Translate

Monday, September 21, 2015

नामाचा अभ्यास चिकाटीने करावा!


श्रीराम. साधनेत एक लक्षात ठेवणे जरूर आहे की आरंभापासून शेवटपर्यंत नामाशिवाय दुसरे काही करावे लागत नाही. काळ अनुकूल असो किंवा प्रतिकूल, साधकाने चिकाटीने नाम घ्यावे.
महाराजांपाशी एक कर्नाटकी मनुष्य येऊन राहिला. त्याचे इतर वागणे चार सामान्य लोकांसारखेच होते. परंतु नामस्मरणाच्या बाबतीत त्याने वैशिष्ट्य दाखवले. तो अहोरात्र नामस्मरण करीत असे. त्याच्या तोंडात नाम व हातात माला केव्हाही दिसे. काही दिवसांनी त्याच्या मनाला अत्यंत समाधान प्राप्त झाले. गोंदवल्यासच त्याचा अंतकाळ झाला. प्राण गेल्यानंतर देखील काही वेळ त्याचे ओठ, बोटे सारखी हलत होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे महाराजांनी एक मेणबत्ती घेऊन त्याचे थिजलेले डोळे लोकांना मुद्दाम दाखवले आणि म्हणाले, "याला म्हणावे अभ्यास! पूर्वाभ्यासाने देहाला इतकी सवय लागते की तो प्राणहीन झाल्यावर देखील ओठ बोटे हालू शकतात. मग मन तर सूक्ष्मच आहे. त्याला नामाची सवय लवकर लागेल. ती जर टिकवून धरली तर या जन्मीच काय पण पुढेदेखील ती कायम टिकेल!"
पण चिकाटी मात्र हवी!
आनंदसागरांची नामनिष्ठा जबर होती. लग्न करायचे त्यांच्या मनात नव्हते. गुरूंनी त्यांचे लग्न ठरवले, त्यावेळी त्यांना रडू कोसळले. लग्नाच्या दिवशी पहाटे तीन वाजता उठून त्यांनी गार पाण्याने स्नान केले आणि सकाळी सहा वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे मनापासून नामस्मरण केले! तसेच उदाहरण गुरुदेव रानडे यांचे. ज्या दिवशी एम ए ची परीक्षा होती, त्या दिवशी पहाटे उठून त्यांनी आपले रोजचे नामस्मरण पूर्ण केले. तसेच ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला, त्या दिवशी देखील त्यांनी आपला नेम चुकवला नाही!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (सहज-समाधी-सारांश)

No comments:

Post a Comment