श्रीराम. "मला किती माणसं भेटतात आणि सांगतात, महाराजांनी कमालीचं केलंय आमच्यासाठी! आमच्या कल्पनेच्या बाहेर दिलंय! मी सहज म्हणतो, तुम्ही त्यांच्याकरता काय करता? असे विचारल्यावर म्हणतात, काय हो, वेळ मिळत नाही नामस्मरणाला आता काय करावं? याला महाराज काय म्हणतील? त्यांना माहीतच आहे की हे सगळे स्वार्थीच आहेत; खरे कुणीच नाही! कसंय बघा...
मी तुम्हाला खरं सांगू का? जर खरोखर आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता आली ना, निराळा परमार्थ करायला नको! रात्रंदिवस वाटेल, तुम्ही हे केलंय... तुमच्यामुळे हे झालंय! सारखं अनुसंधान टिकेल त्याचं! हे एक प्रकारचं स्मरणच आहे!" (परमपूज्य बाबा बेलसरे प्रवचन))
हे जर झालं ना, दिवसभरात कोणतीही गोष्ट घडो अगर न घडो, त्याच्या मागे महाराजांचा - सद्गुरूंचा हात दिसेल. प्रत्येक गोष्टीत अशी महाराजांना गोवायची सवय लागणं हीच साधकाच्या दृष्टीनं एक मोठी साधना आहे! खऱ्या साधकाकडून अतिशय छोट्या छोट्या गोष्टींत / प्रसंगांत महाराजांचं स्मरण राखलं जाईलच. त्याला वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत. काही नवीन पदार्थ केला, आज महाराजांना याचा नैवेद्य दाखवू बरका! काही नवीन कपडे आणले, हे महाराजांना आवडतील का? महाराजांना तव्यावरचं पिठलं आवडायचं, आज करूया बरका! आज घरी पाहुणे येणारेत... त्यांचा आदर सत्कार योग्य रीतीने केला तर महाराजांना आनंद होईल तेव्हा तसे करूयात! अमक्या गोष्टीत वेळ घालवणं महाराजांना आवडणार नाही; त्या ऐवजी नामाला बसूयात! या अशा सद्गुरूला आवडणाऱ्या कर्मांत किती मौज येईल! त्यात अनुसंधान टिकेल हे एक आणि यामुळे आपण महाराजांच्या घरी त्यांच्या नियमाबरहुकूम राहतो आहोत, त्यांना आवडणाऱ्या गोष्टीच करतो आहोत, याने मनाचे समाधान टिकून वृत्ती प्रसन्न आणि आनंदी राहील! प्रयत्न करून पाहावा!
No comments:
Post a Comment