Translate

Saturday, January 24, 2015

श्रीमहाराजांनी पूज्य बाबांचे केलेले कौतुक :-)


श्रीराम. एकदा पूज्य बाबांनी श्रीमहाराजांना एक मोठा गोड प्रश्न विचारला – “महाराज, मला जवळ ठेवून घेऊन, मला पशूतून माणसात आणून माझ्या जीवनाचे आपण सोने केले आहे.” यावर महाराज म्हणाले, “केशवरावजी, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे; मला काय याचं श्रेय देता?” बाबांना काही अर्थ कळेना. मग महाराज म्हणाले, “सांगू का कसं श्रेय तुम्हाला ते?

असं बघा, एक शिल्पकार असतो. त्याला मूर्ती घडवायची असते. मूर्ती वेगवेगळ्या असतात. रामाची, शिवाची, कृष्णाची. तेव्हा ज्या शिल्पकाराला जी मूर्ती घडवायची असेल, त्याप्रमाणे तो दगड निवडतो आणि तो दगड घेऊन आपल्या दुकानासमोर टाकून देतो. तो दगड तिथे पडून राहतो. जेव्हा जेव्हा शिल्पकाराला काम करायचे असेल तेव्हा तेव्हा तो दगड आत घेतला जातो आणि मग छिन्नी हातोडा घेऊन तो काम सुरू करतो. तसे तुम्ही पडून राहिलात; म्हणून श्रेय तुम्हाला आहे. तुम्ही पडून राहिला नसतात तर मी काय करणार होतो?

आता याच्या पुढे शिल्पकार काय करतो? छिन्नी हातोडा घालून त्या दगडातून ढलपा काढतो. आकार देताना दगडाचे ढलपे काढावेच लागतात. एकदा तो ढलपा काढून टाकला ना की तो दगडाला पुन्हा चिकटत नाही. हे जसं, तसं जो जो ढलपा वृत्तीचा तुमचा मी काढला, तो तुम्ही पुन्हा चिकटवून घेतला नाहीत. इतर बरेच लोक तो ढलपा पुन्हा चिकटवून घेतात. म्हणूनच मनुष्याला दगडापेक्षा वाईट म्हटले आहे समर्थांनी. मी सांगतो त्याकडे दुर्लक्ष जो करतो, तो मी काढलेला ढलपा पुन्हा चिकटवून घेतो. असा वृत्तीचा ढलपा पुन्हा चिकटत राहिला तर मूर्ती कशी घडणार? ते तुम्ही केले नाहीत, म्हणून श्रेय तुम्हाला आहे!

(श्री मराठे यांच्या प्रवचनातून)

No comments:

Post a Comment