावा. म्हणजे मन रूपांतरित होऊन स्वरूप अनुसंधानात स्थिर होईल.

~ परमपूज्य बाबा बेलसरे

जगातील अध्यात्म सांभाळणारी व्यवस्था!


श्रीराम. या जगात अध्यात्म सांभाळणारी एक व्यवस्था आहे. ती व्यवस्था टिकवणारी ईश्वरशक्ती वेळोवेळी थोर महात्म्यांना पृथ्वीवर मानव समाजात जन्मास घालते. त्या महात्म्यांच्या बरोबर त्यांच्या कामाला उपयोगी पडणारी अशी माणसे जन्माला येतात. ती माणसे समाजातील साधकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मार्गांनी सहाय्य करतात. साधकांना जी मदत मिळते तिचा दुहेरी परिणाम होतो. त्या मदतीने साधकाचे स्वरूपानुसंधान वर्धमान राहते हे तर खरेच, पण त्याच्या जगण्याचे क्षेत्र व्यापक होऊन अनेक स्त्रीपुरुष अध्यात्माकडे वळतात. अध्यात्माची ही पार्श्वभूमी गूढ आहे पण ती अत्यंत खरी आहे यात शंका नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे

आत्मसमर्पणाने सद्गुरुच्या प्रेमामध्ये सतत डुंबत राहण्यातले समाधान !!!


श्रीराम! सद्गुरू भेटण्याच्या आधी साधकाला दृश्याचे प्रेम असते. ते प्रेम असते म्हणून इंद्रियांना सुख देणाऱ्या वस्तू व व्यक्ति यांच्यासाठी त्याचे चित्त विरघळते. असे द्रवित झालेले चित्त त्या व्यक्तींशी कमीजास्त तदाकार होते. त्या तदाकारपणामध्ये क्षणभर रसाचा म्हणजे आनंदाचा अनुभव येतो. पण ती व्यक्ति अपूर्ण, अनित्य व अस्थिर असते. म्हणून तिच्याशी कायम तदाकारता होऊ शकत नाही. त्यामुळे रसाचा अभाव होतो. रसाचा अभाव झाला की जीव दुसरी व्यक्ति शोधतो. ही क्रिया जन्मभर चालते.

याच्या उलट आत्मदर्शनाने आत्मस्वरुप झालेला सद्गुरू स्वतः रसस्वरूप म्हणजे आनंदस्वरूप असतो. त्याच्याशी साधक-शिष्याचा प्रेमाचा संबंध आला तर साधकाचे चित्त विरघळते. चित्त विरघळले की ते त्याच्या-सद्गुरूच्या आनंदमय अंतःकरणाशी तदाकार होते. तेथे कोणत्याही प्रकारचा अभाव, अस्थिरपणा व उणेपणा अनुभवास येत नाही. याचा प्रत्यक्ष परिणाम असा होतो की सद्गुरूच्या प्रेमात सतत डुंबत राहण्यामध्ये साधकाला एक निराळेच समाधान मिळते.

*** हे समाधान दाखवता येत नाही. त्यामुळे गुरुशिष्यसंबंधामधे व्यवहार दृष्ट्या एक विरोधाभास दृष्टीस पडतो. तो हा की सद्गुरू शिष्याला काहीतरी देतात यात शंका नाही. पण काय देतात ते शिष्याला सांगता येत नाही smile emoticon पण रसाने डबडबलेले अपूर्व समाधान सद्गुरूकडून शिष्याला मिळते एवढे मात्र खरे! ***

जी परिस्थिती असेल तिच्यामधे पूर्ण समाधान राहणे ही सद्गुरूची देणगी असते ही खूण साधकाने मनाशी बाळगावी!!!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा)

Saturday, May 16, 2015

नामस्मरणाने अंतर्मुखता व चित्तशुद्धि!!!


श्रीराम. आत्मस्वरूपाचे अविरत स्मरण ठेवण्याची सवय अंगी जिरवताना अनात्म वस्तूंचे विस्मरण करण्याचा प्रयत्न करावा लागतो. अंतर्मुख होण्याची ही पहिली पायरी समजावी.

परंतु आत्मस्वरूपाचे स्मरण ठेवण्याचा मनाचा स्वभाव झाल्यानंतर सर्व अनात्म दृश्य वस्तूंपासून साधकाचे मन विनासायास परावृत्त होते. अंतर्मुख होण्याची ही दुसरी पायरी होय. या पायरीवर रूपांतरित झालेले मन ज्या देहामध्ये राहाते तो देहदेखील बदलतो.

