श्रीराम. या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा किंवा कोणत्याही अध्यात्मग्रंथाचा अभ्यास कसा करावा हे सांगितले आहे; त्यामुळे सर्वांनाच ही ओवी अतिशय उपयुक्त आहे आणि परमपूज्य बाबांच्या विवेचनाने त्यास वसंत-बहर आला आहे हे निश्चित!
जैसे शारदीचिये चंद्रकळे | माजि अमृतकण कोंवळे |
ते वेचिती मने मवाळे | चकोरतलगे ||५६||
ते वेचिती मने मवाळे | चकोरतलगे ||५६||
~ शरद ऋतू म्हणजे थंडीचा काळ. त्यामध्ये पौर्णिमा आली की आकाश स्वच्छ असते. त्यात मनाला शांत करणारे चांदणे असते. कल्पना अशी आहे, की त्या प्रकाशामध्ये अमृताचे कण असतात आणि हे कोवळे अमृतकण चकोराचे जे पिल्लू असते, ते सेवन करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भाषाप्रभूच! त्यांनी म्हटले आहे, 'चकोरतलगे', तलग म्हणजे लहान पिल्लू. चकोर पक्षी आहे, तो आकाशात विहार करतो. त्या पिल्लाला मात्र उडता येत नाही, म्हणून ते जमिनीवर चालणार. तलग म्हणजे तलावर चालणारे. अतिशय नाजूक असते ते. आईने भक्ष्य आणल्यावर ते चोच उघडते, त्यात दात नसतात तर भक्ष्य ते फक्त गिळते. तसे या ग्रंथाचे सेवन करावे.
*** याचा खरा अर्थ असा की, मला भगवंताचे प्रेम नाही, मला भक्तीच्या आकाशात संचार करता येत नाही, असा मी अज्ञ आहे. त्या अज्ञानाची जाणीव ठेवून हा ग्रंथ वाचा.***
या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे आणि त्यात कोवळे अमृतकण आहेत. ते जे नाजूक नाजूक सांगितलेले आहे, ते भगवंताचे प्रेम आहे! ते मला कळत नाही असे म्हणून लहान होऊन त्याचे सेवन करा. माणसामध्ये ही शक्ती आहे की तो वयाने मोठा असला तरी, लहान मूल बनू शकतो.
***सगळे संत भगवंतापुढे मूल झाले म्हणून पोहोचले हे लक्षात ठेवा!***
उपनिषदांनी तर सांगितलेच आहे, "पाण्डित्यं निर्वेद्य, बाल्येन तिष्ठासेत्", वेद्य म्हणजे जाणणे. मला कळत नाही असे खरे वाटून जर मनुष्य बाल वृत्तीचा झाला, तर तो संतांना प्रियच होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे की, त्या चकोराच्या पिल्लासारखे जे असतील, त्यांना ज्ञानकण मिळतील!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)
No comments:
Post a Comment