श्रीराम. श्रीमहाराजांना भेटायला गेले असता भेटणाराला तर आनंद होईच, पण त्याच्याहूनही अधिक आनंद त्यांनाच झाल्याचे दिसून येई. याचे कारण एका ज्येष्ठ भक्ताने विचारले असता ते म्हणाले, "आपण कितीही निर्मळ मनाने भेटायला गेलो, तरी आपली देहबुद्धी नष्ट झालेली नसल्यामुळे, प्रपंचातली काही अडचण-उणीव दूर व्हावी, निदान आहे ही सुस्थिती कायम राहावी, अशी एक चोरटी, सूक्ष्म इच्छा मनात कुठेतरी खोल दडलेली असतेच, त्यामुळे आपल्याला होणारा आनंद निर्भेळ, सात्विक, निरुपाधिक नसतो; वासनेने डागाळलेलाच असतो.
याउलट, येणारा प्रत्येक जीवात्मा बद्धावस्थेतून मुक्त व्हावा, त्याला भगवंताची भेट होऊन शाश्वत समाधान लाभावे, ही एकच सात्विक, निस्वार्थी तळमळ मनात असल्याने श्रीमहाराजांना होणारा आनंद निरुपाधिक, विशुद्ध प्रेमाचा, करुणेने ओतप्रोत असा असतो. आपल्यालाही सद्गुरूभेटीचा, संतदर्शनाचा असा आनंद हवा असेल, तर आपण अशा निर्मळ भावनेने गेले पाहिजे की माझ्या देहाचे आणि प्रपंचाचे काहीही होवो, मला भगवंताचे खरे प्रेम लागून जन्ममरणाचा फेरा चुकावा!"
(हृद्य आठवणी)
No comments:
Post a Comment