त्याचे असे होते, की नामस्मरणाच्या अविरत पुनरावृत्तीने प्रथम मेंदूमधील पेशींवर स्मरणाचा म्हणजे नामाचा छाप उमटतो. त्याच अखंड स्मरणाने रक्तातील पेशींमध्ये सुप्त असणारी जाणीव जागी होते. ती जाणीव जागी झाली की मूलाधार, स्वाधिष्ठान आणि बेंबीपाशी असणारे सूर्यचक्र यांची हालचाल आरंभ पावते. ती हालचाल करणाऱ्या शक्तिला योगशास्त्रामध्ये कुंडलिनी असे नाव आहे.

*** शरीरातील तम आणि रज यांना शुद्ध करून सत्वाची वाढ करणे हे नामस्मरणाने जागी झालेल्या कुंडलिनीचे खरे कार्य आहे ***

रज आणि तम शुद्ध होऊन सत्व वाढला की तो पारदर्शक बनतो. त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाचे पडणारे प्रतिबिंब स्वच्छपणे दिसते. यासच अध्यात्मामध्ये चित्तशुद्धि म्हणतात! असा चित्तशुद्धि झालेला साधक गुरुकृपेला पात्र होतो व त्याचे नाम अखंड चालू लागते!!!

~ परमपूज्य बाबा बेलसरे

Friday, May 15, 2015

साधकाला अंतर्मुख व्हायला शिकवणारा सद्गुरू कसा असतो?


साधकाला अंतर्मुख व्हायला शिकवणारा सद्गुरू कसा असतो याचे पूज्य बाबा बेलसरे यांनी दिलेले अतिशय रम्य वर्णन -- साधकांना हे वाचल्यावर आपल्या सद्गुरुंबद्दल अधिकाधिक प्रेम उफाळून येईल याची खात्री वाटते. श्रीराम समर्थ!

श्रीराम. सद्गुरू कसा असतो याचे आपल्याला कुतूहल वाटणे साहजिक आहे. सद्गुरू हा अखेर आत्मदर्शन झालेला माणूसच असतो. बाहेरून बहुधा तो शांत, स्तब्ध व अनासक्त असतो. पण त्याचे अंतःकरण करुणेने भरून वाहते. त्याला दिव्यदृष्टी असल्यामुळे त्याच्या नजरेमध्ये काहीतरी विशेषपण आहे हे लक्षात येते. त्याच्याकडे येणाऱ्या माणसाचे अंतरंग त्याला दिसते. त्याच्याभोवती मनाला समाधान देणारे, अस्वस्थ मन शांत करणारे, मनाला निर्भय करणारे एक शीतल वातावरण असते. शरीराच्या दृष्टीने पाहिले तर तो इतर माणसांसारखा माणूस दिसतो. पण तो नुसता माणूस असत नाही. तो माणूस आणि ईश्वर यांचे एक मनोहर मिश्रण असतो. त्याला अज्ञात असे काही उरत नाही. पण त्याच्या ज्ञानाची आणि सामर्थ्याची कल्पना येण्यास श्रद्धेने त्याचा सहवास घडावा लागतो. सद्गुरूच्या केवळ नजरेने, स्पर्शाने, प्रसादाने, त्याने दिलेल्या नामाने किंवा त्याने केलेल्या विचार संक्रमणाने साधकाचे अंतरंग नकळत रूपांतरित होण्याच्या मार्गाला लागते.

सद्गुरूंनी शिष्याला दीक्षा देणे / अनुग्रह देणे म्हणजे फार मोठी जबाबदारी स्वीकारणे होय. शिष्याच्या गत आयुष्यातील पापपुण्याची जबाबदारी सद्गुरू घेतो यात नवल नाही. पण शिष्याला आत्मदर्शन होईपर्यंत त्याचे भविष्यकालीन जीवन सद्गुरू आपल्या सत्तेखाली घेतो. यामध्ये सद्गुरूचे खरे थोरपण सापडते. उरलेल्या या आयुष्यामध्ये आणि नंतर येणाऱ्या जन्मांमध्ये शिष्याला आत्म्याची विस्मृती होणार नाही हे सद्गुरूच्या कृपेचे लक्षण आहे. ती स्मृती जिवंत राहण्यास शक्ती लागते. तेवढी अध्यात्मिक शक्ती दीक्षा देताना सद्गुरू शिष्याच्या अंतरी स्थापन करतो.

