Translate

Saturday, October 3, 2015

नामाच्या संगतीनं आणि त्याला सर्वोच्च मूल्य दिल्यानं प्रपंचाची बोच जाईल!



श्रीराम. एक दिवस गुरुदेव रानडे आंघोळीहून बाहेर आले. त्यांच्या भाच्यानी त्यांना सांगितलं की, सांगलीचा राजा पुस्तकासाठी (Mysticism in Maharashtra) पैसे द्यायला आलाय. गुरुदेव म्हणाले, "मी आंघोळीहून आल्यावर कशा अवस्थेत असतो, ते तुला माहीत नाही का? त्याला ९/९|| वाजता यायला सांग. १९४२ सालची ही गोष्ट; राजासमोर असं बोलायचं म्हणजे काय हो? पण साधनेची किंमत त्यापेक्षा मोठी आहे ना!

तुम्ही या मार्गाला लागता तेव्हा ते साधन प्राण आहे असं वाटलं पाहिजे. There should not be any compromise. कोणतीही तडजोड नाही! त्याकरता दृश्याचं प्रेम सुटलं पाहिजे. दृश्यात राहावं लागेल पण त्याची किंमत ओळखून राहायला हवं. जसं जर्मन तत्त्वज्ञ कान्ट म्हणतो, 'Duty for duty's sake'. कर्तव्य म्हणजे ज्या माणसाशी जो संबंध तितकीच त्यांना किंमत द्यावी. अमेरिकेला मुलं जातात; बोलावलं तरी येत नाहीत. तेव्हा वाईट वाटण्याऐवजी मी माझं कर्तव्य केलंय, ठीक आहे असं वाटलं पाहिजे. त्या कर्तव्यात भगवंताचं स्मरण असेल तर चांगलंच. समाधान राहील. ईश्वरावर श्रद्धा असल्याखेरीज तुम्ही कर्तव्य कर्तव्यबुद्धीनं करूच शकणार नाही. व्यवस्था ठेवणारा देव आहे. देह आहे तोपर्यंत प्रपंच राहणारच. त्याची बोच जायला नामाची संगत ठेवायला हवी. संगत म्हणजे, भेटून गेलेल्या माणसाबद्दल जसं वाटतं, तसं नाम घेऊन झाल्यावर संगत झाली असं वाटतं का?

श्रीमहाराज म्हणतात, नाम हा माझा प्राण आहे, तर तुम्हाला तसं वाटतं का? सगळं मर्म तिथेच आहे! मुंबईला चोऱ्या पुष्कळ होतात. पाकीट जाऊ नये म्हणून आपण त्याची संगत कशी ठेवतो? तशी नामाची राहते का? इतर वेळेला सुद्धा 'ते आहेत' ही भावना असल्याशिवाय नामाची संगत घडणार नाही. त्यातलं मर्म-- "ज्याला मी पाहतो आहे असं वाटतं, त्याच्या हातून दुष्कर्म होणारच नाही!"

~~ परमपूज्य बाबा बेलसरे

No comments:

Post a Comment