श्रीराम. भगवंताचे - सद्गुरूंवरचे प्रेम हे दृश्य नाही. त्याचे निश्चित असे व्यक्त स्वरूप सांगता येत नाही. प्रेम हे कर्म नाही. तो एक अनुभव आहे. जो त्या अनुभवात बुडालेला असतो, तो त्याचे वर्णन शब्दांनी करू शकत नाही. कारण परमप्रेम सिद्ध झाले की ते माणसाच्या ज्ञानेंद्रियांच्या आवाक्यापलीकडे आनंदस्वरूप असते. प्रेमाचा भर ओसरल्यावर भक्त जेव्हा त्या आनंदाचे वर्णन करू लागतो, तेव्हा ते वर्णन म्हणजे त्या आनंदाची केवळ आठवण असते. म्हणूनच तुकोबा म्हणतात, "प्रेम न ये सांगता बोलता दाविता | अनुभव चित्ता चित्त जाणे ||"
आजपर्यंत माझा असलेला "मी" भगवंताला दिल्यानंतरचे प्रेम हे खरे निरुपाधिक प्रेम असते. मग बाकीचे सर्व संबंध गळून पडतात आणि भक्त व भगवंत हा एकच संबंध उरतो. प्रेमस्वरूप अनिर्वचनीय असले, तरी आपल्याला जो आनंद मिळाला तो इतरांना मिळावा किंवा त्याची ओढ लागावी म्हणून; तसेच तो आनंद सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून सत्पुरुष तो शब्दांनी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण तरी त्याची अवस्था मुक्याप्रमाणे होते. "डूबै सो बोले नहीं, बोलै सो अनजान | गहरौ प्रेम-समुद्र कोउ डूबै चतुर सुजान ||"
eart emoticon
मौज अशी की जो जीव पूर्वी माया समुद्रात बुडत होता, तो आता मायेच्या पलीकडे जाऊन प्रेम समुद्रात बुडतो. समुद्रातल्या थेंबाला - मिठाला जशी समुद्राची ओढ असते, तशी जीवाला भगवंताची ओढ असते. तो प्रेम समुद्रात शिरला की समुद्रच होऊन जातो. मिर्झा गालिब म्हणतात, "इशरते कतरा दर्यामें समा हो जाना|" समुद्रात मिसळून जाणे हे थेंबाचे ऐश्वर्य आहे!
~ श्रीनारद भक्तिसूत्रे (श्री म वि केळकर - पूज्य बाबा बेलसरे यांच्या भक्तिसूत्राच्या प्रवचनांवर आधारित)
No comments:
Post a Comment