Translate

Friday, January 30, 2015

नामात उत्कटता फार महत्त्वाची!



श्रीराम. हाक मारल्यावर परमात्मा का येतो? तर ते जे अतींद्रिय तत्त्व आहे, त्याला माणसाच्या मनाचा जो भावनेचा भाग आहे तो हलवू शकतो, खाली आणू शकतो. "भाव तोचि देव". गुरुदेव रानडे भाव याचा अर्थ प्रेम असा करत. भाव याचा खरा अर्थ असणे असा आहे. "भू भवनं अस्ति". सांगण्याचा हेतू काय, तर प्रेम म्हणजे आर्तता इतकी उत्कट झाली पाहिजे की बेहद्द झाली पाहिजे. तशी द्रौपदीची झाली म्हणून परमात्मा आले. जे अतींद्रिय तत्त्व झाकोळलेले आहे त्याचा भेद करून जायला भावना उत्कट झाली पाहिजे.

महाराज म्हणत, "आपण नाम घेताना रामाला असं वाटलं पाहिजे कोण मला हाक मारतय?" आपलं अंतःकरण नाम घेताना असं रसरसत नाही. आपण पूजा करतो ती मनापासून केली आहे का? पूजा करताना फक्त तू आणि मी असं होतं का कधी? कसं आहे, माझी भावना कोणत्याही कर्मामध्ये उचंबळत नाही. आपली व्यवहारातली सवय आपण परमात्म्याकडे लावतो. म्हणूनच महाराज म्हणायचे, कोणतेही काम करताना मनापासून करा. आपली भावना खरी पेटते ते फक्त राग आला की, पण ती विध्वंसक असते. ती भावना नामाला लावता आली पाहिजे. महाराज काय म्हणत, "आपण इतकं आणि असं नाम घ्यावं की परमात्मा आपल्या घरात नाचला पाहिजे!"    

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा)  

Tuesday, January 27, 2015

गुरुनिष्ठा फार कठीण पण आवश्यक!

श्रीराम. परमात्म्यावर श्रद्धा असणं फार कठीण आहे. पण आपल्या गुरूवर तरी श्रद्धा असावी की नाही? नाना शंका आपलं मन पोखरतात. महाराजांनी एक फार अप्रतिम दृष्टांत दिला. ते म्हणाले, "एक म्हातारा मनुष्य होता. तो या गावाहून दुसऱ्या गावाला निघाला होता. त्याच्या डोक्यावर ओझं होतं आणि वजनदार ओझं होतं. ऊन खूप होतं आणि तो थकला होता. मागून एक बैलगाडीवाला आला आणि त्याने या म्हाताऱ्याला विचारलं, "बाबा, तुम्हाला कुठं जायचं आहे?" यानं सांगितलं, "मला या गावाला जायचं आहे." तो बैलगाडीवाला म्हणाला, "मला त्याच मार्गानं जायचं आहे, तर बसा बैलगाडीत. तो म्हातारा बसला. थोडं अंतर गेल्यावर त्या गाडीवानानं मागे पाहिलं तर त्या म्हाताऱ्याने तो बोजा आपल्या डोक्यावरच धरला होता. तो म्हणाला, "बाबा, ते ओझं खाली ठेवा. तर हा म्हातारा म्हणाला, "नाही, तो माझा बोजा आहे, तो मी डोक्यावरच धरणार."

अशी आपली अवस्था आहे! अरे, तो गुरू सांगतो आहे की मी बघतो सगळं, तुझा प्रपंच मी पाहतो, पण नाही. ते ओझं माझ्याच डोक्यावर राहणार. हे आपण लक्षात घेऊन ते टाळलं पाहिजे. एकदा असं म्हणावं, दिलं तुला. आता तू पहा तुला काय करायचंय ते. मी माझं विहित कर्म फक्त करणार. ज्याची गुरूबद्दल अतिशय शुद्ध भावना आहे त्यालाच हे साधेल.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ७ वा)

नाम घेताना आर्तता हवी!


नाम घेण्यात आर्तता पाहिजे. "तू म्हणजे फक्त तू" असं पाहिजे!

