Translate

Sunday, August 31, 2014

A New Page of the Blog

Hello!

||Shreeram Samarth||

Today a new page has been added to the blog -
Spiritual Definitions (व्याख्या).

The aim of this page is to add various descriptive yet to the point definitions of some spiritual terms that we read at various places but fail to exactly comprehend the meaning.

It was a definitive forte of Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj to state such deep sentences that were Vedantic in truth, in a very subtle and comprehensible manner. I wish all the readers including those from different countries other than India, should reap the benefit of this blog and its content; so that bilingual (Marathi and English) definitions.

I earnestly wish all the readers are benefited and experience the divinity in the hustle bustle of daily life with these spiritual quotes by Shri Maharaj!

||Shreeram Jay Ram Jay Jay Ram||

Tuesday, August 26, 2014

दासबोधात वर्णन केलेले सद्गुरु लक्षण ~~ परमपूज्य बाबा बेलसरे

दासबोधात वर्णन केलेले सद्गुरु लक्षण -

~~ परमपूज्य बाबा बेलसरे


n  सर्व विश्वाला भगवंताची अगाध लीला समजतात ते सद्गुरू.
n  सर्व प्राणीमात्रांना आत्मस्वरूपाने मीच आहे या आपलेपणाने अनुभवतात ते सद्गुरू.
n  जगातील दीन व दुःखी जीवांबद्दल ज्यांना अत्यंत करुणा वाटते ते सद्गुरू.
n  जगातील कोणतीही वस्तू आपल्याला हवी असे चुकून सुद्धा ज्यांना वाटत नाही ते सद्गुरू.
n  अखंड अभयता अनुभवल्यावर जे निरंतर प्रसन्न असतात ते सद्गुरू.
n  सुखात वा दुःखात, संपत्तीत वा विपत्तीत, मानप्रसंगी वा अपमानप्रसंगी, देहादुह्खात आणि दारिद्र्यात, आजारीपणात आणि अगदी अंतकाळी ज्यांचा भगवंतावरील भरोसा अगदी जशाच्या तसा सतेज राहतो ते सद्गुरू.

अशा सद्गुरूंचा सहवास भाग्याने लाभतो. पण ज्याला तो लाभतो, त्याचे मन आमूलाग्र बदलते. त्याचे अज्ञान विरळ होत जाते आणि संशय व विक्षेप मरून जातात.

सद्गुरुवर खरे प्रेम करता आले, तर आणखी काही साधन करण्याची जरूर नाही. अगदी मनापासून त्याचे होऊन राहावे, त्याचे मनापासून ऐकावे, त्याने दिलेले नाम घ्यावे आणि जे जे जीवनात घडेल त्यांमध्ये त्याचा हात आहे हे ओळखून समाधान ठेवावे, हाच समर्थांचा परमार्थ आहे!  

Monday, August 25, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन १०-

नाम –

१०) तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखे नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. गाडी उतरंडीला लागली की जशी अति वेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे.

~~ श्रीराम. नामाचा उद्रेक अशी ही स्थिती आहे! “अमृताची उकळी नाम तुझे” म्हणणारे तुकोबा नामात रंगून जातात यात नवल ते काय? आपल्या भारतात होऊन गेलेल्या जवळ जवळ सर्व संतांनी नामाची महती वर्णिली आहे. नाम म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम- ही भावना जेव्हा साधकाच्या मनात दृढ होईल त्या दिवशी नाम घ्यावे लागणार नाही तर नाम आपोआप ओठी येईल असे संत सांगतात. भक्तिरसात बुडालेला भक्त आत्यंतिक प्रेमाने फक्त भगवंताला आर्त स्वरात हाक मारतो आणि ही हाक म्हणजेच त्याचे नाम! अशी हाक मारल्यावर तो भगवंत त्याचे कोड-कौतुक पुरवतो—त्याला परमार्थ मार्गात हात धरून पुढे घेऊन जातो.

वाचा अनावर होऊन नाम येणे ही अवस्था कान्हनगडचे स्वामी रामदास सुद्धा वर्णन करतात. ब्रह्मानंद महाराजांना जेव्हा त्यांचे पुतणे भीमराव यांनी विचारले, तुम्ही इतके शास्त्रपठण केलेले; मग तुम्ही इतके नाम कसे काय घेऊ शकलात? यावर ब्रह्मानंद महाराजांनी फार सुरेख उत्तर दिले आहे. ते म्हणाले, काही वेल भरमसाठ वाढतात. तसे जो कोणी मनापासून नामाला चिकटतो, त्याला नामच हात देते आणि शक्तीबाहेर नाम वाढत जाते. ती शक्ती वरील वचनात म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंताची शक्ती असते.


