Translate

Friday, July 3, 2015

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती !!!


हृदयात भगवंत दिसू लागल्यावर साधक जेथे जातो तेथे त्याच्या बरोबर तो जातो. देहाच्या व मनाच्या कोणत्याही अवस्थेत साधक एकता असत नाही. त्याची सर्व कर्मे भगवंताच्या नजरेखाली घडतात. अर्थात त्याचे आचार विचार भगवंताला शोभेलसे असतात. उदाहरणार्थ-

स्वामी वादिराज यांचे पुष्कळ शिष्य होते. त्यांपैकी कनकदास मात्र खरा तयार होता. एका एकादशीला स्वामींनी सर्व शिष्यांना एकेक केळे दिले. ते म्हणाले, "आज एकादशी आहे. लोकांसमोर साधकाने खाऊ नये, म्हणून जेथे कोणी पाहणार नाही, तेथे जाऊन केळे खून या." पाचदहा मिनिटात सर्व शिष्य केळे खून परत आले. फक्त कनकदास मात्र केळे तसेच घेऊन परत आला. स्वामींनी विचारले, "का री? तुला कोठे एकांत मिळाला नाही का?'कनकदासाने हात जोडून उत्तर दिले, "नाही महाराज, मी जेथे गेलो, तेथे आपण माझ्या हृदयात बरोबर आलात. मला एकांत मिळाला नाही." शिष्याचे हे शब्द ऐकून स्वामींच्या डोळ्याला पाणी आले!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (नामसमाधी)

देव जसा दयाळू, तसा न्यायीही आहे हे विसरू नये -


श्रीराम. एक पैसे खाणारा माणूस होता. एका प्रकरणात पैसे खाण्याच्या आरोपावरून त्याला निलंबित करण्यात आले. प्रत्यक्ष त्या प्रकरणात त्याने पैसे खाल्ले नव्हते. तो श्रीमहाराजांना भेटला व म्हणाला, 'या प्रकरणात माझ्यावर पैसे खाण्याचा आरोप अगदी खरा नाही. यामध्ये जर मला शिक्षा झाली तर देवाचे घरी न्याय नाही, देवधर्म व रामनाम सर्व थोतांड आहे, असे मी ओरडून लोकांना सांगेन.'

श्रीमहाराज म्हणाले, 'दिवाळी जवळ आली म्हणजे आधी चारपाच दिवस घरात वेगवेगळे फराळाचे जिन्नस करू लागतात. त्यांचा नमुना पाहण्यासाठी आपण ते खातो. त्यावेळी नेहमीचे जेवणही आपण जेवतो. नंतर खुद्द दिवाळी आली म्हणजे फराळाचे यथेच्छ खातो. दिवाळीचे चार दिवस गेल्यावर आपल्याला अजीर्ण होते. मग पाचव्या दिवशी आपण नुसता ताकभात खातो. पण अजीर्णाचा जोर होऊन सहाव्या दिवशी आपल्याला ओकाऱ्या व जुलाब जोरात सुरु होतात. तेव्हा जर आपण लोकांस सांगत सुटलो की, 'अहो, काल मी नुसता ताकभातच खाल्ला आहे तरी मला हा त्रास का होतो आहे कोण जाणे!' आपले म्हणणे बरोबर ठरेल का?

देवाच्या पायावर हात ठेवून तुम्ही सांगा की आपले वर्तन आजपर्यंत अगदी स्वच्छ आहे. मग तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तसेच करण्यास तुमची तयारी आहे का? तसे नसेल तर देवाला उगीच का दूषण देता?' इतके सांगून श्रीमहाराज त्याला म्हणाले, 'देव दयाळू आहे खास, पण तो तसा न्यायनिष्ठुरदेखील आहे हे विसरू नये!'

~~ हृद्य आठवणी

डोळ्याचे महत्त्व-


श्रीमहाराज सांगत की 'सत्पुरुष त्याच्या डोळ्यांवरून ओळखता येतो. जो अनुसंधानात आहे, त्याची नजर वस्तूंकडे असूनही पूर्ण लक्ष तेथे नसते. जो सिद्ध आहे त्याची नजर लहान मुलासारखी निर्विकार असते. जो मुमुक्षु आहे, त्याची नजर आर्त असते. माणसाला झपाटणाऱ्या कुवासना बहुतांशी डोळ्यांच्या द्वारेच आत शिरतात. माणसाची वृत्ति त्याच्या डोळ्यांवरून कळते. एखाद्याची 'दृष्टी वाईट आहे' असे आपण म्हणतो. देहावसान होताना प्रथम डोळे थिजतात. प्राण गेल्याबरोबर पापण्यांची उघडझाप बंद पडते. डोळ्यांचा उपयोग भगवंताचे दर्शन करण्यासाठी केला तर त्याचे प्रेम लवकर येईल.

*** म्हणून डोळ्यांचा वापर करताना फार दक्षता ठेवावी ***

डोळ्यांना विकार झाला तर तळपायांना काशाच्या वाटीने तेल चोळतात, कानात तेल घालतात; त्यामुळे डोळे शांत होतात. म्हणून दृष्टी चांगली होण्याकरता भगवंताचे नामस्मरण करावे व ते कानांनी ऐकण्याचा अभ्यास ठेवावा. त्यामुळे चित्त एकाग्र होण्यास मदत होईल व दृष्टीही साफ होईल.

(हृद्य आठवणी)

नाम हा सत्कर्मांचा राजा आहे!


पूज्य श्री गुरुदेव रानडे यांना विचारले होते, आपण कोणत्या सामाजिक कार्यात रस घेता? थोडक्यात आपण समाजसेवा कशी करता हा खरा प्रश्न. त्यावर श्री गुरुदेव म्हणाले, "मी नाम घेतो." समाजसेवा वाईट असे नव्हे पण त्यामध्ये प्रत्यक्ष काम करणारे किती व मिरवणारे किती हा प्रश्न आहे. तसेच जे काम करतात ते खरेच निस्वार्थी सेवा करतात की त्यातून लोकांनी आपल्याला मान द्यावा ही अपेक्षा बाळगतात हे ही महत्त्वाचे. लौकिकासाठी सत्कर्म न करावे! मनापासून करणारे व त्यातून अपेक्षा न बाळगणारे फक्त संतच!

भगवंताचे नाम हे सत्-रूप आहे. भगवंत हा सद्गुणांचे निधान आहे. त्याच्या नामाच्या स्मरणाने, अनुसंधानाने किंवा चिंतनाने येणारा विचार हा सद्विचारच असेल. सत् विचारातूनच सत् संकल्प येईल व त्यातूनच सत्कृत्ये घडतील. कारण स्वार्थ, तृष्णा, लोभ यांना मूठमाती मिळेल.

हे समजावून सांगण्यासाठी श्रीमहाराजांनी छान उदाहरण दिले आहे- घड्याळ हे एकात एक गुंतलेल्या चक्रांचे असते. त्यातील प्रत्येक चक्र स्वतंत्रपणे चालू ठेवणे अवघड आहे; पण त्या सर्व चक्रांना गती देणारे मुख्य चक्र चालू ठेवले की आपोआप सर्व लहान चक्रे चालतात किंवा गतिमान होतात. त्याप्रमाणे नामोच्चार हे सत्कार्य घडले की आपल्या हातून घडणारी सर्व कार्ये ही सत्कार्येच असतात. किंबहुना आपल्या हातून सत्कार्ये घडण्याचे टाळता येत नाही. म्हणूनच गुरुदेव म्हणाले, "मी फक्त नाम घेतो!"

~ नामगाथा (डॉ. मधुसूदन बागडे यांच्या पुस्तकातील सारांश)

भक्ताचे भगवंतावरचे प्रेम !!!


श्रीराम. भगवंताचे - सद्गुरूंवरचे प्रेम हे दृश्य नाही. त्याचे निश्चित असे व्यक्त स्वरूप सांगता येत नाही. प्रेम हे कर्म नाही. तो एक अनुभव आहे. जो त्या अनुभवात बुडालेला असतो, तो त्याचे वर्णन शब्दांनी करू शकत नाही. कारण परमप्रेम सिद्ध झाले की ते माणसाच्या ज्ञानेंद्रियांच्या आवाक्यापलीकडे आनंदस्वरूप असते. प्रेमाचा भर ओसरल्यावर भक्त जेव्हा त्या आनंदाचे वर्णन करू लागतो, तेव्हा ते वर्णन म्हणजे त्या आनंदाची केवळ आठवण असते. म्हणूनच तुकोबा म्हणतात, "प्रेम न ये सांगता बोलता दाविता | अनुभव चित्ता चित्त जाणे ||"

