श्रीराम. सद्गुरूंशी कोणता संबंध जोडावा याचा अभ्यास करताना "मी तुमचे मूल आहे," "मला तुमच्याशिवाय कोणी नाही", हा भाव अखेर मला पसंत पडला. श्रीसद्गुरूंना लहानपणची वृत्ती फार आवडते, म्हणून मी त्यांना "माऊली" मानू लागलो. वासनांनी आणि विकारांनी बरबटलेला मी मोठा हट्टी, रडका आणि अडाणी आहे; उलट श्रीसद्गुरूंचे अंतःकरण इतके विशाल, द्रयार्द्र आणि क्षमाशील आहे, की माझ्या सारख्या अपंग पोरावर त्यांचे मायेचे पांघरूण सदैव राहते. प्रापंचिक वासनांमध्ये मी पुन्हा पुन्हा बुडी मारतो, त्यातून बाहेर काढून पुन्हा पुन्हा प्रेमाने व अंतःकरण न दुखावता मला स्वच्छ करणारी श्रीसद्गुरू माऊली धन्य होय. म्हणून मी त्यांचे लहान मूल झालो.
माझ्या जीवनात श्रीसद्गुरू जे घडवून आणतील, जे मला देतील, जे माझ्यापासून नेतील, जे सुखदुःख भोगायला लावतील, जे करण्याची संधी देतील, ते सगळे शंभर टक्के माझ्या कल्याणाचे असणार अशी माझ्या मनाची खरी भावना मी करून घेतली. म्हणून दुःखाचा प्रसंग आला तर एकदम दुःख करायचे नाही आणि सुखाचा प्रसंग आला तरी एकदम सुखी व्हायचे नाही; दोन्ही प्रसंगांमध्ये जरा दम खायची म्हणजे शांत रहायची सवय कष्ट न करता माझ्या मनाला लागली!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (आनंदसाधना)
No comments:
Post a Comment