द्रौपदीचं उदाहरण आहे ना. वस्त्रहरणाचा प्रसंग झाल्यानंतर श्रीकृष्ण पांडवांना भेटायला गेले असताना द्रौपदीने आपले केस त्याला दाखवले, तर कृष्णाने तिच्या नजरेला नजर दिली नाही. द्रौपदीने विचारलं, तू माझा भाऊ आणि हा असा प्रसंग माझ्यावर! हे केस त्या दुष्टाने धरले, तेव्हा तू कुठे होतास? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "अगं मी तिथेच होतो, पण तुला वाटलं, हे पांडव तुझं रक्षण करतील, भीष्म द्रोण आहेत ते पाहतील. काही नाही तर तू स्वतः निरी घट्ट धरून ठेवली होतीस. पण जेव्हा कोणी आलं नाही आणि तू पण हरलीस, तेव्हा मी आलो!"

महाभारतात श्लोक आहे- " गोविंद द्वारका वासिन् कृष्ण गोपीजनप्रियः" भावना अतिशय प्रदीप्त झाली की तिकडून प्रतिसाद Response आलाच. तो प्रतिसाद येणं ही भक्ताची शक्ती आहे. खऱ्या भक्ताने हाक मारली की परमात्मा अस्वस्थ होईल.

महाराज एकदा म्हणाले, "तुम्ही आम्ही नाम घेतो आणि समर्थ नाम घेत होते. त्यांनी राम म्हटल्यावर तो अस्वस्थ होईल; म्हणेल, अरे कोण मला हाक मारतय" ती हाक अशी पाहिजे की आता तुझ्याशिवाय कोणी नाही. अशी भावना (Feeling) त्यात आली पाहिजे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ७ वा)

Saturday, January 24, 2015

श्रीमहाराजांनी पूज्य बाबांचे केलेले कौतुक :-)


श्रीराम. एकदा पूज्य बाबांनी श्रीमहाराजांना एक मोठा गोड प्रश्न विचारला – “महाराज, मला जवळ ठेवून घेऊन, मला पशूतून माणसात आणून माझ्या जीवनाचे आपण सोने केले आहे.” यावर महाराज म्हणाले, “केशवरावजी, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे; मला काय याचं श्रेय देता?” बाबांना काही अर्थ कळेना. मग महाराज म्हणाले, “सांगू का कसं श्रेय तुम्हाला ते?

असं बघा, एक शिल्पकार असतो. त्याला मूर्ती घडवायची असते. मूर्ती वेगवेगळ्या असतात. रामाची, शिवाची, कृष्णाची. तेव्हा ज्या शिल्पकाराला जी मूर्ती घडवायची असेल, त्याप्रमाणे तो दगड निवडतो आणि तो दगड घेऊन आपल्या दुकानासमोर टाकून देतो. तो दगड तिथे पडून राहतो. जेव्हा जेव्हा शिल्पकाराला काम करायचे असेल तेव्हा तेव्हा तो दगड आत घेतला जातो आणि मग छिन्नी हातोडा घेऊन तो काम सुरू करतो. तसे तुम्ही पडून राहिलात; म्हणून श्रेय तुम्हाला आहे. तुम्ही पडून राहिला नसतात तर मी काय करणार होतो?

आता याच्या पुढे शिल्पकार काय करतो? छिन्नी हातोडा घालून त्या दगडातून ढलपा काढतो. आकार देताना दगडाचे ढलपे काढावेच लागतात. एकदा तो ढलपा काढून टाकला ना की तो दगडाला पुन्हा चिकटत नाही. हे जसं, तसं जो जो ढलपा वृत्तीचा तुमचा मी काढला, तो तुम्ही पुन्हा चिकटवून घेतला नाहीत. इतर बरेच लोक तो ढलपा पुन्हा चिकटवून घेतात. म्हणूनच मनुष्याला दगडापेक्षा वाईट म्हटले आहे समर्थांनी. मी सांगतो त्याकडे दुर्लक्ष जो करतो, तो मी काढलेला ढलपा पुन्हा चिकटवून घेतो. असा वृत्तीचा ढलपा पुन्हा चिकटत राहिला तर मूर्ती कशी घडणार? ते तुम्ही केले नाहीत, म्हणून श्रेय तुम्हाला आहे!

