Translate

Wednesday, April 22, 2015

'आत' जाण्याने झोपेसारखा अनुभव जागेपणी येईल!


श्रीराम. मी सर्वांना नेहमी सांगतो, तुम्ही प्रपंच करा; अगदी उत्तम करा. पण काही काळ तरी ‘आत’ जा! एका बाईने मला विचारलं, आत जा म्हणजे कुठे जा? तर, तुम्ही झोपता तेव्हा काय होतं? तुम्ही बाहेरचं जग सोडून आत जाता. हा झोपेसारखा अनुभव जागेपणी घेणं म्हणजे आत जाणं. आत  म्हणजे काय?

झोपेची लक्षणं तीन- १) तुम्हाला झोप येते, किंवा झोप लागते. जागे देखील आपण होत नाही तर जाग येते! म्हणजे ह्यात आपलं कर्तेपण नाही. ती आपोआप येते. तेव्हा कर्तेपणाचा नाश हे झोपेचं पाहिलं लक्षण.
२) दुसरं लक्षण काय, तर कर्तेपण नाही म्हटल्या बरोबर देहाचा विसर आहे. किंबहुना आपल्याला सांगतो, जर माणसाच्या जीवनातील झोप काढली, तर तो वेडा होईल. एक वेळ अन्न पाण्यावाचून जगेल पण झोपेशिवाय जगणे अशक्य आहे. आणि गंमत अशी आहे की जेव्हा माणसाला दुःख अनिवार होतं तेव्हा तो ग्लानी येऊन झोपी जातो आणि देहाचा दुःखाचा विसर पडतो.
३) आणि तिसरी गोष्ट ही की जेव्हा तुम्ही झोपेतून बाहेर येता तेव्हा ताजेतवाने होऊन येता.

ही जी तीन लक्षणं आहेत ती जागेपणी आपल्याला साधनाने साधायची आहेत. साधनाने काय साधायचं? कर्तेपण जायला पाहिजे, देहाचा विसर पडला पाहिजे आणि अखंड आनंद समाधान टिकलं पाहिजे! हे जे आहे ते आत जाण्यानंच साधेल. बहिर्मुख वृत्ती ठेवून केवळ वाचायचं, लिहायचं, उपदेश करायचा, अध्यात्मिक चर्चेत वादविवाद करायचा याने कदापि साधणार नाही. आणि आपलं ध्येय आहे भगवद्प्राप्ती! तेव्हा बाकीच्या गोष्टी कमी करून नामालाच लागलं पाहिजे!


~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी प्रवचनातून)  

No comments:

Post a Comment