आजपर्यंत माझा असलेला "मी" भगवंताला दिल्यानंतरचे प्रेम हे खरे निरुपाधिक प्रेम असते. मग बाकीचे सर्व संबंध गळून पडतात आणि भक्त व भगवंत हा एकच संबंध उरतो. प्रेमस्वरूप अनिर्वचनीय असले, तरी आपल्याला जो आनंद मिळाला तो इतरांना मिळावा किंवा त्याची ओढ लागावी म्हणून; तसेच तो आनंद सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून सत्पुरुष तो शब्दांनी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण तरी त्याची अवस्था मुक्याप्रमाणे होते. "डूबै सो बोले नहीं, बोलै सो अनजान | गहरौ प्रेम-समुद्र कोउ डूबै चतुर सुजान ||" 
eart emoticon
मौज अशी की जो जीव पूर्वी माया समुद्रात बुडत होता, तो आता मायेच्या पलीकडे जाऊन प्रेम समुद्रात बुडतो. समुद्रातल्या थेंबाला - मिठाला जशी समुद्राची ओढ असते, तशी जीवाला भगवंताची ओढ असते. तो प्रेम समुद्रात शिरला की समुद्रच होऊन जातो. मिर्झा गालिब म्हणतात, "इशरते कतरा दर्यामें समा हो जाना|" समुद्रात मिसळून जाणे हे थेंबाचे ऐश्वर्य आहे!

~ श्रीनारद भक्तिसूत्रे (श्री म वि केळकर - पूज्य बाबा बेलसरे यांच्या भक्तिसूत्राच्या प्रवचनांवर आधारित)

नामाने साक्षीभाव साधणे म्हणजे काय?


श्रीराम. समजा, चोवीस तास जळणारा एक दिवा आहे. त्याची ज्योत सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री शांतपणे अखंड तेवत राहते. त्याचप्रमाणे नाम सिद्ध झाले म्हणजे साधकाच्या अंतर्यामी ते अनुस्यूतपणे चालू राहते. त्याच्या अंतरी नामाची धारा अखंडपणे आत्मसागरात पडत राहते. त्यामुळे तो साधक आत्मस्वरूपाशी इतका समरस होतो, की स्वतःच्या देहाकडे व जीवनाकडे तो अत्यंत वेगळेपणाने पाहू लागतो. या परकेपणाने पाहण्यास साक्षीभाव असे म्हणतात. ही फारच रम्य अवस्था असते.

अशा अवस्थेमध्ये स्थिर झालेल्या साधकाच्या जीवनात एक विलक्षण गोष्ट आढळते. तो वागताना माणूस म्हणूनच वागतो. पण त्याच्या वागण्यात नित्य आत्मा आणि अनित्य अनात्मा - म्हणजे दृश्याचा पसारा - यांच्यामध्ये एक लय आढळतो. व्यवहाराशी संबंध नसतो, तेव्हा तो अंतर्मुख होऊन आत्मलीन होतो; परंतु जरूर असते तेव्हा तो बहिर्मुख होऊन दैनंदिन कर्मे यथासांग करतो. तो स्वतः कमालीचा समाधानी असल्याने त्याच्या सहवासात माणसे दुःख विसरतात आणि पुनःपुन: सहवास लाभला तर माणूस आत्मस्वरूपाच्या शोधाकडे पूर्णपणे वळतो!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा)

आपला प्रपंच भगवंत चालवतो याची जाण ठेवावी!


श्रीराम. श्रीमहाराजांचे एक उत्तम शिष्य निवृत्ति वयानंतर घरी बसले. निवृत्तिवेतन कमी असल्याने मुलाच्या उत्पन्नातून घरखर्च चाले. श्रीमहाराज त्याला म्हणाले, "दर महिन्यात खर्चाची तोंडमिळवणी होते का? आपण सर्व चालवता हे उत्तर मला नको. प्रत्यक्ष परिस्थिती काय ती सांग." मुलाने सांगितले, "महिन्याचे शेवटचे दहा दिवस जरा जड जातात." त्यावर श्रीमहाराज म्हणाले, "अरे, ही फार चांगली गोष्ट आहे. या दहा दिवसात तरी आपला प्रपंच भगवंत चालवतो याची जाणीव राहते. अशी ओढ राहणे ही भगवंताची कृपाच समजावी."

