श्रीराम. आयुष्यात कितीतरी ध्येयं आहेत. जन्माला आल्यापासून आपण कोणत्या ना कोणत्या ध्येया मागे धावत असतो. ते ध्येय प्राप्त झालं की आपल्याला समाधान लाभेल असा आपला मनापासून विश्वास असतो. पण तसं होतं का? आता मोठ्यातलं मोठं ध्येय घ्या- स्वातंत्र्यप्राप्ती. किती लोक झटले तेव्हा स्वातंत्र्य मिळालं. पण त्यानं समाधान मिळालं का? याचं उत्तर आपल्या सर्वांना माहीत आहेच! तेव्हा खरं ध्येय तेच ज्याने समाधानाचा मार्ग सुगम होईल. नुसते समाधान नाही तर अखंड समाधान! म्हणजे काहीही झालं तरी तो सत्पुरुष वरच्या पातळीवरून खाली येणार नाही. बाकी जगात काही का होईना त्याच्या साधनेवर त्याचा परिणाम होणार नाही!
याचाच अर्थ हा, की जोवर आपले ध्येय निश्चित नाही, तोवर चित्त डळमळीतच राहणार! नामसाधना करण्यास सुरुवात केल्यावर "आता मी नामाकरता जगतो" अशी स्वयंसूचना वरचेवर स्वतःला द्यावी. याला वयाची अट नाही. किंबहुना नामाला कसलीच उपाधी नाही! जो नामाला उपाधी लावतो त्याला नाम कळलेलं नाही!
अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म भगवंताची खूण म्हणजे नाम. आणि म्हणूनच ते वाटते तितके सोपे नाही. त्याला अभ्यासच पाहिजे. आणि हे मात्र मी माझ्या अनुभवाने सांगेन, की ज्याने मनापासून अभ्यासाला सुरुवात केली त्याला महाराजांची पदोपदी साथ आहे. महाराज त्याला- त्याच्या साधनेला पोटाच्या पोराप्रमाणे सांभाळतील. मुलगा परीक्षेला बसला असला की आई जशी सर्व तऱ्हेने त्याची काळजी घेते, तसे नामात राहणाऱ्याला त्याचे नाम साधन व्यवस्थित चालावे यासाठी महाराजांच्या हात सदैव पाठीशी असेल ह्यात शंका नाही! अनुभव घेऊन पाहावा!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या विविध प्रवचनातून संकलित
No comments:
Post a Comment