Translate

Friday, July 3, 2015

तितिक्षा सा निगद्यते!!!


श्रीराम. माणसाचे मन विश्वमनाचा अंशच असल्याने त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. लोकांचा द्वेष आणि निंदा करण्यात आपण विनाकारण तिचा व्यय करतो. म्हणून आपण तर कधी द्वेष किंवा निंदा करू नयेच पण कोणी आपली निंदा केली तर ती आनंदाने किंवा विनोदाने सोसावी. उदाहरणार्थ :

एक चांगला साधक रस्त्याने चालला होता. त्याची निंदा करणारा मनुष्य वाटेत भेटला. साधकाने मोठ्या प्रेमाने त्याचे स्वागत केले. निंदक बरोबर चालू लागून त्याची वाटेत तो निंदा करू लागला. मोठ्या प्रसन्नतेने साधकाने त्याचे बोलणे ऐकून घेतले. इतक्यात तो थांबला आणि निंदकाला म्हणाला, "मित्रा, तुला आणखी जे काही बोलायचे ते बोलून घे. मी येथे उभा राहतो. पुढे माझ्यावर प्रेम करणारे लोक राहतात. ते तुला त्रास देतील.." निंदक चुपचाप न बोलता निघून गेला.

मलिक नावाचा एक तपस्वी होता. त्याचे अंतःकरण लहान मुलाप्रमाणे सरळ होते. एके दिवशी तो रस्त्याने जात असता "ए बदमाष" म्हणून एका बाईने त्याला हाक मारली. अत्यंत नम्रतेने त्याने उत्तर दिले, "बाई, इतक्या दिवसात माझ्या खऱ्या नावाने हाक मारणारी तूच प्रथम भेटलीस. तू मला बरोबर ओळखलेस म्हणून आनंद वाटला. भगवंताला विसरून जगणे बदमाषीच आहे."

दक्षिणेत व्यंकटनाथ नावाचा मोठा भक्त होऊन गेला. तो फार विद्वान होता. त्याचा द्वेष करणाऱ्या मंडळींनी एक दिवस जुन्या जोड्यांची मोठी माळ त्याच्या दारात टांगून ठेवली. ती अशी टांगली की जो कोणी आतून बाहेर येईल त्याच्या डोक्याला ती बरोबर लागावी. व्यंकटनाथ जेव्हा बाहेर आला, तेव्हा त्याच्या डोक्याला ती लागली. ते पाहून सगळे हसले. पण अगदी शांतपणे व्यंकटनाथाने पुढील श्लोक म्हटला: "कर्मावलंबकाः केचित् केचित् ज्ञानावलंबकाः| वयं तु हरिदासानां पादरक्षावलंबकाः ||" म्हणजे- "काही लोक कर्ममार्गाने जातात, काही ज्ञानमार्गाने. पण आम्ही मात्र हरिदासांच्या म्हणजे भगवद्भक्तांच्या जोड्यांचे अनुयायी आहोत. आमच्यावर आज खरोखर भगवंताची कृपा झाली."

तात्पर्य- साधकाच्या अंगी विवेकाने आलेली नम्रता हवी. नम्रतेशिवाय कोणी संत होऊ शकत नाही; संत आणि नम्रता एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (सहजसमाधी)

1 comment: