Translate

Wednesday, April 22, 2015

'आत' जाण्याने झोपेसारखा अनुभव जागेपणी येईल!


श्रीराम. मी सर्वांना नेहमी सांगतो, तुम्ही प्रपंच करा; अगदी उत्तम करा. पण काही काळ तरी ‘आत’ जा! एका बाईने मला विचारलं, आत जा म्हणजे कुठे जा? तर, तुम्ही झोपता तेव्हा काय होतं? तुम्ही बाहेरचं जग सोडून आत जाता. हा झोपेसारखा अनुभव जागेपणी घेणं म्हणजे आत जाणं. आत  म्हणजे काय?

झोपेची लक्षणं तीन- १) तुम्हाला झोप येते, किंवा झोप लागते. जागे देखील आपण होत नाही तर जाग येते! म्हणजे ह्यात आपलं कर्तेपण नाही. ती आपोआप येते. तेव्हा कर्तेपणाचा नाश हे झोपेचं पाहिलं लक्षण.
२) दुसरं लक्षण काय, तर कर्तेपण नाही म्हटल्या बरोबर देहाचा विसर आहे. किंबहुना आपल्याला सांगतो, जर माणसाच्या जीवनातील झोप काढली, तर तो वेडा होईल. एक वेळ अन्न पाण्यावाचून जगेल पण झोपेशिवाय जगणे अशक्य आहे. आणि गंमत अशी आहे की जेव्हा माणसाला दुःख अनिवार होतं तेव्हा तो ग्लानी येऊन झोपी जातो आणि देहाचा दुःखाचा विसर पडतो.
३) आणि तिसरी गोष्ट ही की जेव्हा तुम्ही झोपेतून बाहेर येता तेव्हा ताजेतवाने होऊन येता.

ही जी तीन लक्षणं आहेत ती जागेपणी आपल्याला साधनाने साधायची आहेत. साधनाने काय साधायचं? कर्तेपण जायला पाहिजे, देहाचा विसर पडला पाहिजे आणि अखंड आनंद समाधान टिकलं पाहिजे! हे जे आहे ते आत जाण्यानंच साधेल. बहिर्मुख वृत्ती ठेवून केवळ वाचायचं, लिहायचं, उपदेश करायचा, अध्यात्मिक चर्चेत वादविवाद करायचा याने कदापि साधणार नाही. आणि आपलं ध्येय आहे भगवद्प्राप्ती! तेव्हा बाकीच्या गोष्टी कमी करून नामालाच लागलं पाहिजे!


~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी प्रवचनातून)  

Tuesday, April 21, 2015

प्रथम ध्येय-निश्चिती हवी!


श्रीराम. आयुष्यात कितीतरी ध्येयं आहेत. जन्माला आल्यापासून आपण कोणत्या ना कोणत्या ध्येया मागे धावत असतो. ते ध्येय प्राप्त झालं की आपल्याला समाधान लाभेल असा आपला मनापासून विश्वास असतो. पण तसं होतं का? आता मोठ्यातलं मोठं ध्येय घ्या- स्वातंत्र्यप्राप्ती. किती लोक झटले तेव्हा स्वातंत्र्य मिळालं. पण त्यानं समाधान मिळालं का? याचं उत्तर आपल्या सर्वांना माहीत आहेच! तेव्हा खरं ध्येय तेच ज्याने समाधानाचा मार्ग सुगम होईल. नुसते समाधान नाही तर अखंड समाधान! म्हणजे काहीही झालं तरी तो सत्पुरुष वरच्या पातळीवरून खाली येणार नाही. बाकी जगात काही का होईना त्याच्या साधनेवर त्याचा परिणाम होणार नाही!

याचाच अर्थ हा, की जोवर आपले ध्येय निश्चित नाही, तोवर चित्त डळमळीतच राहणार! नामसाधना करण्यास सुरुवात केल्यावर "आता मी नामाकरता जगतो" अशी स्वयंसूचना वरचेवर स्वतःला द्यावी. याला वयाची अट नाही. किंबहुना नामाला कसलीच उपाधी नाही! जो नामाला उपाधी लावतो त्याला नाम कळलेलं नाही!

अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म भगवंताची खूण म्हणजे नाम. आणि म्हणूनच ते वाटते तितके सोपे नाही. त्याला अभ्यासच पाहिजे. आणि हे मात्र मी माझ्या अनुभवाने सांगेन, की ज्याने मनापासून अभ्यासाला सुरुवात केली त्याला महाराजांची पदोपदी साथ आहे. महाराज त्याला- त्याच्या साधनेला पोटाच्या पोराप्रमाणे सांभाळतील. मुलगा परीक्षेला बसला असला की आई जशी सर्व तऱ्हेने त्याची काळजी घेते, तसे नामात राहणाऱ्याला त्याचे नाम साधन व्यवस्थित चालावे यासाठी महाराजांच्या हात सदैव पाठीशी असेल ह्यात शंका नाही! अनुभव घेऊन पाहावा!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या विविध प्रवचनातून संकलित 

Tuesday, April 14, 2015

प्रपंचाला भगवंताकडे वळवा म्हणजे त्याचे दुःख नाहीसे होते ~ श्रीमहाराज


श्रीराम. प्रपंच हा कारखान्यासारखा आहे. तेथे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करायला आपल्याला शिकायचे आहे. मग तक्रार करून कसे चालेल? म्हणून प्रारब्धाने जो बरा वाईट प्रपंच आला आहे त्यात समाधान मानून आपण आपले लक्ष भगवंताकडे लावावे. परिस्थिती पूर्ण सुधारल्यावर नाम घेऊ म्हणेल तो फसेल.

महाराजांची जीवनाकडे पहाण्याची ही दृष्टी असल्याने नेहमी तक्रार करणारा किंवा रड्या मनुष्य त्यांना आवडत नसे.

'प्रपंच टाळणे अशक्य असते. तुम्ही हसत करा किंवा रडत करा, तो करावा लागतोच ना? मग तो भगवंताच्या स्मरणात हसतखेळत का करू नये? प्रपंचाला भगवंताकडे वळवा म्हणजे त्याचे दुःख नाहीसे होते.' हा श्रीमहाराजांच्या शिकवणुकीचा मूळ मुद्दा आहे.

माणसाचे बहिरंग म्हणजे त्याचा प्रपंच, तो पुष्कळ सुधारत बसण्यापेक्षा त्याचे अंतरंग, म्हणजे त्याची वृत्ति सुधारली तर सर्व समाज आपोआपच अधिक सुखी व समाधानी बनेल हे श्रीमहाराजांस लोकांस पटवून द्यावयाचे होते. वृत्ति सुधारण्यास भगवंताची भक्ति हाच एक सर्वसुलभ उपाय असल्याने सर्वांनी भगवंताचे नाम घ्यावे असा अट्टाहास त्यांनी जन्मभर धरला! (के. वि. बेलसरे - श्रीमहाराज चरित्र)

जर खरोखर गुरूबद्दल कृतज्ञता आली ना, निराळा परमार्थ करायला नको!


श्रीराम. "मला किती माणसं भेटतात आणि सांगतात, महाराजांनी कमालीचं केलंय आमच्यासाठी! आमच्या कल्पनेच्या बाहेर दिलंय! मी सहज म्हणतो, तुम्ही त्यांच्याकरता काय करता? असे विचारल्यावर म्हणतात, काय हो, वेळ मिळत नाही नामस्मरणाला आता काय करावं? याला महाराज काय म्हणतील? त्यांना माहीतच आहे की हे सगळे स्वार्थीच आहेत; खरे कुणीच नाही! कसंय बघा...

मी तुम्हाला खरं सांगू का? जर खरोखर आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता आली ना, निराळा परमार्थ करायला नको! रात्रंदिवस वाटेल, तुम्ही हे केलंय... तुमच्यामुळे हे झालंय! सारखं अनुसंधान टिकेल त्याचं! हे एक प्रकारचं स्मरणच आहे!" (परमपूज्य बाबा बेलसरे प्रवचन))

हे जर झालं ना, दिवसभरात कोणतीही गोष्ट घडो अगर न घडो, त्याच्या मागे महाराजांचा - सद्गुरूंचा हात दिसेल. प्रत्येक गोष्टीत अशी महाराजांना गोवायची सवय लागणं हीच साधकाच्या दृष्टीनं एक मोठी साधना आहे! खऱ्या साधकाकडून अतिशय छोट्या छोट्या गोष्टींत / प्रसंगांत महाराजांचं स्मरण राखलं जाईलच. त्याला वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत. काही नवीन पदार्थ केला, आज महाराजांना याचा नैवेद्य दाखवू बरका! काही नवीन कपडे आणले, हे महाराजांना आवडतील का? महाराजांना तव्यावरचं पिठलं आवडायचं, आज करूया बरका! आज घरी पाहुणे येणारेत... त्यांचा आदर सत्कार योग्य रीतीने केला तर महाराजांना आनंद होईल तेव्हा तसे करूयात! अमक्या गोष्टीत वेळ घालवणं महाराजांना आवडणार नाही; त्या ऐवजी नामाला बसूयात! या अशा सद्गुरूला आवडणाऱ्या कर्मांत किती मौज येईल! त्यात अनुसंधान टिकेल हे एक आणि यामुळे आपण महाराजांच्या घरी त्यांच्या नियमाबरहुकूम राहतो आहोत, त्यांना आवडणाऱ्या गोष्टीच करतो आहोत, याने मनाचे समाधान टिकून वृत्ती प्रसन्न आणि आनंदी राहील! प्रयत्न करून पाहावा!

Thursday, April 9, 2015

परमार्थ साधनेमध्ये ज्ञानी सत्पुरुषाचंच का ऐकावं?


परमार्थ साधनेमध्ये ज्ञानी सत्पुरुषाचंच का ऐकावं? (परमपूज्य बाबा बेलसरे - ज्ञानेश्वरी खंड ७ वा ओवी क्र. ७ सारांश)
~ आता अज्ञान अवघे हरपे | विज्ञान निःशेष करपे |
आणि ज्ञान ते स्वरूपे | होऊनि जाईजे ||
~ श्रीराम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे खरं नाही ते खरं मानणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. पुढे त्यांचं म्हणणं असं की जितकं तुमचं व्यवहारी ज्ञान वाढेल तितकं अज्ञान अधिक वाढेल. कारण असं की हे व्यवहारी ज्ञान हे खरं ज्ञान नसतंच!
श्रद्धेचं म्हणूनच परमार्थात अतिशय महत्त्व आहे. कुणी एखाद्या स्वस्थ बसलेल्या माणसाला विचारलं, "तुम्ही जिवंत आहात का?" तर तो म्हणेल, "अरे तू हे म्हणतोस काय? मी जिवंत आहे!" तो हे इतकं जोराने म्हणतो कारण त्याला स्वतःच्या अस्तित्वाची खात्री इतकी आहे की त्या खात्रीला दुसरी बाजूच नाही. पण जगातील इतर सर्व गोष्टींना दुसरी बाजू आहे. समजा, तुम्हाला एक जण म्हणाला, "का हो, तुम्ही शंभर वर्षं जगणार ना?" तुम्ही म्हणाल, "हो जगणार, पण!" हा 'पण' आला की गेलं! म्हणजे त्या उत्तराला दुसरी बाजू आली. मी अमक्या मुलीशी लग्न केलं तर सुखी होणारच ही खात्री आहे का? तिच्याशी जमलं तर सुखी होणार, नाही जमलं तर? तेव्हा हे शक्य आहे. जिथे दुसरी बाजू आहे तिथे ज्ञान नाही हे पक्कं लक्षात ठेवावं.
जिथे खरं प्रेम आहे ना, तिथे दुसरी बाजूच नाही! हे सगुणोपासनेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच अध्यात्मामध्ये ही दुसरी बाजू समूळ नाहीशी करण्यासाठी सत्पुरुषावर विश्वास ठेवावा लागतो. म्हणूनच ज्याला अज्ञान नाही अशाच माणसाला विचारवं लागतं. पुस्तकं वाचून परमार्थ साधत नाही याचं कारण हे आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या बुद्धीने पाहतो तेव्हा तिथे खरी श्रद्धा बसू शकत नाही. पण एखाद्या ज्ञानी माणसाने सांगितलं की हे असेच आहे, म्हणजे त्याचे काम होते; हे त्याचे मर्म आहे! म्हणूनच सद्गुरूंचे बोल हे साधकाला काळ्या दगडावरची रेघ झाली पाहिजे!