जगामधील एकंदर पैशाबद्दल श्रीमहाराज म्हणत की, "पृथ्वीवर एक चतुर्थांश जमीन व तीन चतुर्थांश पाणी आहे. पाण्याचे एकंदर प्रमाण कायम राहते. त्याच्यात फरक होत नाही. पृथ्वीवर एकीकडे जेव्हा भरती येते तेव्हा उलट बाजूला ओहोटी असते. तसेच कुबेराकडे एकून धन कायम असते. आपल्याकडे जेव्हा त्याची भरती असते, तेव्हा दुसऱ्या कोणाकडे तरी त्याची ओहोटी असते. आपल्याकडील भरभराट म्हणजे दुसरीकडे कोठेतरी खडखडाट आहे हे निश्चित समजावे. याचा अर्थ दुसऱ्याच्या विपत्तीतून द्रव्यसंचय करून श्रीमंत व्हायचे व त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा हे कोणत्याही भगवद्भक्ताला हितावह नाही!

(हृद्य आठवणी)

"दाता तो एक जाणा रघुनंदन" हे विसरता कामा नये!


श्रीराम! आपण दुसऱ्याला द्यावं पण किती द्यावं? विसरता येईल इतकंच द्यावं. आपण खायला घालावं पण त्यामागे हे मी श्रीमहाराजांना आवडतं म्हणून करतो आहे ही पक्की भावना हवी. "दाता तो एक जाणा रघुनंदन" हे विसरता कामा नये. कारण मी केल्याने होईल ही भावना पूर्णपणे गेल्याशिवाय परमार्थ नाही!

~परमपूज्य बाबा बेलसरे

Friday, June 19, 2015

अनावश्यक कल्पनांचा त्याग !


श्रीराम. खरं पाहता रोजच्या नेहमीच्या व्यवहारात दडपण नसतं. पण काही समस्या आली की दडपण येतं. त्यावेळी आपली प्रतिक्रिया बदलणं आणि मौनात जाणं आवश्यक आहे. आतलं मन शांत करणं म्हणजे मौनात जाणं. जरूर नसेल तेथे बोलूच नये. स्वयंपाक करताना, स्वस्थ बसलेले असतो तेव्हा श्रीमहाराजांचेच विचार करावे. हे साधण्यास उपाय काय?

वस्तू समोर आली की विचार; वस्तू गेली की विचार बंद! श्रीमहाराज कोणी यायचा असला किंवा आला असला की त्यासंबंधी बोलत. तो गेला की तो विषय बंद! Out of picture, out of sight, out of mind!!!

आपल्याला मागचं तरी आठवतं किंवा पुढचं तरी विचारात येतं. उदाहरण सांगू का मनामधून कसं हलत नाही ते? घरातल्या कुणाला उशीर झाला, की विचार येतो, का उशीर झाला असेल? फोन आला का? गाड्या वेळेवर आहेत ना? वगैरे. मनाची शक्ती आपण फुकट वाया घालवतो. ती आवरली तर लगेच शांतीचा अनुभव येईल. गीतेचे ध्येय आहे- आत्मशांती! "त्यागात् शान्ति निरन्तरम्!" आणि मी हे अनुभवाने सांगेन की हे (अनावश्यक कल्पनांचा त्याग) नामाने साधते.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे

Thursday, June 18, 2015

अखंड अनुसंधानात मौनाचे महत्त्व --


श्रीराम. अंतर्मुख झाल्यावाचून भगवंताचे अनुसंधान साधत नाही. वृत्तीची बाहेर धावण्याची सवय सुटल्याशिवाय अंतर्मुख होता येत नाही. वाणीच्या द्वारा वृत्ती जोराने बाहेर धावते, म्हणून बोलणे थांबवले तर वृत्तीचा बहिर्मुखपणा आपोआप क्षीण होतो. तोंडाने बोलणे बंद करणे म्हणजे मौन पाळणे असा सामान्य समाज आहे. पण ते खरे मौन नव्हे. भगवंताच्या चिंतनामध्ये पूर्णपणे गुंतल्याने बोलण्याचे भान न उरणे हे खरे मौन होय.