सद्गुरूने साधकाच्या अभ्यासाला जे अध्यात्मिक वळण दिलेले असते त्याचे प्रधान लक्षण पुढीलप्रमाणे आहे- साधकाचे अंतिम ध्येय जे आत्मदर्शन ते आरंभापासून सूक्ष्मरूपाने त्याच्या अभ्यासात ओवण्याची व्यवस्था सद्गुरू करतो. आरंभी ते ध्येय सुप्त व गुप्त असते. त्याची खंडित जाणीव असते. पण प्रथम अभ्यासामध्ये ती जाणीव अखंड टिकू लागते. नंतर अभ्यासच जागेपणाला व्यापू लागतो. अर्थात आत्मस्मृती जागेपणी अखंड टिकते. मग पुढच्या दोन अवस्थांमध्ये - म्हणजे स्वप्न आणि गाढ झोप यांमध्ये - ती आपोआप झिरपते. यासच अखंड स्वस्वरूप अनुसंधान म्हणतात. अनुसंधानाची ही स्थिती गाठली की साधकाच्या अभ्यासाची सीमा गाठली असे निश्चित समजावे. त्या पातळीवर साधकाचा दृश्याशी संबंध सुटतो. तेथे साधक शरणागतीच्या दाराशी येतो!

वैराग्य ही साधकाच्या जीवनाची खरी शोभा आहे!


श्रीराम. अध्यात्मामध्ये मनाची जागृती म्हणजे "मी देहाचा नसून आत्म्याचा आहे" हे भान बाळगणे. ते बाळगण्यास भगवंताच्या नामाचे स्मरण ठेवण्यासारखा दुसरा सहज पचनी पडणारा मार्ग नाही. नामस्मरणाने स्वतःच्या देहाची आसक्ती सुटते. देहाची आसक्ती क्षीण झाली की सर्व दृश्याची आसक्ती शून्य होते. साधकाने आपल्या अंगच्या वैराग्याचे मोजमाप स्वतःच्या देहाबद्दल वाढणाऱ्या अनासक्तीवरून करायचे असते.
स्वदेहाच्या वैराग्याने संपन्न माणूस खाणेपिणे, पैसाअडका, मान व सत्कार, लौकिक व प्रतिष्ठा, स्तुती व कीर्ती या गोष्टींना यत्किंचितही भुलत नाही. वैराग्यवान साधकाचे सर्व लक्ष हृदयस्थ आत्मस्वरूपाच्या चिंतनात गुंतून राहते. त्या चिंतनाच्या नादात जन्म घालवणे हे वैराग्याचे फलित आहे. वैराग्याचा उदय झाला की कोणतेही शरीरसुख साधकाला आकर्षित करीत नाही. त्याचप्रमाणे कोणतेही शरीरदुःख त्याला उदास करू शकत नाही.

*** "आज नाही पण उद्या आपण सुखी होऊ" ही कल्पनाच गळून पडते. मानवीजीवनात असे काही उरत नाही, की जे मिळाले नाही तर जीवन व्यर्थ होईल. वैराग्य ही साधकाच्या जीवनाची खरी शोभा आहे. साधकाचे ते अध्यात्मिक ऐश्वर्य आहे! ***

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाचे अभ्यासाची रूपरेषा)

आत्म्याशी मन जोडण्यास सोपे जावे यासाठी संतांनी वापरलेला उपाय!


श्रीराम. साधनात आपल्याला देहाकडे जोडलेले मन काढून आत्म्याकडे जोडायचे आहे. आत्म्याशी मन जोडण्यास सोपे जावे यासाठी संतांनी वापरलेला पुढील उपाय साधकाच्या उपयोगी पडतो --

साधकाने असे समजावे की आपले जीवन म्हणजे ईश्वराने मांडलेला खेळ आहे. खेळ चालू असता कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल घटना घडतात. त्या घटनांवरून ईश्वराचे कर्तेपण जीवनात कसे काम करते हे शिकायला मिळते. त्या खेळाचे पर्यवसान परमानंदाच्या अनुभवामध्ये घडून येणारे असते. म्हणून जे जे घडेल त्यामध्ये आनंदाची झलक अनुभवण्याचा अभ्यास करावा.

ईश्वराला किंवा सद्गुरूला आपल्या जीवनाचा खेळ त्याला हवा तसा खेळू देण्यात एक सात्विक धाडस साठवलेले आहे. साधकाच्या साधनाचे सारे पथ्य त्या धाडसामध्ये साठवलेले आहे असे म्हणणे योग्य होईल. या धाडसाला संशयाने धक्का लागतो. तो संशय मृतप्राय करून ठेवावा. त्यासाठी ईश्वराच्या नामस्मरणाची मदत घ्यावी. संशयाला मृतप्राय करणे हेच नामाचे सामर्थ्य आहे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा)

साधकाच्या अभ्यासाचे रहस्य!




