Translate

Monday, May 16, 2016

भक्तीतला निरोध!


श्रीराम. योगातील चित्त वृत्तींचा निरोध बऱ्याच झटापटीनंतर साधतो. भक्तीत मात्र हा निरोध सहज असतो! धरणामध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी अडवले तर धरणाची भिंत पडण्याचा धोका असतो. पण त्याच पाण्याला दुसरीकडे वाट काढून दिली तर तो धोका टळतो. तसा मनाचा प्रवाह भगवंताकडे वळवला तर कोणताही धोका न होता निरोध साधतो.
म्हणून सातव्या नारद भक्तिसूत्रात म्हटले आहे- सा न कामयमाना निरोधरूपत्वात्।- जेव्हा असा सहज निरोध भक्तिमुळे साधतो, तेव्हा विषयवासनांना आपोआप अटकाव बसतो. पराभक्ति वासनांना पोषक असूच शकत नाही! वासना आहे पण वासना जे तन्निष्ठ! महाराज म्हणायचे, पूर्वेकडे तोंड करून बसलेल्याला पश्चिमेकडे पाठ कर म्हणून सांगावं का लागतं? तसं परमभक्ति ज्याच्या हृदयात उत्पन्न झाली त्याला विषय सोड म्हणून सांगावं लागत नाही!

भक्त कुणाला म्हणावे?



भक्त म्हणजे -


१) भगवंताला वाहिलेली, 

२) भगवंताच्या अनुसंधानात मुरलेली, 
३) भगवंताच्या स्मरणात धुंद झालेली, 
४) भगवंताने व्यापलेली, 
५) वासना मेलेली, 
६) अहंकार व कर्तेपण जळलेली व 
७) भूतमात्रांशी विनम्र झालेली व्यक्ती होय .

~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताचे अनुसंधान- साधनेचा प्राण)

Wednesday, May 4, 2016

नवीन पुस्तके

श्रीराम. खालील पुस्तकांसाठी श्री अविनाश भाटे यांच्याशी संपर्क साधावा-- फोन नंबर खालील फोटोमध्ये दिलेला आहे. साधकांसाठी अतिशय मार्गदर्शक अशी पुस्तके आहेत.

Monday, February 8, 2016

आज परमपूज्य बाबांची जयंती!

🌺🌺🌺

 !!! नामप्रभात !!!
🌺🌺🌺

श्रीराम. ८ फेब्रूवारी १९०९. या पावन दिवशी जन्म झाला एका अध्यात्मसूर्याचा! परमपूज्य बाबा बेलसरे यांचा. आज त्यांची १०७ वी जयंती. स्वतःचे आयुष्य संपूर्णपणे सद्गुरूंच्या चरणी वाहिल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या नामसाधनेत निरंतर राहून कित्येक लोकांच्या आध्यात्मिक आयुष्याची पहाट करणारे पूज्य बाबा! आज त्यांच्या ‘आनंद-साधनेतील’ नामाबद्दलच्या प्रत्येक साधकाने हृदयाशी घट्ट जपाव्या अशा ओळी-

“भगवंताचे नाम ही ‘दिव्य संजीवनी’ आहे. जो तिचे सेवन करील, त्याच्या जीवनात आतबाहेर स्वस्थता निर्माण करण्याची जबाबदारी भगवंतावर आहे हे साधकाने विसरू नये.”

🌺🌺🌺
!!! श्रीराम समर्थ !!!
🌺🌺🌺

Sunday, October 4, 2015

ज्ञानेश्वरी अध्याय २- ओवी क्रमांक ५९-

ज्ञानेश्वरी अध्याय २- ओवी क्रमांक ५९-

तू गुरु बंधू पिता | तू आमुची इष्ट देवता |
तूचि सदा रक्षिता | आपदी आमुतें || ५९ ||

~ श्रीराम. (अर्जुन आपला सखा कृष्ण याला माझे हित काय आहे ते आता तूच सांग अशी विनवणी करतो, तेव्हा त्या सख्यत्वाच्या आधारावरची पुढील ओवी आणि त्यावरील पूज्य बाबांच्या विवरणाचा सारांश).

