श्रीराम. आजपर्यंत आपण परमपूज्य बाबा बेलसरेंच्या ज्या ज्या आठवणी पाहिल्या त्या सगळ्या आठवणींचा मुकुटमणी ठरेल अशी ही आजची आठवण आहे पू बापूसाहेब मराठेंनी सांगितलेली! सत्शिष्य काय असतो आणि पू बाबा यांच्यावर महाराजांचे निरतिशय प्रेम का होते याचा दाखला:
“महाराज, दृश्य खरं आहे, हा जो माझा भ्रम आहे, तो घालवा” असं पू बाबा मागे लागले होते महाराजांच्या १९४२ साली. “वेळ आली की घालवू” म्हणाले महाराज. १९४४ सालच्या एप्रिल मध्ये बॉम्बस्फोट झाला मुंबईत आणि मुंबईतून पळापळ सुरु झाली. जवळजवळ पाऊण मुंबई खाली झाली. त्या वेळी पू बाबांचं बिऱ्हाड होतं हिंदू कॉलनीत दादरला. आपण या परिस्थितीत काय करावं असा प्रश्न साहजिकच त्यांना पडला आणि दोघे पती-पत्नी याबद्दल महाराजांना विचारायला आले- “महाराज, या परिस्थितीत मी काय करू? हैदराबादला जाऊ का?” तसं महाराज म्हणाले, “केशवराव, मला असं वाटतं की तुम्ही इथे येऊन राहावं माझ्याजवळ. मी अशाकरता असं म्हणतोय की माझं जे होईल ते तुमचं होईल.” पू बाबांना फार आवडलं ते. पुढे महाराज म्हणाले, “वर दोन खोल्या रिकाम्या आहेत; त्यात तुम्ही येऊन राहावं असं मी सुचवतो.” आता महाराजांनी जबाबदारी घेतलीच होती. “महाराज, मी जरूर येतो” असं केशवराव म्हणाले. पण म्हणाले, “महाराज मी इथे येऊ कसा? म्हणजे समान केव्हा आणू? काय आणू?”, तेव्हा आधी महाराज म्हणाले, “एक दोन दिवसात समान आणावं” पण पुढे परत म्हणाले, “आपल्याला समान आणायचंच नाहीये! आता असं करायचं, कपड्यानिशी तुम्ही दोघांनी इथे यायचं. जी काही तुमची महत्त्वाची पुस्तकं असतील, ३-४ तेवढी घ्यायची आणि बाकीचा संसार लुटून टाकायचा!”
काय परीक्षा आहे ही! दृश्य जगाचा मोह – भान जे आहे ते लोपायला हा उपाय आहे. पू बाबांनी दुसरं तिसरं काही केलं नाही. गेले, त्यांची काय ३-४ महत्त्वाची पुस्तकं असतील ती घेतली आणि तसेच्या तसे दोघे नवरा-बायको मालाडला आले. गुरुआज्ञा अगदी तंतोतंत पाळली त्यांनी.
मात्र यायच्या आधी घर लुटवलं. हमाल बोलावले. जी.आय.पी. च्या स्टेशनवरून, सेन्ट्रल स्टेशन वरून हमाल बोलावले. समोर गरीब लोक राहात होते. त्यांना बोलावलं आणि घर लुटायला लावलं. १-१|| तासात सगळं लुटलं गेलं. मोकळं झालं सगळं. मग मालाडला आले आणि दोघेही नवरा-बायको महाराजांना भेटले. महाराजांना भेटल्यावर महाराजांना इतका काही आनंद झाला, “केशवराव, अहो, तुम्ही माझं ऐकलंत! आज मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू! मला कसा आनंद होतोय सांगू का? एक उस्ताद असतो गाणं शिकवणारा. उस्ताद आपल्या शिष्याला गाणं शिकवीत असतो. गाणं शिकवता शिकवता त्यांना तान शिकवायची असते. एक तान, दुसरी तान, तिसरी तान अशा तो ताना शिकवीत असतो. हे शिकता शिकता एक तान शिष्य गुरूपेक्षाही चांगली घेतो. शिष्य तयारीचा असला ना तर असं होतं कधी कधी. आणि शिष्याने आपल्यापेक्षा चांगली तान घेतल्यावर उस्तादाला ज्या गुदगुल्या होतात, त्या मला आत्ता होतायत. आणि केशवराव, तुम्ही माझं का ऐकलंत सांगू का? मी माझं घर आधी लुटवलं आहे म्हणून तुम्ही माझं ऐकलंत. नाहीतर माझ्या वाणीला धारच नव्हती. मला तुम्हाला सांगायला तोंडच नव्हतं. मी आधी केले मग सांगितले. आता तुमचा दृश्यावरचा मोह जाईल. अनुभव घ्या. आता कसा लय लागतो ते बघा नामात!” केवढी कृपा झाली!
आता पू बापूसाहेबांनी बाबांना आणि वहिनींना काय विचारलं, “अहो, तुमचं धारिष्ट कसं झालं?” त्या दोघा नवरा-बायकोंनी त्यांना सांगितलं, “बापूसाहेब, सौदा फार स्वस्त होता. अहो, दृश्यावरचं भान जाणं ही काय कमी कृपा आहे का? त्याला घर लुटवणं ही प्राईस जुजबी होती. म्हणून त्याला आम्ही तयार झालो. असा मोका पुन्हा येणारे कधी? आता संधी आली याचाच अर्थ आज्ञा आहे आणि त्यांच्या कृपेने आम्ही ती संधी घेतली. आम्ही अगदी आनंदात आहोत!”
असे होते आपले पू बाबा! heart emoticon