ज्या प्रक्रियेने जीव परावाणीपासून घसरला आणि वैखरीपर्यंत पोचला त्याच्या उलट प्रक्रियेने वैखरीपासून परत परावाणीपर्यंत पोचवण्याचे कार्य मौन करते. म्हणून मौन हा अनुसंधानाचा मोठा आधार आहे. नामाचा अभ्यास वैखरीपासून परेपर्यंतचा आहे. वैखरीने नाम प्रारंभ केल्यावर फालतू बोलणे आपोआप कमी होते. हे नाम स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत हळू हळू अभ्यासाने पोहोचते. अखेर सद्गुरू कृपेने पश्यन्तीतल्या नामाचा लय परेमध्ये होतो.

परेचा पूर्ण उदय झाला की भगवंताच्या अस्तित्वाचे केवळ भान उरते. अनाहत नादाने अंतर्याम भरून जाते. शुद्ध चेतनेच्या या नादास ब्रह्मनाद म्हणतात.

या प्रवासात मौनाचे फार महत्त्व आहे. तोंडाने मौन पाळणे चांगले, बोलावे असे न वाटणे अधिक चांगले, बोलण्याची ऊर्मी न येणे उत्तम तर बोलण्याची वृत्ती लोपणे सर्वोत्तम होय! निर्विचार, निर्विकल्प आणि निःशब्द होण्यास मौनासारखा रामबाण उपाय नाही. म्हणून मौन साधले की शरीर व मन अनुसंधानास पात्र होतात!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (अंतर्यात्रा- सारांश)

Saturday, June 13, 2015

सद्गुरूंना विश्रांतीस योग्य असे आपले हृदय हवे!


श्रीराम. मानसपूजेच्या शेवटी भगवंताला / सद्गुरूंना हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास आपण सांगतो. इतर पूजे सारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे. म्हणजेच आपल्या इष्ट देवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यात एक मेख आहे. ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो, त्याला राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार सर्वांनी करावा. तिथे प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वर्तन आपल्या हातून होता कामा नये, नाही का? जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल नाही का? आपण जर ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, तर त्यांच्या विश्रांतीला धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा! हे भान जर सतत राहिले ना तर तुमचा देहच मंदिर बनेल!

~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून

Friday, June 12, 2015

Be obsessed with Shri Maharaj!

||श्रीराम समर्थ||


भक्ति हा पंचम पुरुषार्थ कसा?


श्रीराम. भक्ति हा पंचम पुरुषार्थ कसा हा प्रश्न आहे. भगवंताला सुद्धा आनंदाचा उद्रेक विश्वात पसरलेला पाहून असं वाटलं की मला हा भोगता येईल का? पण भोगायला द्वैत म्हणजे दोन पाहिजेत. म्हणून तो भक्ताच्या अंतःकरणात निस्वार्थी प्रेम पेरतो आणि मग कमाल काय होते? तो स्वतंत्र असूनही स्वखुशीने भक्तीशी परतंत्र होऊन जातो आणि भक्ताच्या हृदयात राहतो.

आपलं डोकं भगवंताच्या पायावर व त्याचे पाय आपल्या हृदयात आपण ठेवतो. पण जेव्हा आपलं डोकं त्याच्या हृदयात राहील तेव्हा भक्तीचा उत्कर्ष होईल आणि तो भक्त नाचवेल तसा नाचेल. श्रीमहाराज म्हणायचे, "रामाने माझं ऐकलं नाही असं आजपर्यंत झालं नाही!" ही ती अवस्था. Divine becomes human. समर्थ रामदास रामालाच challenge देतात, (जुना दासबोध) तू काय काम करशील इतकं काम आम्ही तुझ्या नामाकडून करून घेतो. तू दगड तारलेस, आम्ही माणसे तारतो वगैरे. आम्ही नाचवू तसा तू नाचणार!

मग श्रीमहाराज म्हणाले, भक्ताची इच्छा पूर्ण करून भगवंत तृप्त होतो, जसं लहान मुलाला आई त्याच्या आवडीचे पदार्थ करून खायला घालून स्वतः तृप्त होते! परमात्मा वश करून घ्यायचं मर्म काय तर भक्ति. भक्ति नावाची शक्ती आहे. तिला आपण निर्माण करून हा स्वतः परतंत्र होतो. हा पंचम पुरुषार्थ! भगवंत ह्याच्या स्वाधीन होतो.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (संवाद आणि मार्गदर्शन)