या ओवीतलं एकेक पद बघा. पहिल्यांदा अर्जुन कृष्णाला गुरु म्हणतो. गुरु म्हणजे तो ज्ञानी आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे जे शिकावयाचे ते तुझ्यापासूनच शिकावयाचे! हा देवाशी अथवा सत्पुरुषाशी संबंध आहे. नंतर बंधू- बंधू याचा अर्थ असा आहे की, मी खाली जात असताना मला वर नेणारा. दुसरा अर्थ श्रीमहाराजांनी सांगितला की, गुरुबंधू म्हणजे गुरूला काय आवडते ते सांगणारा! नेहमी असे असते की, जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतात ते आपल्या गुरुचं अंतःकरण लवकर ओळखतात. आणि त्यांना काय आवडते ते सांगू शकतात. ते आपल्याला गुरूंशी कसं वागावं हे शिकवतात. जे ज्ञान देतात ते गुरुबंधू. पिता चा अर्थ आहे- रक्षणकर्ता!

यामध्ये ‘तू आमुची इष्ट देवता’ हे फार महत्त्वाचे आहे. एकच देव! आपल्याला ते चमत्कारिक वाटते, पण भक्तीमध्ये प्रेमाची अतिशय एकाग्रता होण्याला हे आवश्यक आहे. तुलसीदासांची एक गोष्ट आहे. हे रामभक्त. त्यांना कुणी सांगितले की श्रीकृष्ण हा पूर्णावतार आणि त्याला १६ कला होत्या. राम हा मर्यादापुरुषोत्तम आणि त्याला ९ कला होत्या. तर त्या गृहस्थाचे म्हणणे असे की १६ कला असलेल्या श्रीकृष्णाची तुलसीदासांनी भक्ती करावी. तुलसीदास त्यावर म्हणाले, “मला रामामध्ये ९ कला आहेत हे माहीत देखील नव्हते. तेव्हा आता तू सांगितलेस तर माझी रामभक्ती ९ पट वाढेल! भक्ताच्या जीवनात अशी एक अवस्था येते, की त्याला दुसरा देव नाही!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)

Saturday, October 3, 2015

हेचि देवाचे दर्शन| चित्ती राहे समाधान ||

||श्रीराम समर्थ||


ज्ञानेश्वरी विचारधारा ४-

नाम घेत आहोत म्हणजेच योग्य मार्गावर आहोत!

श्रीराम.
~~ एक माणूस गिरणीच्या यंत्रशाळेत गेला. तिथे त्याचे उपरणे एका चाकात अडकले, तर हा हा म्हणता तो सर्वच त्यात ओढला गेला. तसे माणूस भगवंताचे नाम घेऊ लागल्यावर तो पोहोचतोच यात शंका नाही. त्याची जी खेच आहे, त्याला अभिक्रम म्हणतात.

~~ भगवंताचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही.

~~ आपली आतली घाण जेवढी असते ती नाहीशी करण्यास लागणारा प्रयत्न आपला होत नाही, म्हणून आपली प्रगती दिसत नाही.

~~ महाराज एकदा म्हणाले, "गाईने शेण टाकले की ते थोडीतरी माती घेतल्याशिवाय उठणार नाही. तसे तुम्ही थोडी जरी भक्ती केलीत तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तो परिणाम सूक्ष्मातला असल्याने कळणार नाही.

~~ प्रगती होत आहे की नाही हे लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला आपल्या मनानेच सांगितले पाहिजे की मी योग्य मार्गावर आहे.

