परमार्थ साधनेमध्ये ज्ञानी सत्पुरुषाचंच का ऐकावं? (परमपूज्य बाबा बेलसरे - ज्ञानेश्वरी खंड ७ वा ओवी क्र. ७ सारांश)
~ आता अज्ञान अवघे हरपे | विज्ञान निःशेष करपे |
आणि ज्ञान ते स्वरूपे | होऊनि जाईजे ||
आणि ज्ञान ते स्वरूपे | होऊनि जाईजे ||
~ श्रीराम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे खरं नाही ते खरं मानणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. पुढे त्यांचं म्हणणं असं की जितकं तुमचं व्यवहारी ज्ञान वाढेल तितकं अज्ञान अधिक वाढेल. कारण असं की हे व्यवहारी ज्ञान हे खरं ज्ञान नसतंच!
श्रद्धेचं म्हणूनच परमार्थात अतिशय महत्त्व आहे. कुणी एखाद्या स्वस्थ बसलेल्या माणसाला विचारलं, "तुम्ही जिवंत आहात का?" तर तो म्हणेल, "अरे तू हे म्हणतोस काय? मी जिवंत आहे!" तो हे इतकं जोराने म्हणतो कारण त्याला स्वतःच्या अस्तित्वाची खात्री इतकी आहे की त्या खात्रीला दुसरी बाजूच नाही. पण जगातील इतर सर्व गोष्टींना दुसरी बाजू आहे. समजा, तुम्हाला एक जण म्हणाला, "का हो, तुम्ही शंभर वर्षं जगणार ना?" तुम्ही म्हणाल, "हो जगणार, पण!" हा 'पण' आला की गेलं! म्हणजे त्या उत्तराला दुसरी बाजू आली. मी अमक्या मुलीशी लग्न केलं तर सुखी होणारच ही खात्री आहे का? तिच्याशी जमलं तर सुखी होणार, नाही जमलं तर? तेव्हा हे शक्य आहे. जिथे दुसरी बाजू आहे तिथे ज्ञान नाही हे पक्कं लक्षात ठेवावं.
जिथे खरं प्रेम आहे ना, तिथे दुसरी बाजूच नाही! हे सगुणोपासनेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच अध्यात्मामध्ये ही दुसरी बाजू समूळ नाहीशी करण्यासाठी सत्पुरुषावर विश्वास ठेवावा लागतो. म्हणूनच ज्याला अज्ञान नाही अशाच माणसाला विचारवं लागतं. पुस्तकं वाचून परमार्थ साधत नाही याचं कारण हे आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या बुद्धीने पाहतो तेव्हा तिथे खरी श्रद्धा बसू शकत नाही. पण एखाद्या ज्ञानी माणसाने सांगितलं की हे असेच आहे, म्हणजे त्याचे काम होते; हे त्याचे मर्म आहे! म्हणूनच सद्गुरूंचे बोल हे साधकाला काळ्या दगडावरची रेघ झाली पाहिजे!
No comments:
Post a Comment