Translate

Friday, June 19, 2015

अनावश्यक कल्पनांचा त्याग !


श्रीराम. खरं पाहता रोजच्या नेहमीच्या व्यवहारात दडपण नसतं. पण काही समस्या आली की दडपण येतं. त्यावेळी आपली प्रतिक्रिया बदलणं आणि मौनात जाणं आवश्यक आहे. आतलं मन शांत करणं म्हणजे मौनात जाणं. जरूर नसेल तेथे बोलूच नये. स्वयंपाक करताना, स्वस्थ बसलेले असतो तेव्हा श्रीमहाराजांचेच विचार करावे. हे साधण्यास उपाय काय?

वस्तू समोर आली की विचार; वस्तू गेली की विचार बंद! श्रीमहाराज कोणी यायचा असला किंवा आला असला की त्यासंबंधी बोलत. तो गेला की तो विषय बंद! Out of picture, out of sight, out of mind!!!

आपल्याला मागचं तरी आठवतं किंवा पुढचं तरी विचारात येतं. उदाहरण सांगू का मनामधून कसं हलत नाही ते? घरातल्या कुणाला उशीर झाला, की विचार येतो, का उशीर झाला असेल? फोन आला का? गाड्या वेळेवर आहेत ना? वगैरे. मनाची शक्ती आपण फुकट वाया घालवतो. ती आवरली तर लगेच शांतीचा अनुभव येईल. गीतेचे ध्येय आहे- आत्मशांती! "त्यागात् शान्ति निरन्तरम्!" आणि मी हे अनुभवाने सांगेन की हे (अनावश्यक कल्पनांचा त्याग) नामाने साधते.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे

Thursday, June 18, 2015

अखंड अनुसंधानात मौनाचे महत्त्व --


श्रीराम. अंतर्मुख झाल्यावाचून भगवंताचे अनुसंधान साधत नाही. वृत्तीची बाहेर धावण्याची सवय सुटल्याशिवाय अंतर्मुख होता येत नाही. वाणीच्या द्वारा वृत्ती जोराने बाहेर धावते, म्हणून बोलणे थांबवले तर वृत्तीचा बहिर्मुखपणा आपोआप क्षीण होतो. तोंडाने बोलणे बंद करणे म्हणजे मौन पाळणे असा सामान्य समाज आहे. पण ते खरे मौन नव्हे. भगवंताच्या चिंतनामध्ये पूर्णपणे गुंतल्याने बोलण्याचे भान न उरणे हे खरे मौन होय.

ज्या प्रक्रियेने जीव परावाणीपासून घसरला आणि वैखरीपर्यंत पोचला त्याच्या उलट प्रक्रियेने वैखरीपासून परत परावाणीपर्यंत पोचवण्याचे कार्य मौन करते. म्हणून मौन हा अनुसंधानाचा मोठा आधार आहे. नामाचा अभ्यास वैखरीपासून परेपर्यंतचा आहे. वैखरीने नाम प्रारंभ केल्यावर फालतू बोलणे आपोआप कमी होते. हे नाम स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत हळू हळू अभ्यासाने पोहोचते. अखेर सद्गुरू कृपेने पश्यन्तीतल्या नामाचा लय परेमध्ये होतो.

परेचा पूर्ण उदय झाला की भगवंताच्या अस्तित्वाचे केवळ भान उरते. अनाहत नादाने अंतर्याम भरून जाते. शुद्ध चेतनेच्या या नादास ब्रह्मनाद म्हणतात.

या प्रवासात मौनाचे फार महत्त्व आहे. तोंडाने मौन पाळणे चांगले, बोलावे असे न वाटणे अधिक चांगले, बोलण्याची ऊर्मी न येणे उत्तम तर बोलण्याची वृत्ती लोपणे सर्वोत्तम होय! निर्विचार, निर्विकल्प आणि निःशब्द होण्यास मौनासारखा रामबाण उपाय नाही. म्हणून मौन साधले की शरीर व मन अनुसंधानास पात्र होतात!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (अंतर्यात्रा- सारांश)

Saturday, June 13, 2015

सद्गुरूंना विश्रांतीस योग्य असे आपले हृदय हवे!


श्रीराम. मानसपूजेच्या शेवटी भगवंताला / सद्गुरूंना हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास आपण सांगतो. इतर पूजे सारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे. म्हणजेच आपल्या इष्ट देवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यात एक मेख आहे. ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो, त्याला राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार सर्वांनी करावा. तिथे प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वर्तन आपल्या हातून होता कामा नये, नाही का? जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल नाही का? आपण जर ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, तर त्यांच्या विश्रांतीला धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा! हे भान जर सतत राहिले ना तर तुमचा देहच मंदिर बनेल!

