Translate

Friday, June 12, 2015

तुका म्हणे आम्ही या जनाविरहित | होउनि निश्चिंत क्रीडा करू ||


श्रीराम. खरे संत सत्पुरुष सर्वसामान्य लोकांसारखे आयुष्य व्यतीत करताना दिसले तरी त्यांचे अंतरंग कसे भगवद्भक्तीने भरलेले आणि भारलेले असते ते सांगणारा तुकोबांचा एक गोड अभंग –

नटनाट्य अवघे संपादिले सोंग | भेद दाऊ रंग न पालटे ||
मांडियेला खेळ कौतुके बहुरूप | आपुले स्वरूप जाणतसो ||
स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे | भाव दावी पिवळे लाल संगे ||
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित | होउनि निश्चिंत क्रीडा करू ||

~ संत बाह्य व्यवहार इतरांसारखा करीत असताना देखील त्यांचा आत्मबोध मलीन होत नाही हे सांगताना तुकोबा म्हणतात, नट जसे विविध वेषभूषा करून व्यक्तिरेखा वठवतात, तसे आम्ही केले तरी आमची अंतस्थिती बदलत नाही. आम्ही बहुरूप्याप्रमाणे हा संसाराचा खेळ कौतुकाने मांडत असलो, तरी आमचे खरे स्वरूप आम्ही जाणतो. स्फटिकाचा दगड इतर रंगांच्या दगडांच्या संगतीने लाल पिवळे रंग दाखवतो पण त्याला स्वतःचा असा कोणता रंग नसतो. तसेच आम्ही स्वात्मबोधाने युक्त असल्याने इतर जनांपेक्षा वेगळे राहून निश्चिंतपणाने संसाराचा खेळ खेळतो!

~~ श्रीमहाराजांच्या “खेळा ऐसा प्रपंच मानावा” या ओळींची आठवण होणे साहजिक आहे. खरोखर सर्व संत एकच सांगतात, तुकोबा काय, एकनाथ महाराज काय किंवा समर्थ काय; आत्मबोध मलीन न होता प्रपंच करा हा बोध देतात. याला उत्तम उपाय भगवंताचे अखंड स्मरण आणि स्मरणाला उत्तम उपाय भगवंताचे नाम असे महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. प्रपंच भगवंताच्या स्मरणात केला तर तो परमार्थच होय असे ठाम प्रतिपादन महाराजांनी केले आहे. हे नसते तर आपल्या सारख्या प्रापंचिकांना काही दिलासा होता का? असा सवाल पूज्य बाबा बेलसरे करतात.
महाराज म्हणत, नामाच्या स्मरणात प्रपंच केलात तर त्याचे चटके सोसण्याची ताकद तुमच्यात येईल. किंबहुना ते चटके हे चटके न वाटता ही देखील परमेश्वराची कृपाच माझ्यावर आहे अशी पक्की भावना तयार होण्यास मदत होईल. पूज्य बाबा म्हणतात त्याप्रमाणे सद्गुरूंबद्दल – परमेश्वराबद्दल शुद्ध विचार करणे – शंका-विरहित विचार करणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. हा शुद्ध विचार चित्तशुद्धी होऊ लागली की चालू होतो आणि चित्तशुद्धीला नामासारखा उपाय नाही! हे साधले तर मग वरील अभंगाप्रमाणे “दुनिया में हूँ दुनिया का तलबगार नहीं| बाज़ार से गुजरा हूँ, खरीदार नहीं” अशी अवस्था अनायासच प्राप्त होईल; त्यासाठी वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत!

No comments:

Post a Comment