~~ कबीराचे वाक्य नेहमी लक्षात ठेवावे- "कहत कबीरा सुन मेरे गुणिया | साहेब मिले सबुरी में ||" याला अरविंदांचे वाक्य फार सुंदर आहे, "You must have intense aspiration but with great patience." या पेशन्स चा अर्थ असा की मला मनाची शांतता पाहिजे यात शंका नाही पण ती तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला हवे तेव्हा मला दे. नाम घेतले की थोडक्या काळात साधू होईल असे कठीण आहे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)

ज्ञानेश्वरी विचारधारा ३-

नामस्मरणाच्या अभ्यासाला तळमळ आवश्यक;
तत्त्वज्ञानाचा उपयोग साधनेसाठी!

परमपूज्य बाबा बेलसरेंच्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेतील काही भागाचा सारांश -

ती. बाबा एकदा अगदी सहज बोलताना म्हणाले, "अरे, सामान्य माणूस आपली डिग्री मिळवण्यासाठीसुद्धा पद्धतशीर प्रयत्न करीत नाही; अभ्यासाची पद्धत किती जणांना माहीत असते? नामस्मरण हा एक जन्मभर चालणारा अभ्यास आहे याची जाणीव किती लोकांना असते? मग अर्धवटपणे केलेल्या नामस्मरणाने काय साध्य होईल?" अशा त्यांच्या काही सूचना वाचकांना कदाचित आवडणार नाहीत, कारण सत्य हे कटू असते आणि ते श्रोत्यांना ऐकायला आवडत नाही. पण, जे अप्रिय आहे, परंतु पथ्यकारक आहे, ते सांगणारा व ऐकणारा भेटणे दुर्लभ असते!

ज्ञानेश्वरीच्या दुसरा अध्याय आणि त्यावरचे ती. बाबांचे विवेचन याचा अभ्यास झाल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ती. बाबांना या सर्व विवेचनातून वाचकांना असे सांगावयाचे आहे की, या तत्त्वज्ञानाचा उपयोग केवळ आपल्या बुद्धीचे समाधान होण्यासाठी नसून त्याचा उपयोग आपले साधन अधिक दृढ व्हावे यासाठी केला पाहिजे. आपले साधन अधिक सातत्याने, चिकाटीने व नीट समजून केले तर ते अधिक फलदायी होईल. ती बाबा म्हणत, साधन हा एक अभ्यास आहे आणि तो जन्मभर चालणारा आहे.

माणूस पदवी मिळवण्यासाठी, नंतर व्यवसायात यश, पैसा ऐश्वर्य मिळावे म्हणून, समाजात मानमान्यता मिळावी म्हणून अभ्यास करतोच. याला Management of Objective असे म्हणतात. परमार्थाची साधना ही अशी नाही. ती कर्मयोगासारखी जास्त आहे.

***"हा अभ्यास सतत त्याच तीव्रतेने चालणे हेच त्याचे फळ आहे"***

महाराज म्हणत असत की, नामाने काय साधावे तर नामच साधावे!

ज्ञानेश्वरी विचारधारा २-

श्रीराम. आज तीन गोष्टी सांगतो तुम्हाला. या अगदी अनुभवाच्या आहेत. या गोष्टी झाल्या तर आपले भाग्य उदयाला आले असे समजावे!

१) हे अध्यात्म शास्त्र असे आहे, की ते एखाद्या व्यक्तीच्या तर्फेच रात्रंदिवस कानी पडावे; तरच हे साधते.

२) दुसरी गोष्ट अशी की स्वाभाविकच अनासक्त वृत्ती असावी. पैशाचे प्रेम फार नसावे, देहाचे प्रेम फार नसावे ही पुण्यायीचीच गोष्ट आहे.

३) आणि तिसरी गोष्ट ही की भगवंताचे स्मरण मला असावे ही स्वाभाविक तळमळ असावी.
या तीन पुण्यायीच्या गोष्टी आहेत. त्या जर अंगी आल्या तर पुण्य उदयाला आले असे समजावे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)

माझ्याकडून सद्गुरूंचा पराभव होऊ नये!