~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून

Friday, June 12, 2015

Be obsessed with Shri Maharaj!

||श्रीराम समर्थ||


भक्ति हा पंचम पुरुषार्थ कसा?


श्रीराम. भक्ति हा पंचम पुरुषार्थ कसा हा प्रश्न आहे. भगवंताला सुद्धा आनंदाचा उद्रेक विश्वात पसरलेला पाहून असं वाटलं की मला हा भोगता येईल का? पण भोगायला द्वैत म्हणजे दोन पाहिजेत. म्हणून तो भक्ताच्या अंतःकरणात निस्वार्थी प्रेम पेरतो आणि मग कमाल काय होते? तो स्वतंत्र असूनही स्वखुशीने भक्तीशी परतंत्र होऊन जातो आणि भक्ताच्या हृदयात राहतो.

आपलं डोकं भगवंताच्या पायावर व त्याचे पाय आपल्या हृदयात आपण ठेवतो. पण जेव्हा आपलं डोकं त्याच्या हृदयात राहील तेव्हा भक्तीचा उत्कर्ष होईल आणि तो भक्त नाचवेल तसा नाचेल. श्रीमहाराज म्हणायचे, "रामाने माझं ऐकलं नाही असं आजपर्यंत झालं नाही!" ही ती अवस्था. Divine becomes human. समर्थ रामदास रामालाच challenge देतात, (जुना दासबोध) तू काय काम करशील इतकं काम आम्ही तुझ्या नामाकडून करून घेतो. तू दगड तारलेस, आम्ही माणसे तारतो वगैरे. आम्ही नाचवू तसा तू नाचणार!

मग श्रीमहाराज म्हणाले, भक्ताची इच्छा पूर्ण करून भगवंत तृप्त होतो, जसं लहान मुलाला आई त्याच्या आवडीचे पदार्थ करून खायला घालून स्वतः तृप्त होते! परमात्मा वश करून घ्यायचं मर्म काय तर भक्ति. भक्ति नावाची शक्ती आहे. तिला आपण निर्माण करून हा स्वतः परतंत्र होतो. हा पंचम पुरुषार्थ! भगवंत ह्याच्या स्वाधीन होतो.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (संवाद आणि मार्गदर्शन)

परमार्थ हा आपल्या आतंरिक आनंदाकरता हवा!


श्रीराम! महाराज देहात असताना एका बाईने त्यांना एक झेंडूचं फूल आणून दिलं. ती म्हणाली, महाराज मी लावलेल्या झाडाचं पहिलं फूल म्हणून तुम्हाला देण्याकरता आणलंय. महाराजांनी फुलाकडे पाहिलं आणि म्हणाले, आपण या फुलासारखं जगलं पाहिजे!

फुलाला कधी काही असे वाटते का की कोण माझ्याकडे पाहील का? कुणी माझा वास घेईल का? ते तसंच उमलतं. त्याप्रमाणे आपला परमार्थ हा आपल्या आतंरिक आनंदाकरता हवा. हे जे अंतरंगातले परमात्म स्वरुप आहे त्यालाही अशी उमलण्याची हौस आहे. ते होईल असे ख़त पाणी आपण अंतरंगाला घातलं पाहिजे!

~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून

आतमध्ये ईश्वराचे अनुसंधान आणि बाहेर जगाशी संपूर्ण संवाद असे मंगलमय जीवन!


श्रीराम. जगावरील प्रेमात आणि ईश्वरावरील प्रेमात फरक आहे. जगावरील प्रेमात जगाचे वेगळेपण नजरेआड होत नाही. ईश्वरावरील प्रेमामध्ये माणूस ईश्वरपणामध्ये सहभागी होतो. तो ईश्वराचे ईश्वरपण अनुभवतो. त्या अनुभवामध्ये माणसाच्या अंतर्यामी ईश्वराशी अतिशय निकट आणि जिवंत संबंध प्रस्थापित होतो. त्या आंतरिक संबंधातून ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या खरेपणाबद्दल आणि त्याच्या स्वरूपाबद्दल एक जबरदस्त श्रद्धा उत्पन्न होते. ती श्रद्धा बोधमय असते. त्या श्रद्धेमुळे ईश्वर हाच एक माणसाच्या जीवनाचे आलंबन होतो.