(श्री मराठे यांच्या प्रवचनातून)

साक्षित्वासाठी सगुणोपासना ~ परमपूज्य बाबा बेलसरे


श्रीराम! अध्यात्मामध्ये काय शिकायचं, तर आपल्या देहाला वेगळेपणाने पाहायला शिकायचं. मी काही हा देह नव्हे, ही जाणीव केव्हा होईल, तर या देहाच्या पलीकडे असणारं आपलं जे स्वरूप आहे, त्याच्याशी आपलं मन चिकटलं म्हणजे होईल. त्याला तुम्ही आत्मस्वरूप, परमात्मस्वरूप काहीही म्हणा. इथे सद्गुरूंची मदत फार होते आणि सगुणोपासना फार उपयोगी पडते. सगुणोपासनेचं महत्त्व असं आहे की आपण ज्या रूपाचं ध्यान करतो ते आपल्या सूक्ष्म देहामध्ये इतकं भरतं, की तादात्म्य होतं. मग तुम्ही जाल तिथे ते येतं. तुकाराम महाराज म्हणाले, "तुका म्हणे मज आहे हा भरवसा | विठ्ठल सरिसा चालतसे ||" माझ्या सूक्ष्मदेहाबरोबर विठ्ठल - भगवंत येतो हा अनुभव नुसत्या नामाने सुद्धा येतो ! 

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ८ वा)

Friday, January 23, 2015

इंद्रिय तृप्ती हा भ्रम! ~ परमपूज्य बाबा बेलसरे


श्रीराम! आपल्याकडे बायकांमध्ये Matching ची कल्पना निघाली आहे. कपडे, चपला, पर्स, दागिने हे सगळे एकाच रंगाचे पाहिजेत. बरोबर आहे, पण मग आपलं मन सुद्धा त्या शरीराला Matching नको का? कसं पाहिजे, जसं बाहेरचं सौंदर्य आहे, तसं मन आत सुद्धा सुंदर पाहिजे. पण हे सुद्धा अपुरं आहे.

यापुढचं सत्य जे आहे ते धर्माचं किंवा परमार्थाचं सत्य आहे आणि हा मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. खरी मनुष्याची जिज्ञासा सत्यशोधनाची आहे. ही तृप्त केव्हा होईल? इंद्रियांच्या सुखाने होणार नाही, विज्ञानाच्या मार्गाने होणार नाही. इंद्रिय तृप्ती तर फार भयंकर गोष्ट आहे. ती सावचोरांची संगत आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एखादा गोड पदार्थ तुम्ही खाल्लात तर वाटतं काय गोड पदार्थ आहे, पण त्यात विष मिसळलेलं असेल तर? तोच गोड पदार्थ तुमचा जीव घेईल. तसं आज मला या इंद्रियांचं सुख गोड वाटतं पण माझा जो Ultimate Consciousness आहे, सत्याची जी खरी जाणीव आहे, ती जाणीव हे इंद्रिय सुख देखील बोथट करतेच करते.

तुमची इंद्रियं काही काल भोग भोगल्यानंतर थकतात. इंद्रियांची मर्यादा ठरलेली आहे. त्याला Height of Sensibility असं म्हणतात. तुम्ही गोड खा; काही कालानंतर तुमच्या जिभेच्या पेशी थकतात आणि अधिक खाणं नको म्हणतात. सगळ्या इंद्रियांचं असंच आहे. इंद्रिय सुख हे खरं सुख नाही, तो सुखाचा भ्रम आहे. याचं शिक्षण महाराज फार छान देत. मंडळी सर्व पानावर बसलेली असायची. भात वाढलेला असायचा, तूपही वाढलेलं असायचं. पण महाराज काही जेवायला उठायचे नाहीत. उगीच पाच-दहा मिनिटं उशिरा जेवायला बसायचे. एक काका फडके म्हणून गृहस्थ होते. ते महाराजांशी नेहमी जरा जास्तच बोलायचे. त्यांनी एकदा महाराजांना विचारलं की आपण असं का थांबता? तर महाराज म्हणाले, "अरे, तुम्ही रोज ऊन ऊन अन्न घरी खाताच ना? त्या अन्नाची चव कमी करायला, तुमची चव कमी व्हायला असं केल्याशिवाय तुम्ही कसे तयार होणार?"

मन असं सांभाळणं हे आपलं पथ्य आहे; त्याशिवाय आपली नामस्मरणात हवी तेवढी प्रगती होणार नाही, ही खात्री बाळगा!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ३ रा)

Wednesday, January 21, 2015

नामाचा अनुभव ~ परमपूज्य बाबा बेलसरे

आनंदाचा, शांतीचा, म्हणजेच समाधानाचा साक्षात अनुभव हे नामसाधनेचे ध्येय आहे. भगवंत अत्यंत सूक्ष्म आणि हृदयात खोल ठिकाणी असल्याने बाहेरचे लक्ष आवरून आतमध्ये आपण जितके अधिक रमू लागू, तितके अधिक आनंदाजवळ जाऊ. आनंदब्रह्माला नाम असे म्हणतात.