श्रीराम! साधकाच्या अभ्यासाचे रहस्य इतकेच सांगता येईल की अभ्यास म्हणजे आत्मस्मरणाची अविरत पुनरावृत्ती होय. या मार्गालाच संत नामस्मरण असे म्हणतात. हा मार्ग मोठा कुशल व सरळ आहे. त्यामध्ये कष्ट नाहीत व अडचणी नाहीत. तथापि साधकाच्या वेडेपणाने, अविवेकाने अडचणी निर्माण होतात. नामस्मरणमधे इतरांना उपद्रव नाही. तर्काची गुंतागुंत नसल्याने मार्ग अगदी सहज आहे. म्हणूनच त्याच्यावर मन जडणे कठीण जाते. स्मरण स्वभाव बनण्यात खरे मर्म आहे. हवे तेव्हा हवे तितका वेळ अंतर्मुख राहता येणे ही स्मरण स्वभाव झाल्याची खूण आहे.

~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा)

लौकिकापासून साधकाला फार जपावे लागते!!


श्रीराम. लौकिकापासून साधकाला फार जपावे लागते. आपण खूप लवकर लौकिकाच्या जाळ्यात अडकतो. कुणी आपला मान केला की आपण त्याच्यावर प्रेम करू लागतो. कुणी मानसन्मानासाठी घरी अगत्याने बोलाविले तर आपण त्याच्यावर अधिक प्रेम करू लागतो. हे जाळे इतके गुंतागुंतीचे आहे की निदान साधकाने त्यापासून अतिशय जपून राहणे आवश्यक आहे. मुळात आपला "मी" मोठा असतो; तो अशा रीतीने अजून वाढवणे म्हणजे अध्यात्मिक संकटालाच बोलाविणे होय. समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधातून तर मानासाठी कोणत्याही समारंभास जाणे देखील टाळावे असे आवर्जून सांगतात.

पूज्य बाबांना अनेक लोक ते अशा लौकिकात न अडकल्याने त्यांना गर्व आहे अशी चुकीची समजूत करून घेत. पण हा गर्व नसे तर आपल्या साधनासाठी सांभाळलेले पावित्र्य असे. पुढे पुढे पूज्य बाबा आपल्या मुलास सांगत समारंभास जो आहेर वगैरे द्यायचा त्याबाबत मला काहीही सांगू नका. मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही!

ज्ञानेश्वरीत तर ज्ञानोबा सांगतात, "मला मान मिळू नये म्हणून तो साधक वेड्यासारखा वागतो" म्हणजे लोकांना आपल्या विषयी चुकीची समजूत झाली तरी त्याला पर्वा नसते; पण तो मानाच्या जाळ्यात अडकत नाही. हे साधणे अवघड असले तरी एका खऱ्या साधकाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. खऱ्या साधकाला त्याच्या साधनापुढे दुसऱ्या कशाचेच महत्त्व नसते.

गुरुदेव रानडे यांनी आपल्या नामाच्या साधनेसाठी Viceroy बरोबर असलेल्या सभेस जाणे टाळले आणि वर म्हणाले, नामापेक्षा Viceroy मोठा आहे काय? इतके नाही जमले तरी निदान काही अंशी अमानित्व जतन करणे आपल्याला जमले पाहिजे. त्याशिवाय साधनात पुढे पाऊल पडणार नाही!

(पूज्य बापूसाहेब मराठे यांच्या प्रवचनातून)

साधनावर अढळ निष्ठा हवी!!!


श्रीराम. साधकाने आपल्या साधनावर पूर्ण निष्ठा ठेवून ते करावे. जे साधन आपण एकदा स्वीकारले, ते काही झाले तरी सुटणार नाही अशी जी मनाची घट्ट स्थिती तिला निष्ठा म्हणतात. साधनाला समग्रपणा तर हवाच. म्हणजे जीवनातील सर्व प्रकारच्या प्रसंगांमध्ये साधन चालवणे जरूर आहे. पण त्या सातत्याला निष्ठेची जोड द्यावी लागते.

साधकाची परिस्थिती त्याला नेहमी साथ देते असे नाही. त्याचे शरीर त्याच्या साधनात नेहमी सहकार्य करील असे नाही. पण आपण साधन सोडायचा प्रश्न आता उरलाच नाही,इतकेच नव्हे तर साधनाशिवाय आता जगणे शक्य नाही, अशी मनाची पक्की धारणा झाली पाहिजे. काही साधकांना ती धारणा जन्मजात असते. इतर साधकांना सतत विवेकाने व साधनाच्या चिकाटीने ती कमवावी लागते. निष्ठेचे मूळ खोल म्हणजे मनाच्या खालच्या थरापर्यंत पोचलेले असते!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा)