Translate

Friday, July 3, 2015

देव जसा दयाळू, तसा न्यायीही आहे हे विसरू नये -


श्रीराम. एक पैसे खाणारा माणूस होता. एका प्रकरणात पैसे खाण्याच्या आरोपावरून त्याला निलंबित करण्यात आले. प्रत्यक्ष त्या प्रकरणात त्याने पैसे खाल्ले नव्हते. तो श्रीमहाराजांना भेटला व म्हणाला, 'या प्रकरणात माझ्यावर पैसे खाण्याचा आरोप अगदी खरा नाही. यामध्ये जर मला शिक्षा झाली तर देवाचे घरी न्याय नाही, देवधर्म व रामनाम सर्व थोतांड आहे, असे मी ओरडून लोकांना सांगेन.'

श्रीमहाराज म्हणाले, 'दिवाळी जवळ आली म्हणजे आधी चारपाच दिवस घरात वेगवेगळे फराळाचे जिन्नस करू लागतात. त्यांचा नमुना पाहण्यासाठी आपण ते खातो. त्यावेळी नेहमीचे जेवणही आपण जेवतो. नंतर खुद्द दिवाळी आली म्हणजे फराळाचे यथेच्छ खातो. दिवाळीचे चार दिवस गेल्यावर आपल्याला अजीर्ण होते. मग पाचव्या दिवशी आपण नुसता ताकभात खातो. पण अजीर्णाचा जोर होऊन सहाव्या दिवशी आपल्याला ओकाऱ्या व जुलाब जोरात सुरु होतात. तेव्हा जर आपण लोकांस सांगत सुटलो की, 'अहो, काल मी नुसता ताकभातच खाल्ला आहे तरी मला हा त्रास का होतो आहे कोण जाणे!' आपले म्हणणे बरोबर ठरेल का?

देवाच्या पायावर हात ठेवून तुम्ही सांगा की आपले वर्तन आजपर्यंत अगदी स्वच्छ आहे. मग तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तसेच करण्यास तुमची तयारी आहे का? तसे नसेल तर देवाला उगीच का दूषण देता?' इतके सांगून श्रीमहाराज त्याला म्हणाले, 'देव दयाळू आहे खास, पण तो तसा न्यायनिष्ठुरदेखील आहे हे विसरू नये!'

~~ हृद्य आठवणी

No comments:

Post a Comment