Translate

Saturday, October 3, 2015

ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक. २२-

ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक. २२- (अध्याय १ ला)

श्रीराम.

"मज हृदयी सद्गुरू | जेणे तारिलो हा संसारपूरु |
म्हणौनि विशेष अत्यादरु | विवेकावरी ||"

~~ या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी एक मर्माची गोष्ट सांगितली आहे. गुरूचे अस्तित्व कशात आहे? आपण लक्षात ठेवा की गुरूने जी आज्ञा केली आहे, त्या वचनामध्ये तो आहे! आपण शब्दांवर किती विश्वास ठेवतो! जग हे शब्दांवर चालते आहे. म्हणून गुरूच्या शब्दाचे सामर्थ्य फार आहे. माझ्या हृदयामध्ये सद्गुरू अधिष्ठान आहे, यात फार जबरदस्त अर्थ आहे. माझ्या हृदयामध्ये मी नाही तर सद्गुरू आहे माझा. तो कशा रूपाने आहे? तर विवेकाच्या रूपाने आहे.

या गुरूचे कार्य काय? तर हा संसारपूरु तारिला. जगामध्ये सत्य जे आहे ते माझे गुरु. आपल्याला खरे काय आहे ते अर्थरूपाने कळवून दिले असा तो गुरु आहे. या सबंध विश्वाला जो अर्थ आहे, त्याला अरविंदांनी Divine Will असे म्हटले आहे. तो अर्थ समजणे हे विवेकाचे काम आहे. या जगात व्यवस्था आहे. या जगतामध्ये आपण आलो हे काही कार्य करण्यासाठी आलो आहोत. ते कार्य मला ईश्वराने नेमून दिलेले आहे. ते कार्य झाले की मी चाललो. तोपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही. ही गोष्ट शिकण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. ती Divine Will किंवा ईश्वराचा संकेत कळणे हे खरे परमार्थाचे मर्म आहे.

अशा रीतीने सबंध ज्ञानेश्वरीमध्ये आत्मानात्मविवेकच सांगितला आहे. हे ज्याने "केले", त्याला ज्ञानेश्वरी कळली!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)

No comments:

Post a Comment