म्हणून नाम अधिकाधिक घ्यावेसे वाटणे, नामात मन रंगू लागणे किंवा नामाशिवाय जीवाला चैन न पडणे हाच नामाचा खरा अनुभव समजावा. नामाला ज्याने घट्ट धरले, त्याचे अंतरंग व बहिरंग नामाने भरून जाते. त्याच्या अंतरात घर करून राहिलेली आणि असमाधान निर्माण करणारी वासना नामाने आपोआप क्षीण होत जाऊन नाहीशी होते. नाम घेणाऱ्या माणसाच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होऊन तो दिव्य माणूस बनतो. म्हणून हृदयामध्ये नामाचा प्रकाश वाढत जाणे आणि त्यामुळे भगवंताचे आनंदमय स्वरूप अधिकाधिक प्रगट होत जाणे हा नामाचा खरा अनुभव आहे.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (नामसाधना- परमार्थ प्रदीप)

निस्वार्थीपणे केलेले कर्म हाच यज्ञ! ~ परमपूज्य बाबा बेलसरे


भगवद्गीतेने यज्ञाची व्याख्याच बदलली आणि त्यातच त्याचं श्रेय आहे. त्याला नुसतं कर्मकांडाचं स्वरूप न राहता यज्ञ निस्वार्थीपणाला जोडला. जे जे कर्म तुम्ही निस्वार्थीपणाने करता ते यज्ञच आहे. यात आपण काय करायचं? तर, भगवंताचं स्मरण करतानासुद्धा माझी अपेक्षा काही नाही. मला पाहिजे तर तू पाहिजेस; दुसरं काही नाही. मी तुझं स्मरण करतो आहे; तुला हवं ते तू कर.

यज्ञाचा प्राण असेल तर त्याग आहे. ज्या यज्ञात त्याग नाही तो यज्ञच नव्हे. दुसरी गोष्ट असेल, तर माझ्या प्रगतीच्या आड जे येतं, ते देणं हा यज्ञाचा प्राण आहे. नाहीतर असं होतं की, काशीला जाऊन आल्यावर काहीतरी सोडलं पाहिजे, तर तुम्ही जे आवडत नाही तुम्हाला तेच सोडता. खरं म्हणजे, मला जे अत्यंत आवडतं, त्याचं प्रेम सोडणं हे यज्ञाचं दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे. तिसरं जे आहे, ते म्हणजे अंतःकरण अगदी स्वच्छ आणि निस्वार्थी पाहिजे. यज्ञ हा निष्कामच पाहिजे यात शंकाच नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ३ रा)

सद्वस्तु भावनाप्रधान आहे! ~ परमपूज्य बाबा बेलसरे


आपण भगवंताला खरं खरं आळवलं तर त्याला पान्हा फुटतो आणि तो त्या भक्तांसाठी येतो. जेव्हा आपण त्याला आळवतो, आवाहन करतो तेव्हा 'मी' संपतो. 'आता माझं काही नाही, तुझ्याशिवाय कोणी नाही' असं झाल्यावर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण सद्वस्तु (Reality) जी आहे ती बुद्धिप्रधान नाही तर भावनाप्रधान आहे. Reality is feeling; not reason!

यासाठी ती आच लागली पाहिजे, तुझ्याशिवाय अन्न गोड लागत नाही, चैन पडत नाही असं झालं तर काही आशा आहे! शेवटी तो गुरूंचा गुरू आहे; त्याला सर्वांची जाणीव आहे.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड 4 था)

"गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टीपुढे"- तो खरा गुरू :-) ~ परमपूज्य बाबा बेलसरे

गुरू असा शोधावा की ज्याच्याविषयी संशय घेणं मूर्खपणा ठरेल. अशा गुरूंना Masters असं म्हणतात. आता गुरू म्हणजे काय? तर--

-- तुमचे भ्रम नाहीसे करणारा तो गुरू
-- गुरू अग्निसारखा आहे. तुमचे देहबुद्धीचे सगळे प्रकार जाळणारा असेल तर गुरू आहे.
-- गुरू हा दिव्यासारखा आहे. तो पेटलेला आहे. तुम्ही तुमची वात त्याच्या जवळ नेली की तो कमी होतच नाही, पण तुमची ज्योत पेटवून देतो; तो गुरू.
-- मला सगळं समजतं हा जो आपला भ्रम आहे, अज्ञान आहे, हे ज्याला पटवून देता येतं, तो गुरू.
-- माझं आजचं जे जीवन आहे, या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारा असेल तर गुरू. म्हणजे असं होईल की मी जो पूर्वीचा होतो, तो आता राहिलोच नाही, असा तो बदलून टाकेल. माझं माणूसपण जाऊन देवपण येईल, असा बदल होईल.