जो साधक दृश्य विश्वाला बाजूला सारून व सद्गुरूंना शरण जाऊन अखंड नामात राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला सद्गुरूच हात देतात. हेच सद्गुरूंचे ‘function’ आहे असे गुरुदेव रानडे म्हणत. हे साध्य होण्यासाठी गुरुदेव रानडेंनी दिलेला मंत्र मला फार उपयोगी पडला असे परमपूज्य बाबा बेलसरे मुद्दाम सांगतात- ते म्हणाले, “मी सुरुवात १० मिनिटांपासून केली आणि रोज १ मिनिट वाढवले. महिन्याभरात अर्धा तास वाढला!” याप्रमाणे प्रयत्न आणि सद्गुरू कृपा यांचे फळ म्हणजे वर विषद केलेला अनुभव! 

Sunday, August 24, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ९ --

नाम –

९) एक मनुष्य बैलगाडीमधून जाताना रस्त्यामध्ये पडला. एका सज्जन माणसाने त्याला तेथे पडलेला पाहून उचलला आणि आपल्या घरी नेला. तसे नुसते विषयात राहणे हा आड मार्ग आहे, नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. आपण भगवंताच्या नामात पडून राहावे. त्यात राहिले की कोणीही संत भेटतो आणि आपले काम करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.

~~ श्रीराम. सत्पुरुषाची भेट ही आयुष्यातली सामान्य घटना नव्हे. किंबहुना आयुष्यातल्या अनेकानेक घटनांपैकी या घटनेचा सर्वात महत्त्वाची व शुभ असा उल्लेख करणे प्राप्त आहे. मनुष्य जेव्हा परमार्थ मार्ग आक्रमण्यास सुरुवात करतो, तेव्हा परमात्म-दर्शन ही त्याची ओढ असते, शाश्वत शांती आणि अखंड समाधान हे त्याचे ध्येय असते. हे साध्य होण्यासाठी शिष्याने सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनात कोणताही विकल्प न बाळगता राहणे हा एकच पर्याय आहे. सद्गुरू-कृपा होणे हे त्यामुळेच शक्य आहे. नाहीतर नाही.
                   
वरील बोधवचनातून अजून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, जरी अजून सद्गुरू भेट झाली नसेल, अनुग्रह प्राप्ती झाली नसेल, तरी सज्जन व्यक्तीने निराश होण्याचे कारण नाही. जर आपण मनापासून आणि अत्यंत तळमळीने भगवंताच्या नामात राहिलो आणि विवेकपूर्वक चांगल्या गोष्टीच आचरणात आणल्या, तर संत तुम्हाला शोधत येतील, हे महाराजांचे आश्वासन आहे. भक्ताला जशी भगवंताची ओढ असते, तशीच किंबहुना त्याहूनही जास्त ओढ भगवंताला सद्भक्ताची असते. संतांना- सत्पुरुषांना देखील साधनात तत्पर असणाऱ्या शिष्यापेक्षा दुसरा कोणी प्रिय असूच शकत नाही. “आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे” हे वाक्य सर्वात महत्त्वाचे आहे. मी काहीही करीन आणि संताने मला आपला म्हणावे हे शक्य नाही. तरीदेखील ते आपला म्हणतात कारण त्यांची करूणाच अपरंपार असते. परंतु, एक साधक-शिष्य म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही? आणि जर अखंड समाधानाचे ध्येय डोळ्यांसमोर कायम असेल, तर साधक साधनात - नामात राहीलच. त्याशिवाय त्याला चैन पडणार नाही.


तेव्हा साधकाने “जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे” या समर्थांच्या ओळी सतत स्मराव्या आणि तसे आपले आचरण शुद्ध आणि पवित्र राहावे यासाठी सद्गुरूंची प्रार्थना करावी! जो कोणी मनापासून नाम घेईल त्याला हे साधेल यात शंका नाही! 

Friday, August 22, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ८ –

नाम –

८) इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल, ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. 

