श्रीराम. अत्यंत एकनिष्ठ भक्ताला आपल्या गुरूविषयी प्रेम वाटेलाच, पण गुरूचा एखादा नातेवाईक अगर गुरूच्या गावचा एखादा मनुष्य भेटला, तरी एकदम गुरूची आठवण होऊन, त्यालाच गुरू म्हणून तो नमस्कार करील! भक्ताची गुरुभक्ति इतक्या उच्च अवस्थेला पोहोचली म्हणजे त्याला आपल्या गुरूत एकही दोष दिसत नाही. गुरू जे सांगतील ते त्याला प्रमाण. त्याची दृष्टीच तशी होऊन जाते. कावीळ झालेल्या माणसाला जसे सर्व काही पिवळेच दिसते, तसे त्याचे होऊन जाते.
गुरुभक्ति कशी असावी सांगू?
गुरू जसे सांगेल तसे लागलीच दिसू लागले पाहिजे. अशी भक्ति अर्जुनाची होती. एक दिवस रथात बसून अर्जुनाबरोबर श्रीकृष्ण सहज फिरत चालले असता मधेच आकाशाकडे पाहून म्हणाले, 'अहाहा! अर्जुना, हे पाहिलेस का? कसे एक सुंदर कबूतर उडत चालले आहे ते!' आकाशाकडे पाहून अर्जुन लागलीच म्हणाला, 'खरंच, कृष्णा, किती सुंदर कबूतर आहे हे!' पण पुन्हा श्रीकृष्ण वर पाहून म्हणाले, 'छे छे अर्जुना! अरे हे कबूतर नव्हे!' अर्जुन तिकडे पाहून पुन्हा म्हणाला, 'खरेच कृष्णा! अरे हे तर कबूतर दिसत नाही!'
आता आपण लक्षात घ्या की अर्जुन महान सत्यनिष्ठ, उगीच कृष्णाची खुशामत करण्यासाठी तर तो असे म्हणाला नाही! पण कृष्णाच्या शब्दावर त्याचा इतका विश्वास आणि भक्ति की, कृष्णाने जे काही सांगितले ते अर्जुनाला अगदी तसेच दिसू लागले!
अशा रीतीने गुरुभक्तिपरायण साधक अखेरीस अशा अवस्थेला जाऊन पोहोचतो की, त्या वेळी ही शक्ती त्याच्या स्वतःमध्येच आविर्भूत होऊन, त्याच्या मनातील सर्व संशयाचा उलगडा करून गूढ गूढ अध्यात्मिक तत्त्वे त्याला समजावून देते!
No comments:
Post a Comment