Translate

Saturday, October 3, 2015

ज्ञानेश्वरी अध्याय १ ला - ओवी क्र. ४९-

श्रीराम. ज्ञानेश्वरी अध्याय १ ला - ओवी क्र. ४९- (परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या ग्रंथातील सारांश) - पावित्र्याची खूण ~~

जे अद्वितीय उत्तम | पवित्रैक निरुपम |
परम मंगलधाम | अवधारिजो ||४९||

~ महाभारत हा ग्रंथ कसा आहे ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. अत्यंत पवित्र आणि अद्वितीय असा हा ग्रंथ आहे. मंगलाचे धाम आहे. याचा विस्तार केवढा प्रचंड आहे! ज्ञानेश्वर महाराजांनी नऊ हजाराच्या वर ओव्या लिहिल्या आहेत. पण पहिल्या 'ओम नमोजी' मध्ये स्फूर्तीची जी तीव्रता आहे, प्रकाश आहे, तो शेवटपर्यंत तसाच आहे. काय त्यांची प्रतिभा असेल! म्हणून "अद्वितीय, उत्तम आणि पवित्रैक निरुपम!"

पावित्र्याची खूण काय आहे, तर आपले मन मानवी दोषांतून क्षणभर तरी मुक्त होणे, हे पावित्र्याचे लक्षण आहे. जी व्यक्ती पाहिल्यावर आपल्या मनातील वासना कमी होते, मन स्वच्छ होते, ती व्यक्ती दिव्य आहे असे समजावे. त्यांच्याभोवती ते वातावरणच असते. ही प्रसन्नता साधी वृत्तीची प्रसन्नता नव्हे, तर आपले मन देहबुद्धीतून बाहेर पडते त्याची प्रसन्नता असते. अशी काही स्थाने असतात, की तेथे गेल्यावर तुम्ही स्वतःला विसरता. ही स्थाने सत्पुरुषांची असतात. तो सत्पुरुष शक्तीचा झरा असतो. सत्पुरुषांच्या पाया का पडावे, तर त्यांच्या अंगी परमात्मशक्ती प्रकट झालेली असते. त्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला पवित्र बनवतो!

No comments:

Post a Comment