~~ श्रीराम. एखादा मनुष्य परमार्थाला लागला म्हणजे नेमके काय? तर दृश्य जगाचे मिथ्यापण कोणत्या ना कोणत्या कारणाने मनावर ठसल्यामुळे तो अदृश्य ईश्वराप्रत चालला किंवा जाऊ घातला. किंवा जर गतजन्माच्या पुण्यायीने सद्गुरू भेट आयुष्यात लवकर झाली तर त्यांच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास ठेवून तो त्याची कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करू लागला की तो परमार्थी बनला. ह्या परमार्थ मार्गावर टिकून राहण्यासाठी सद्गुरू साधन सांगतात. ज्या ज्या माणसाची जशी जशी अध्यात्मिक तयारी असेल त्याप्रमाणे गुरु मार्गदर्शन करतात. परंतु, आत्ताच्या यंत्रयुगात ईश्वर-सन्मुख बनण्यासाठी सर्वोत्तम साधन श्रीमहाराजांनी सांगून ठेवले आहे आणि ते म्हणजे भगवंताचे नाम!

योग / ध्यान इत्यादी साधने देखील ईश्वर-सन्मुख बनवतात ह्यात शंका नाही; परंतु, या मार्गांमध्ये मनुष्याला अतिशय मर्यादाशील जीवन जगणे आवश्यक असते. म्हणजे या इतर साधनांची सुरुवात आधी स्वतःला सुधारण्यात आहे आणि हे किती कठीण काम आहे हे आपण जाणतोच आणि योग वगैरे साधने सुरु केल्यावर घसरण्याची शक्यता जास्त; म्हणजेच ह्यात चढ-उतार जास्त आहेत.

नामाचे महत्त्व कशात असेल तर नामामुळे हे “ईश्वर-सन्मुख होण्यास आवश्यक असलेले बदल” सहजच घडतात आणि साधकाने जर मनापासून सद्गुरू-निष्ठेने नाम जपले तर हे Positive Changes कायमचे असतात. मनुष्याचे अंतरंग सुधारण्याची जबरदस्त ताकद सद्गुरूंनी दिलेल्या नामात आहे. किंबहुना महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे की आपल्या अवगुणांची जाणीव होणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि ही जाणीव सतत नियमाने नाम घेत गेल्याने होते. त्यामुळे नामसाधक साहजिकच सद्गुरुकडे आपले अंतरंग सुधारण्याची वरचेवर प्रार्थना करतो. सद्गुरू-कृपेने आणि नामसाधनेने हे सहजच घडून येते. परंतु, साधकाने आत्यंतिक निष्ठेने नामात राहिले मात्र पाहिजे.


एक सुरेख गोष्ट महाराज सांगत. नामसाधना ही आईसारखी आहे. जर पोर रडवेले, घाणीत बरबटलेले असेल तरी आई त्याला जवळ घेते, कुरवाळते, अंघोळ घालून स्वच्छ करते. मात्र योगसाधना बापासारखी आहे. ती म्हणेल, आधी स्वच्छ होऊन ये! तेव्हा असे हे नाम जर सतत घेतले – घेण्याचा प्रयत्न केला तर सद्गुरूंना आवडेल ह्यात शंका नाही. पूज्य बाबा बेलसरे म्हणत, “प्रेम असो वा नसो, जो कोणी मनापासून नाम घेईल, त्याला महाराज पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतील!” यापरते दैव ते कोणते?   

Thursday, August 21, 2014

आध्यात्मिक निरोगीपण म्हणजे काय? ~ परमपूज्य बाबा बेलसरे

शरीराचे जसे निरोगीपण असते, तसे मनाचे किंवा अध्यात्मिक सुद्धा निरोगीपण असते. ज्या प्रमाणात हे निरोगीपण वाढेल, त्या प्रमाणात माणसाची भीती, काळजी. चिंता इत्यादी कमी होत जातील आणि त्याच्या मनाला निरोगी स्वस्थता (तामसी आळस नव्हे) येईल. "असू दे" असे वाटू लागेल. जे घडते आहे ते त्याच्या इच्छेने घडते आहे आणि ते माझ्या हिताचेच आहे, अशी मनाची खात्री होईल. चिंता, भय इत्यादी कमी होणे हे अध्यात्मिक उंची वाढल्याचे लक्षण आहे. 

श्रीमहाराजांचे बोधवचन ७ -

नाम -

७) नाम उपाधिरहित असल्यामुळे आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. 

