श्रीराम. श्रीमहाराजांना जे आवडायचे नाही ते करू नये. त्यांना जे शोभेल व जे आवडेल असं वागायला हवं. त्याकरिता अखंड नाम घेणे हाच उपाय आहे आणि प्रार्थना करावी की 'मी नाम घेतोय' हा माझ्या मनाचा दोष काढून टाका. त्याने शांती वाढेल. प्रत्येक नामागणिक शांतीचा अनुभव येईल.
श्रीमहाराज अंतकाळ साधायचे म्हणजे, प्रपंचाची वासना मरताना समोर यायला लागली तर तिच्या जागी नामाची वासना घालायचे. तर मग आपण अखंड नामाचीच वासना ठेवली तर पुढच्या जन्मात डबल प्रमोशन देऊन नाम घ्यायला सोईचं होईल अशाच ठिकाणी जन्माला घालतील. या जन्मातल्या वासना पुढच्या देहाची वाट पाहत असतात. पण संचितातून फलोन्मुख झालेली कर्मे भोगायला आवश्यक असणारा देह तयार असतो. जोपर्यंत संचित सूक्ष्म आहे तोपर्यंत त्यात बदल करता येतो. पूर्वसंस्काराने मनाचे व्यवहार चालतील पण त्यानुसार वागावं की नाही ते आपल्या हातात असतं. माणसाला व्यवहाराकडे बघायची दृष्टीच बदलायला हवी; म्हणजे सृष्टीच वेगळी दिसेल.
नामाला सर्वोच्च मूल्य दिल्याने आपली दृष्टीच बदलते, Dimension च बदलून जातं. नामाशिवाय राहा म्हटलं तर ते आता शक्य नाही असं वाटतं!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे