श्रीराम. हाक मारल्यावर परमात्मा का येतो? तर ते जे अतींद्रिय तत्त्व आहे, त्याला माणसाच्या मनाचा जो भावनेचा भाग आहे तो हलवू शकतो, खाली आणू शकतो. "भाव तोचि देव". गुरुदेव रानडे भाव याचा अर्थ प्रेम असा करत. भाव याचा खरा अर्थ असणे असा आहे. "भू भवनं अस्ति". सांगण्याचा हेतू काय, तर प्रेम म्हणजे आर्तता इतकी उत्कट झाली पाहिजे की बेहद्द झाली पाहिजे. तशी द्रौपदीची झाली म्हणून परमात्मा आले. जे अतींद्रिय तत्त्व झाकोळलेले आहे त्याचा भेद करून जायला भावना उत्कट झाली पाहिजे.
महाराज म्हणत, "आपण नाम घेताना रामाला असं वाटलं पाहिजे कोण मला हाक मारतय?" आपलं अंतःकरण नाम घेताना असं रसरसत नाही. आपण पूजा करतो ती मनापासून केली आहे का? पूजा करताना फक्त तू आणि मी असं होतं का कधी? कसं आहे, माझी भावना कोणत्याही कर्मामध्ये उचंबळत नाही. आपली व्यवहारातली सवय आपण परमात्म्याकडे लावतो. म्हणूनच महाराज म्हणायचे, कोणतेही काम करताना मनापासून करा. आपली भावना खरी पेटते ते फक्त राग आला की, पण ती विध्वंसक असते. ती भावना नामाला लावता आली पाहिजे. महाराज काय म्हणत, "आपण इतकं आणि असं नाम घ्यावं की परमात्मा आपल्या घरात नाचला पाहिजे!"
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा)
No comments:
Post a Comment