~~ श्रीराम. "नाम घेणे" आणि "नाम येणे" यात थोडासा फरक आहे. सुरुवातीला जेव्हा साधक सदगुरूंकडून नामानुग्रह प्राप्त करतो, तेव्हा तो एक नियम पाळायचा म्हणून नाम घेतो. हे महत्त्वाचेच आहे यात शंका नाही. असे नियमाचे नाम घेता घेताच हळू हळू साधकाला सद्गुरु कृपेने नामात रमण्याची कला अवगत होते. मग नाम घ्यावे लागत नाही तर ते आपोआप ओठी येते; किंबहुना नामाला बसण्यास वेळ झाला नाही तर जीवाची तळमळ होते. हे नामाचे प्रेम थोडे तरी उत्पन्न झाल्याने होते यात शंका नाही.  परंतु, खरेखुरे नामाचे प्रेम येण्यास "देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी" हे समर्थ-वचन सदा नजरेसमोर असावे. 

ही देहबुद्धि सांडणे म्हणजेच उपाधिरहित होणे होय. उपनिषदात साधन-चतुष्टय वर्णिले आहे. आत्मानात्म विवेक, वैराग्य, तितिक्षा आणि नीती या भक्कम आधारावर हे चतुष्टय उभे आहे. हे जोवर मनापासून आत्मसात केले जात नाही, तोवर प्रेम येण्यास उशीर लागेल असे पूज्य बाबा बेलसरे देखील अनेक ठिकाणी सांगतात. हे अंगी बाणण्यास-मुरण्यास सुरुवात होणे ही उपाधिरहित होण्याकडे वाटचाल आहे असे समजण्यास हरकत नाही. अनेक लोक ह्या देखील उपाधीच आहेत असा पक्ष मांडताना दिसतात. परंतु, इथे साधकाने एक लक्षात घेतले पाहिजे की ह्या उपाधी भगवंताकडे नेणाऱ्या आहेत आणि इतर देहबुद्धीला धरून असणाऱ्या उपाधी आपल्याला अंतर्यामी अखंड विराजमान असलेल्या आत्मस्वरूपापासून दूर नेणाऱ्या अहेत. तेव्हा त्याची गल्लत साधकाने करू नये. 

मान, मरातब, पैसा, सौंदर्य, मोठेपणा व यांसारख्या गोष्टींची उपाधी दूर दूर हटवल्या शिवाय नाम अंगी बिंबणे शक्य नाही. मग या उपाधी असताना नाम घेऊच नये का? तर नाही; उलट जास्त जोमाने, नेटाने आणि नियमाने नाम घेण्याची गरज आहे. त्या नामानेच उपाधी आपण किती घट्ट धरून ठेवल्या आहेत याची जाणीव हळू हळू निर्माण होऊ लागेल. त्या जाणीवेतून "माझ्या सद्गुरूंनी त्यांची सर्व अध्यात्म-शक्ती घालून दिलेले नामच मला तारेल" ही भावना दृढ होऊ लागेल. फक्त आपल्याला उपाधीकडून निरुपाधिक अवस्थेकडे जायचे आहे हे भान मात्र सतत ठेवले पाहिजे. जेणेकरून नामाचे इतके प्रेम निर्माण होईल की नामानुसंधानाशिवाय जगणेच अशक्य होइल. तेव्हा असे होवो आणि माझे नाम निरुपाधिक अवस्थेकडे जावो ही प्रार्थना सद्गुरुंजवळ करणे आणि शक्य तितके नामात राहणे आवश्यक आहे. 


महाराज म्हणत, इतके प्रेमाने नाम घ्या की परमात्मा आपल्या घरात नाचला पाहिजे! ते प्रेम तुम्हा-आम्हाला महाराजांच्या कृपेने प्राप्त होवो ही त्यांच्याच चरणी प्रार्थना! 

Wednesday, August 20, 2014

We should not adjust... We should accept with love! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

आपल्या प्रपंचात घडणा-या लहान लहान गोष्टींना आपण जुळवून (adjust) घेतोच. पण फक्त जुळवून घेण्यापेक्षा आपण त्यांचा प्रेमाने स्वीकार का करीत नाही? स्वीकारायला (Acceptance) जे मन लागते ते तयार करणे ही फार मोठी गोष्ट आहे. 