Thursday, April 2, 2015

अखंड नामानुसंधान म्हणजे खरी भक्ती!



श्रीराम. विषयाची आलेली ऊर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा. म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे; ते म्हणजे अनुसंधान!

हे औषध जरी चांगल्या डॉक्टर कडून घेतलं तरी रोग्याला काही पथ्ये सांभाळावीच लागतात. शास्त्राने, सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही! असे अखंड नामानुसंधान म्हणजे खरी भक्ती!

~ श्रीमहाराज 

Wednesday, April 1, 2015

सद्गुरूआज्ञा प्रमाणम् |


बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख झाली, की जीव आत्मसन्मुख होतो


श्रीराम. आत्मारामाच्या अखंड स्मरणात जगणे म्हणजेच समाधानरूप अवस्था आणि आत्मारामाला चिकटून राहता येईल असे मन तयार करणे हीच परमार्थसाधना होय. व्यक्तीमधील स्वयंप्रकाश साक्षी म्हणजेच स्वस्वरूप; तेथे मन सतत ठेवणे हेच स्वस्वरूपानुसंधान होय. ह्या अनुसंधानाचे पर्यवसान आत्मसाक्षात्कारात होते.
***बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख झाली, की जीव आत्मसन्मुख होतो***
यासाठी नामस्मरण महत्त्वाचे ठरते. हृदयस्थ भगवंताचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला अंतर्यात्रा म्हणतात. अनुसंधानामुळे विश्वऊर्जा शारदा अथवा कुंडलिनी जागृत होऊन स्थलकालांच्या चौकटी मोडून पडतात. अनुसंधानास लागणारे मनोबल सद्गुरूंच्या आज्ञापालनाने प्राप्त होते. अनुसंधानामुळे भक्त विश्वमनाशी समरस होतो व जीवपणाने न उरता भगवत्स्वरूप होतो. यासाठी नामस्मरणासारखा अनुभवसिद्ध उपाय नाही. स्वस्वरूपाच्या अशा अनुसंधानाने आत्मशांतीचा अतींद्रिय अनुभव येतो!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (अंतर्यात्रा)

रामरायाची नवरात्र दिवस ९ वा -- ||श्रीराम जय राम जय जय राम||


रामरायाची नवरात्र दिवस ८ वा -- ||श्रीराम जय राम जय जय राम||


रामरायाची नवरात्र दिवस ७ वा -- ||श्रीराम जय राम जय जय राम||


रामरायाची नवरात्र दिवस ६ वा -- ||श्रीराम जय राम जय जय राम||


रामरायाची नवरात्र दिवस ५ वा -- ||श्रीराम जय राम जय जय राम||


रामरायाची नवरात्र दिवस ४ था -- ||श्रीराम जय राम जय जय राम||