Translate

Friday, July 3, 2015

नाम हा सत्कर्मांचा राजा आहे!


पूज्य श्री गुरुदेव रानडे यांना विचारले होते, आपण कोणत्या सामाजिक कार्यात रस घेता? थोडक्यात आपण समाजसेवा कशी करता हा खरा प्रश्न. त्यावर श्री गुरुदेव म्हणाले, "मी नाम घेतो." समाजसेवा वाईट असे नव्हे पण त्यामध्ये प्रत्यक्ष काम करणारे किती व मिरवणारे किती हा प्रश्न आहे. तसेच जे काम करतात ते खरेच निस्वार्थी सेवा करतात की त्यातून लोकांनी आपल्याला मान द्यावा ही अपेक्षा बाळगतात हे ही महत्त्वाचे. लौकिकासाठी सत्कर्म न करावे! मनापासून करणारे व त्यातून अपेक्षा न बाळगणारे फक्त संतच!

भगवंताचे नाम हे सत्-रूप आहे. भगवंत हा सद्गुणांचे निधान आहे. त्याच्या नामाच्या स्मरणाने, अनुसंधानाने किंवा चिंतनाने येणारा विचार हा सद्विचारच असेल. सत् विचारातूनच सत् संकल्प येईल व त्यातूनच सत्कृत्ये घडतील. कारण स्वार्थ, तृष्णा, लोभ यांना मूठमाती मिळेल.

हे समजावून सांगण्यासाठी श्रीमहाराजांनी छान उदाहरण दिले आहे- घड्याळ हे एकात एक गुंतलेल्या चक्रांचे असते. त्यातील प्रत्येक चक्र स्वतंत्रपणे चालू ठेवणे अवघड आहे; पण त्या सर्व चक्रांना गती देणारे मुख्य चक्र चालू ठेवले की आपोआप सर्व लहान चक्रे चालतात किंवा गतिमान होतात. त्याप्रमाणे नामोच्चार हे सत्कार्य घडले की आपल्या हातून घडणारी सर्व कार्ये ही सत्कार्येच असतात. किंबहुना आपल्या हातून सत्कार्ये घडण्याचे टाळता येत नाही. म्हणूनच गुरुदेव म्हणाले, "मी फक्त नाम घेतो!"

~ नामगाथा (डॉ. मधुसूदन बागडे यांच्या पुस्तकातील सारांश)

No comments:

Post a Comment