भाऊसाहेब केतकर जेव्हा सत्याऐंशी-अठ्याऐंशी वर्षांचे झाले तेव्हा रात्री त्यांना लघवी लागायची आणि वय झाल्यामुळे आवरता न आल्यामुळे ती धोतरातच व्हायची. मी बाजूलाच निजलेला असे. ते मला हाक मारीत. मग त्यांचे धोतर बदलावे लागे. मी एकदा भाऊसाहेबांना म्हणालो, "भाऊसाहेब, हे काय होतंय?" तर ते मला म्हणाले, "अहो, बरोबर आहे. हा देह आता असेच करणार, या देहाचा दोष नाही. आता असेच व्हायचे." पण ते इतके शांत असायचे. त्यावर मी एकदा म्हटले, "तुम्ही इतके शांत कसे राहता?" यावर ते मला म्हणाले, "ही जर देणगी असेल तर महाराजांची आहे." हे Acceptance आपल्याजवळ आहे का? अरे, आपल्या घरातली माणसे आपल्याला स्वीकारता येत नाहीत. बाहेरून एक वेळ तुम्ही कसेही वागा, पण आतमध्ये 'असू दे; त्याने दिलेली आहेत ना, मग राहू दे' ही दृष्टी असेल तरच मन शांत राहील व हातून काही साधना होईल. 

महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

मी कसाही असलो तरी तुमचा आहे, तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. त्यांना एकसारखे बरोबर ठेवावे. त्यांची संगत वाटली पाहिजे आणि ते नामात आहेत म्हणून नामाची संगत पाहिजे. प्रत्येक गोष्ट - अगदी लहान सहान देखील - त्यांच्या कानावर घालून करायचा अभ्यास केला तर खात्रीने त्यांचे अस्तित्त्व जाणवू लागेल. 

श्रद्धा आणि निष्ठेची एक गोष्ट! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

गेल्या आठवड्यात एक गृहस्थ आले होते. नावाचे एवढे महत्त्व नाही. त्यांची बायको रविवारच्या निरुपणाला येते. तेही तीन-चार वेळा आले होते. परवा ते पेढे घेऊन आले होते. कशाचे पेढे म्हणून विचारल्यावर त्यांनी ही हकीकत सांगितली. अंधेरीला ते दोन लहान खोल्यांत राहत असत. भिक्षुकीचा व्यवसाय. त्यांच्या घरमालकाने त्यांनी जागा सोडावी म्हणून कोर्टात फिर्याद केली आणि त्याच्यासारखा निकाल होऊन बेलीफ आणून त्याने जागा खाली करून घेतली. यांनी आपले समान दोघा-तिघा मित्रांकडे ठेवले. बायकोला नाशकास पाठवले आणि आपण एका मित्राकडे राहू लागले. 

ते म्हणाले, "मला काहीच करणे शक्य नव्हते. प्रवचनात तुम्ही नामाच्या शक्तीबद्दल सांगितले होते, म्हणून मी अखंड नामस्मरण करू लागलो आणि श्रीमहाराजांना म्हटले, आता तुम्ही पहा. मित्रांनी वरच्या कोर्टात जायचा सल्ला दिला पण त्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते. मित्रांनी मदत केली आणि वरच्या कोर्टात गेलो. तेथे कृष्णमूर्ती म्हणून न्यायाधीश होते. त्यांनी कोर्टात जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांच्या जागी मला श्रीमहाराजच दिसले. मला हा भ्रम होतो आहे काय असे वाटू लागताच ते न्यायाधीश दिसू लागले. त्यांनी तडकाफडकी निकाल देऊन जागा माझ्या ताब्यात परत देण्याचा हुकुम केला. मी पाहू लागलो तो परत तेथे श्रीमहाराज दिसू लागले." 

पहा बरे ही श्रद्धा! निष्ठा असेल तर काय होणार नाही? 


सतत नामस्मरणानेच 'निरपेक्ष' नाम येईल!

||श्रीराम समर्थ||


आमच्या गुरूंवर आमची निष्ठा नाही! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

आमच्या नातीला शाळेमध्ये बाईंनी सांगितलेले गणित चुकीचे असले तरी प्रमाण वाटते. दुस-या कोणी ते बरोबर करून दिले तरी ते पटत नाही. ते पाहून मला वाटले की आमच्या गुरूंवर आमची तेवढीदेखील निष्ठा नाही. श्रीमहाराजांनी सांगितले की 'तुम्ही नुसते नाम घ्या, बाकी सगळे मी करतो', त्यांनी हे आश्वासन दिलेले असूनही आम्ही 'पण' म्हणतो. हा पण म्हणजे संशय काढायलाच पाहिजे. उगीच इकडे जा तिकडे जा हे थांबवलेच पाहिजे. महाराज एकदा मला म्हणाले, 'मी जे सांगितले आहे त्यापेक्षा लोक जास्त तरी करतात किंवा कमी तरी करतात; मी सांगितलेले तेवढेच कुणी करत नाही'