श्रीराम. भगवंताची कृपा म्हणजे संतांनी रचलेली संकल्पना नाही. त्यांच्या आत्मबुद्धीला घडलेले ते एक साक्षात दर्शन आहे. जीवनाकडे समग्रपणे पाहता आले - म्हणजे अहंकारशून्य होऊन पाहता आले - तर भगवंताची कृपा ही काय वस्तू आहे याचा अंदाज येतो. नामस्मरणाने ही समग्रपणाची दृष्टी नकळत प्राप्त होते. कृपापात्र माणसाच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग आल्यावाचून राहात नाहीत. पण प्रत्येक प्रसंगामध्ये एक जबरदस्त कल्याणकारी शक्ती आपल्याला सांभाळते असा प्रत्यक्ष अनुभव त्याला येतो. जीवनामध्ये काहीही उलथापालथ झाली, तरी भगवंतापासून, त्याच्या नामापासून मन न चळणे ही कृपेची सर्वोत्तम प्रचीती होय. वासनेचा आघात क्षीण होणे, दृश्याला चिकटलेले मन तेथून सुटून भगवंताला तितकेच दृढपणे चिकटणे आणि भगवंताच्या नामाची गोडी उत्पन्न होणे यांमध्ये भगवंताच्या कृपेचे साधनी माणसाला दर्शन घडते. किंबहुना या दर्शनामध्ये नामस्मरणाचे फळ साठवलेले आहे असे म्हणणे अनुभवला अधिक धरून आहे.
भगवंताच्या कृपेचे भान प्राप्त झालेला साधनी माणूस नित्यकर्मे करताना सामान्य माणसासारखा दिसतो. परंतु लहान सहान प्रसंगामध्ये देखील "हा आपल्यातील नव्हे" असे निकटवर्तीयांच्या ध्यानात आल्यावाचून राहात नाही.
नाम घेणाऱ्याने हे ध्यानात ठेवावे की कृपेची जाणीव साधनी माणसाला भगवंताच्या अति निकट घेऊन जाते. त्यावेळी नामाची सांगत म्हणजे काय याचा अनुभव येतो. तेथे भगवंताची दिव्य वाणी अनाहतनादरूपाने ऐकायला येते. इतकेच नव्हे तर भगवंताच्या ऐक्यासनावर बसण्याचे भाग्य लाभते!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत)