नाम घेण्यात आर्तता पाहिजे. "तू म्हणजे फक्त तू" असं पाहिजे!
द्रौपदीचं उदाहरण आहे ना. वस्त्रहरणाचा प्रसंग झाल्यानंतर श्रीकृष्ण पांडवांना भेटायला गेले असताना द्रौपदीने आपले केस त्याला दाखवले, तर कृष्णाने तिच्या नजरेला नजर दिली नाही. द्रौपदीने विचारलं, तू माझा भाऊ आणि हा असा प्रसंग माझ्यावर! हे केस त्या दुष्टाने धरले, तेव्हा तू कुठे होतास? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "अगं मी तिथेच होतो, पण तुला वाटलं, हे पांडव तुझं रक्षण करतील, भीष्म द्रोण आहेत ते पाहतील. काही नाही तर तू स्वतः निरी घट्ट धरून ठेवली होतीस. पण जेव्हा कोणी आलं नाही आणि तू पण हरलीस, तेव्हा मी आलो!"
महाभारतात श्लोक आहे- " गोविंद द्वारका वासिन् कृष्ण गोपीजनप्रियः" भावना अतिशय प्रदीप्त झाली की तिकडून प्रतिसाद Response आलाच. तो प्रतिसाद येणं ही भक्ताची शक्ती आहे. खऱ्या भक्ताने हाक मारली की परमात्मा अस्वस्थ होईल.
महाराज एकदा म्हणाले, "तुम्ही आम्ही नाम घेतो आणि समर्थ नाम घेत होते. त्यांनी राम म्हटल्यावर तो अस्वस्थ होईल; म्हणेल, अरे कोण मला हाक मारतय" ती हाक अशी पाहिजे की आता तुझ्याशिवाय कोणी नाही. अशी भावना (Feeling) त्यात आली पाहिजे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ७ वा)
No comments:
Post a Comment