तुझिया मार्गे चालाया मनबुद्धि व्हावी स्थिर |

मागणे आता इतुकेचि देई आई दान || 


या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले!


(परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या एका प्रवचनाचा सारांश)-

श्रीराम. कॉलेज ला होतो तेव्हा दासबोध वाचताना समर्थांची "या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले" ही ओवी वाचली. तेव्हा फारसं कळत नव्हतं. वाटलं, समर्थ अतिशयोक्ती करताहेत. जर संसारात सुख नसतं तर इतके लोक संसारात पडले असते कशाला? पण आता जेव्हा गोंदवल्यास येतो आणि लोकांना भेटतो, तेव्हा कळतं, अरेरे! किती दुःख आहे जगामध्ये! केवळ प्रपंचामध्ये राहून 'पूर्ण सुखी' असा माणूस तुम्ही पाहिलाय का? शक्यच नाही!

अहो या विश्वात कितीतरी ध्येयं आहेत. दृश्यामध्ये ध्येयांची कमी नाही. अगदी स्वातंत्र्य मिळावं हे सुद्धा ध्येयच होतं ना? ध्येय मनुष्य कशासाठी ठरवतो; की त्या ध्येयाप्रत एकदा पोचल्यानंतर सुख समाधान मिळावं म्हणूनच ना? पण ते शक्य होतं का? आपण बघतोच आहोत. पण मग साधुसंत तर छातीला हात लावून सांगतात की आमच्याकडे साधन आहे सुख समाधान मिळवण्याचं? हे कसं?

तर जोवर आपण सुख समाधान दृश्यामध्ये शोधतो, तोवर ते मिळणं अशक्य आहे. जर मिळालं असं वाटत असेल, तर ते क्षणिक आहे. तेव्हा साधुसज्जनांनी सांगितलं, तुझं जे काही कर्म आहे, तेच तू कर. पण माझ्यासाठी किंवा माझ्या लोकांसाठी केलं म्हणू नकोस; ईश्वरासाठी केलं म्हण. जोवर कर्मात ईश्वर घातला नाही, तोवर कर्म पूर्ण होणारच नाही आणि जिथे पूर्णता नाही, तिथे समाधान असणं शक्य नाही!

तेव्हा समर्थांच्या ओवीचा अर्थ असा की जोवर मनुष्य ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाला लागला नाही, तोवर समाधान नाही नाही नाही!

ज्ञानेश्वरी विचारधारा १


श्रीराम. कोणताही ग्रंथ अतिशय पवित्रपणे वाचावा असे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात. पवित्रपणे म्हणजे बाहेरून देहानेच नव्हे, तर मनसुद्धा प्रपंचात नसावे. आणि हा नियम भगवंताच्या नामाला लागू करावा. आता मी नामाला बसतो म्हणजे प्रपंचाचा मी नाही, मनाने मी नाही, देहाने प्रपंचात राहावे लागेल, पण मनाने मी प्रपंचाचा नाही. असे म्हणून जर आपण नामाला बसलो, तर त्याची लज्जत काही निराळीच येईल.

याला दोन उपाय आहेत. एक आपण नेहमी आपल्या गुरूंचे चिंतन करावे, त्यांचे स्मरण करावे. त्यांचे स्मरण करावे म्हणजे काय तर त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते ते स्मरण करावे. हे जर फार सूक्ष्म वाटले तर त्यांच्या चरित्रातला आपल्याला आवडणारा भाग घ्यावा आणि त्याचे चिंतन करीत आपण भगवंताच्या नामाला बसावे. यांपैकी एक कोणतेही धरून नामाला बसावे. जे आपल्याला आवडते ते धरावे.

मी कशाकरता जगतो आहे तर भगवंताकरता ही भावना ठेवून आपण नाम घेतले, तर मनाची अवस्था तीच होईल!

~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)