*** माणूस स्वतः आणि स्वतःचे सर्व घेऊन पूर्णपणे ईश्वराचा होऊन जातो. ***

अंतरी ईश्वर स्थिरावून त्याचा अतींद्रिय सहवास लाभल्यामुळे माणसाच्या जीवनातील साऱ्या क्रिया ईश्वराच्या साक्षीपणाने घडतात. मग माणसाला आपले जीवितकार्य कळते. त्याच्या हातून खरे निष्काम कर्म घडते. त्याच्या आयुष्यात भय, चिंता, उदासीनता आणि न्यूनपणाची भावना यांना स्थानच उरत नाही. माणूस बुद्धीने चिंतन करतो तोपर्यंत ईश्वर ही एक मोठी अर्थगर्भ संकल्पना असते. पण प्रतिभा जागी झाली की ईश्वर जणू काय समोरसमोर येतो. प्रतिभेच्या सामर्थ्याने संकल्पनेत वास करणारा ईश्वर स्वतःमध्ये स्वतः इतकाच जिवंतपणे प्रगट होतो. "मी" आपलेपणाच्या प्रेमरज्जूने ईश्वराशी नित्ययुक्त होतो. तो परममूल्य बनून सबंध जीवन व्यापून टाकतो आणि आतमध्ये ईश्वराचे अनुसंधान आणि बाहेर जगाशी पूर्ण संवाद असे मंगलमय जीवन माणूस जगतो!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ईश्वर-स्वरूप आणि साक्षात्कार)

तुका म्हणे आम्ही या जनाविरहित | होउनि निश्चिंत क्रीडा करू ||


श्रीराम. खरे संत सत्पुरुष सर्वसामान्य लोकांसारखे आयुष्य व्यतीत करताना दिसले तरी त्यांचे अंतरंग कसे भगवद्भक्तीने भरलेले आणि भारलेले असते ते सांगणारा तुकोबांचा एक गोड अभंग –

नटनाट्य अवघे संपादिले सोंग | भेद दाऊ रंग न पालटे ||
मांडियेला खेळ कौतुके बहुरूप | आपुले स्वरूप जाणतसो ||
स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे | भाव दावी पिवळे लाल संगे ||
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित | होउनि निश्चिंत क्रीडा करू ||

~ संत बाह्य व्यवहार इतरांसारखा करीत असताना देखील त्यांचा आत्मबोध मलीन होत नाही हे सांगताना तुकोबा म्हणतात, नट जसे विविध वेषभूषा करून व्यक्तिरेखा वठवतात, तसे आम्ही केले तरी आमची अंतस्थिती बदलत नाही. आम्ही बहुरूप्याप्रमाणे हा संसाराचा खेळ कौतुकाने मांडत असलो, तरी आमचे खरे स्वरूप आम्ही जाणतो. स्फटिकाचा दगड इतर रंगांच्या दगडांच्या संगतीने लाल पिवळे रंग दाखवतो पण त्याला स्वतःचा असा कोणता रंग नसतो. तसेच आम्ही स्वात्मबोधाने युक्त असल्याने इतर जनांपेक्षा वेगळे राहून निश्चिंतपणाने संसाराचा खेळ खेळतो!

~~ श्रीमहाराजांच्या “खेळा ऐसा प्रपंच मानावा” या ओळींची आठवण होणे साहजिक आहे. खरोखर सर्व संत एकच सांगतात, तुकोबा काय, एकनाथ महाराज काय किंवा समर्थ काय; आत्मबोध मलीन न होता प्रपंच करा हा बोध देतात. याला उत्तम उपाय भगवंताचे अखंड स्मरण आणि स्मरणाला उत्तम उपाय भगवंताचे नाम असे महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. प्रपंच भगवंताच्या स्मरणात केला तर तो परमार्थच होय असे ठाम प्रतिपादन महाराजांनी केले आहे. हे नसते तर आपल्या सारख्या प्रापंचिकांना काही दिलासा होता का? असा सवाल पूज्य बाबा बेलसरे करतात.
महाराज म्हणत, नामाच्या स्मरणात प्रपंच केलात तर त्याचे चटके सोसण्याची ताकद तुमच्यात येईल. किंबहुना ते चटके हे चटके न वाटता ही देखील परमेश्वराची कृपाच माझ्यावर आहे अशी पक्की भावना तयार होण्यास मदत होईल. पूज्य बाबा म्हणतात त्याप्रमाणे सद्गुरूंबद्दल – परमेश्वराबद्दल शुद्ध विचार करणे – शंका-विरहित विचार करणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. हा शुद्ध विचार चित्तशुद्धी होऊ लागली की चालू होतो आणि चित्तशुद्धीला नामासारखा उपाय नाही! हे साधले तर मग वरील अभंगाप्रमाणे “दुनिया में हूँ दुनिया का तलबगार नहीं| बाज़ार से गुजरा हूँ, खरीदार नहीं” अशी अवस्था अनायासच प्राप्त होईल; त्यासाठी वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत!

मी तुमचे मूल आहे!