गुरूचं काय सामर्थ्य आहे याची आपल्याला कल्पनाच नाही. तुकाराम महाराज म्हणाले, "गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टीपुढे" आपल्याला गाढव म्हटलं आहे! हा खरोखर त्यांचाच अधिकार आहे. आपलं परमार्थदृष्ट्या गाढवपणच आहे. यासाठी उपाय एकच- तो म्हणजे आपल्या गुरूला कायमचं चिकटणं!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ३ रा)

एक तरी ओवी अनुभवावी ! ~ परमपूज्य बाबा बेलसरे


मला जर कोणी विचारलं की ज्ञानेश्वरीतील "एक तरी ओवी अनुभवावी" असे म्हणतात, तेव्हा तुम्ही कोणती ओवी सांगाल, तर मी ही ओवी सांगेन-

"देह तरी वरिचिलीकडे | आपुलिया परी हिंडे |
परी बैसका न मोडे | मानसींची ||" (ज्ञा. अ. १३, ४८६)

देह वरवर आपलं प्रारब्ध असेल तसा हिंडतो, तरी पण मनाची बैठक म्हणजे अवस्था, ती कायम असते. आज चांगली परिस्थिती आहे, उद्या संकटात आहे तरी मनाची अवस्था जशी आहे तशीच, म्हणजे शांत आहे. आपलं मन फार लवकर बिघडतं.

महाराज म्हणाले, एक बाहुली मिळते. तिला खाली वजन लावलेलं असतं. तिला कसंही टाकलं तरी ती उभी राहते. तसं भगवंताच्या प्रेमाचं वजन ज्या जिवाला आहे, त्याला कसाही टाका. तो तसाच राहणार. सुख काय - दुःख काय, यश काय - अपयश काय, त्याच्या मनाची अवस्था समच राहणार!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ३ रा)

प्रयत्न श्रेष्ठ की प्रारब्ध? ~ परमपूज्य बाबा बेलसरे


प्रारब्धाच्या सिद्धान्तावर चर्चा चालू असताना बरेच लोक हा प्रश्न विचारतात - जर मनुष्याला प्रारब्धाचे इतके बंधन आहे तर मग साधन देखील प्रारब्धावर अवलंबून असले पाहिजे, त्यात प्रयत्नाचे महत्त्व आहे किंवा नाही? हा प्रश्न जेव्हा श्रीमहाराजांना विचारला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे अक्षरशः सर्व वेदांताचं सार आहे!
ते म्हणाले, ***"जोवर कर्तेपण आहे तोवर प्रयत्न श्रेष्ठ, कर्तेपण गेलं की प्रारब्ध श्रेष्ठ!"***

नाम घेताना तुमच्या सर्व काळज्या चिंता यांपासून तुम्ही मुक्त होता का? की एखादी गोष्ट कशी होणार असे तुमच्या मनाला वाटत असते? हे जोवर आहे तोवर "नाम सद्गुरू करवून घेतील" ही लबाडी आहे. साधनात कष्ट हवेतच.

किंबहुना ज्याचे मीपण खऱ्या अर्थाने राहणार नाही तो असल्या शंका काढणार नाही. ज्याला खरी भगवंताची तळमळ लागली तो दुसऱ्या कोणत्या भानगडीत न पडता साधनालाच लागेल!!!!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी प्रवचन)

Monday, January 12, 2015

योगापेक्षा भक्ती का श्रेष्ठ ?

इंद्रियांना ज्या बहिर्मुख सवयी लागलेल्या आहेत, त्या इतक्या खोल गेल्या आहेत की त्यांच्या विरुद्ध काही झालं, उलट काही झालं तर ते माणसाच्या मेंदूला सहन होत नाही. त्यामुळे मेंदू थकतो. “इंद्रियं आवरून बाहेरचं सगळं सोडा” ही कल्पनाच सामान्य माणसाला सहन होत नाही. म्हणून भक्तीचं महत्त्व लक्षात येईल. भक्ती म्हणते, “अरे, तू दाबतोस कशाला? हा निरोध आहे, याला repression म्हणतात. जे काही तुझ्या वाट्याला येईल ते त्याच्याकडून, त्याच्या इच्छेने आलं आहे असं म्हटल्यावर दाबण्याचा प्रश्नच येत नाही.
आज मला हे खावंसं वाटत आहे तर योग म्हणेल, “हे आहाराच्या विरुद्ध आहे.” भक्ति काय म्हणेल, “मला ही इच्छा झाली आहे पण त्याची इच्छा काय आहे कुणास ठाऊक? त्याने दिले तर मी घेईन, नाही दिलं तर त्याची इच्छा! काही हरकत नाही!”
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ६ वा - ध्यानयोग)

भगवद्गीतेचे महत्त्व कशात आहे?

