भगवद्गीतेने यज्ञाची व्याख्याच बदलली आणि त्यातच त्याचं श्रेय आहे. त्याला नुसतं कर्मकांडाचं स्वरूप न राहता यज्ञ निस्वार्थीपणाला जोडला. जे जे कर्म तुम्ही निस्वार्थीपणाने करता ते यज्ञच आहे. यात आपण काय करायचं? तर, भगवंताचं स्मरण करतानासुद्धा माझी अपेक्षा काही नाही. मला पाहिजे तर तू पाहिजेस; दुसरं काही नाही. मी तुझं स्मरण करतो आहे; तुला हवं ते तू कर.
यज्ञाचा प्राण असेल तर त्याग आहे. ज्या यज्ञात त्याग नाही तो यज्ञच नव्हे. दुसरी गोष्ट असेल, तर माझ्या प्रगतीच्या आड जे येतं, ते देणं हा यज्ञाचा प्राण आहे. नाहीतर असं होतं की, काशीला जाऊन आल्यावर काहीतरी सोडलं पाहिजे, तर तुम्ही जे आवडत नाही तुम्हाला तेच सोडता. खरं म्हणजे, मला जे अत्यंत आवडतं, त्याचं प्रेम सोडणं हे यज्ञाचं दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे. तिसरं जे आहे, ते म्हणजे अंतःकरण अगदी स्वच्छ आणि निस्वार्थी पाहिजे. यज्ञ हा निष्कामच पाहिजे यात शंकाच नाही!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ३ रा)
श्राराम जय राम जय जय राम
ReplyDelete