श्रीराम. सद्गुरूंशी कोणता संबंध जोडावा याचा अभ्यास करताना "मी तुमचे मूल आहे," "मला तुमच्याशिवाय कोणी नाही", हा भाव अखेर मला पसंत पडला. श्रीसद्गुरूंना लहानपणची वृत्ती फार आवडते, म्हणून मी त्यांना "माऊली" मानू लागलो. वासनांनी आणि विकारांनी बरबटलेला मी मोठा हट्टी, रडका आणि अडाणी आहे; उलट श्रीसद्गुरूंचे अंतःकरण इतके विशाल, द्रयार्द्र आणि क्षमाशील आहे, की माझ्या सारख्या अपंग पोरावर त्यांचे मायेचे पांघरूण सदैव राहते. प्रापंचिक वासनांमध्ये मी पुन्हा पुन्हा बुडी मारतो, त्यातून बाहेर काढून पुन्हा पुन्हा प्रेमाने व अंतःकरण न दुखावता मला स्वच्छ करणारी श्रीसद्गुरू माऊली धन्य होय. म्हणून मी त्यांचे लहान मूल झालो.

माझ्या जीवनात श्रीसद्गुरू जे घडवून आणतील, जे मला देतील, जे माझ्यापासून नेतील, जे सुखदुःख भोगायला लावतील, जे करण्याची संधी देतील, ते सगळे शंभर टक्के माझ्या कल्याणाचे असणार अशी माझ्या मनाची खरी भावना मी करून घेतली. म्हणून दुःखाचा प्रसंग आला तर एकदम दुःख करायचे नाही आणि सुखाचा प्रसंग आला तरी एकदम सुखी व्हायचे नाही; दोन्ही प्रसंगांमध्ये जरा दम खायची म्हणजे शांत रहायची सवय कष्ट न करता माझ्या मनाला लागली!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (आनंदसाधना)

परमपूज्य बाबांनी शक्तीचा व्यय कसा कमी केला? (आनंदसाधनेतील सारांश)

श्रीराम. व्यवहार सांभाळून साधना करणाऱ्या साधकाला बहुरूप्याप्रमाणे अनेक भूमिका कराव्या लागतात. त्या करताना शरीराची व मनाची शक्ती खर्च करावी आगते. मग नामासाठी शक्ती कमी पडते. ही गोष्ट माझ्या ध्यानात आल्या बरोबर जरुरीपेक्षा अधिक होणारा शक्तीचा खर्च मी लगेच बंद केला.

१) शरीर निरोगी ठेवण्यास आवश्यक तेवढेच खाणेपिणे ठेवले

२) बोलण्याने आपली पुष्कळ शक्ती खर्च होते. आधीच व्यवसायामुळे माझे बोलणे अधिक. त्यामुळे मी मौनाचा अभ्यास केला. रोज मी दोन तास तरी मौन पाळतो. नामावाचून मनात काही नसणे हे खरे मौन. इतके साधले नाही तरी ज्या दिवशी मौन होत नाही त्या दिवशी नामाची तंद्री तीव्रपणे लागत नाही असा अनुभव येतो.

३) गजबजलेल्या शहरांतून डोळे व कान या इंद्रियांना अति काम पडते. ते कमी करण्यास रोज दोन तास तरी मी कानात कापसाचे बोळे घालतो व डोळे मिटून स्वस्थ जप करीत बसतो.

४) कामवासनेत वाईट अपवित्र असे काही नसले, तरी वय, परिस्थिती आणि साधना यांना अनुसरून मी या भोगला बंधन घातले. केवळ नामानेच या शक्तीला भगवंताकडे वळवता येते असा माझा अनुभव आहे.

५) व्यवसायाला अवश्य तेवढेच वाचन व लेखन मी करतो. रोज वर्तमानपत्रातल्या ठळक वार्ताच फक्त पाहतो.

६) लोकांच्या घरगुती भानगडीची चौकशी करून त्यावर काथ्याकूट करणे अजिबात बंद केले. गमतीने झाले तरी त्यामध्ये दोषदृष्टी नसते.

७) काळजीची वृत्ती उगम पावली की लगेच तिचा गळा दाबून तिला कासावीस करण्याचा अभ्यास मी सतत केला.

८) जो सद्गुरूला शरण जातो, त्याच्या देहावर त्याची सत्ता चालते. अर्थात ते प्रारब्ध टाळीत नाहीत पण मागेपुढे करून सोयीने भोगायला लावतात हे पक्के लक्षात ठेवून मान, पैसा, घरदार आणि देहाचे आजारपण यावर विचार करून होणारा शक्तीचा व्यय थांबवण्यात मला चांगले यश आले.