गीतेचे महत्त्व कशात आहे तर स्थूलदृष्टी आणि सूक्ष्मदृष्टी देखील जाऊन तत्त्वदृष्टी किंवा दिव्यदृष्टी येण्यात आहे. ज्याला ही दिव्यदृष्टी आली त्याला गीता समजली.
ही दिव्यदृष्टी काय आहे? अर्जुनाला भगवंतांनी विश्वरूप दाखविले त्या वेळेला तो जे जग तुम्ही आम्ही पाहतो तेच पाहात होता. भगवंतांची जी दृष्टी होती ती कालाच्या अतीत असणारी दृष्टी होती. ही दृष्टी येणं म्हणजे सत्पुरुष होणं आहे.
सगळा परमार्थ असेल तर जग बदलण्यात नाही. सगळा परमार्थ असेल तर ही दिव्यदृष्टी येण्यात आहे. दिव्य म्हणजे काय तर देवाची दृष्टी ती दिव्यदृष्टी. ज्या दृष्टीने ईश्वर जगाकडे पाहतो ती दृष्टी ज्याला आली तो सत्पुरुष झाला. याचा अर्थ काय तर प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराची सत्ता काम करते आहे तो कर्ता आहे ही दृष्टी येणे म्हणजे दिव्यदृष्टी येणे आहे. तुम्हा आम्हाला हे शिकायचे आहे.
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड 1 ला)

Saturday, January 10, 2015

नाम घेताना मी प्रपंचाचा नाही! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

आता मी नामाला बसतो म्हणजे मी प्रपंचाचा नाही. देहाने प्रपंचातच राहावे लागेल; पण मनाने मी प्रपंचाचा नाही असे म्हणून जर आपण नामाला बसलो तर त्याची लज्जत काही निराळीच येईल.
याला दोन उपाय आहेत. आपण आपल्या गुरूंचे चिंतन करावे. त्यांचे स्मरण करावे. त्यांचे स्मरण करावे म्हणजे काय तर त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते ते स्मरण करावे.
हे जर फार सूक्ष्म वाटले तर त्यांच्या चरित्रातील आपल्याला आवडणारा भाग घ्यावा आणि त्याचे चिंतन करीत आपण भगवंताच्या नामाला बसावे. नाहीतर हे मी करतो आहे यात माझ्या जन्माचे कल्याण आहे म्हणून आपण बसावे.
यांपैकी जे आपल्याला आवडते ते धरावे. मी कशाकरता जगतो आहे तर भगवंताकरता ही भावना ठेवून आपण नाम घेतले तर मनाची अवस्था तीच होईल!!!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड 1 ला)

Thursday, January 8, 2015

मनाचं समत्व ~ परमपूज्य बाबा बेलसरे

व्यवहारात रोज काहीतरी होणारच. कटकटी राहणारच. मग याला राजमंत्र असेल तर- असू दे, सगळं तुझ्या इच्छेने चालले आहे ना, मग असेल तर असू दे. हे असेल तर मनाचे समत्व राहील.

मी असं म्हणेन तुम्हाला की आपल्या मनाचं समत्व केव्हा बिघडावं? तर आपली उपासना जिथे होणार नाही तिथे बिघडवं. इतरत्र नाही. हे शरीर आणि तुमचा प्रपंच हे सडकं फळ आहे. त्यात कमी जास्त होणारच.

आपली उपासना इतकी अंगभूत व्हावी की मरायच्या वेळेला सुद्धा त्याला म्हणावं, 'थांब, माझी उपासना होऊ दे. मग मी तुझ्या बरोबर येतो.' इच्छाशक्ती जर प्रबळ झाली तर मनुष्य मृत्यूवर देखील स्वामित्व करू शकेल. जिथे मी अमरत्वाचा- ईश्वराचा आधार घेतला आहे, तिथे मृत्यूची काय किंमत आहे?

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ८ वा)

भक्ताचं ऋण भगवंत फेडतात! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

||श्रीराम समर्थ||