भगवंताच्या स्मरणाची आपली शक्ती सूक्ष्म आहे. त्याउलट स्थूल आहे. साधनेने
सूक्ष्म झालेले आपले मन पुन्हा स्थूलात गेले की शक्तिपात झाला. यासाठी सगळ्यात
महत्त्वाचे असेल तर सबंध जग निर्दोष पाहायचे आहे, कारण जग परमात्म-स्वरूप आहे.
त्याउलट दोष पाहणे आहे. तेव्हा मी जर नामस्मरण करून निंदा केली तर शक्तिपात होतो.
तासभर जप केला, बाहेर येऊन दुसऱ्याच्या घराच्या भानगडीत लक्ष घातलं, जग कसं
बिघडलंय यावर चर्चा केली की तासभर केलेला जप हवा होऊन जातो. हे इतकं सूक्ष्म आहे
की आपल्या लक्षात येत नाही. परमात्मस्वरूपाला प्रेमाशिवाय काही चालत नाही.
त्यामुळे जर एखाद्याचा द्वेष केला, म्हणजे परमात्मस्वरूपाच्या उलट वागलो, साधनावर
पाणी पडलंच. हे कसं होतं—लहानपणी आपण काळ-काम-वेगाची गणितं शिकायचो. त्यात उदाहरण
असायचं- एक हौद आहे. त्याला वरून दोन तोट्या पाणी भरायच्या आहेत आणि खाली चार
तोट्या पाणी रिकामं करायच्या आहेत. म्हणजे जरी वर पाणी भरत असेल तरी खालून चार
तोट्या सोडल्यावर काय होईल सांगा? पाणी राहणार नाही; फक्त ओल राहील. त्याप्रमाणे
केलेला जप पूर्ण वाया जाणार नाही, पुढच्या वर्षी पुन्हा उत्सवाला जावं इतकी भावना
राहील पण याच्या पुढे जाणार नाही. हे कशासाठी समजून घ्यायचं? आपलं चुकतं कुठे हे
समजण्यासाठी! म्हणून निंदा केली, द्वेष केला, की गेलं सगळं. काळजी तर महाराजांना
अजिबात पसंत नव्हती. जो मनुष्य काळजी करतो, त्याच्या जवळ राहायला मला कष्ट होतात
असे ते म्हणत. कारण, काळजी म्हणजे परमात्मस्वरूपाविषयीच संशय आणि भीती. परमार्थाचं
मूळच जिथे निर्भय होण्यामध्ये आहे, तिथे काळजीला स्थान असेलच कसं?
असा आपला शक्तिपात सारखा होत असतो. खाऊ नये ते खाणं, वासना, दुसऱ्याचा द्वेष-
निंदा करणं, किंवा मोहाला बळी पडणं, या सगळ्या शक्तीपाताच्या तोट्या आहेत. म्हणून
साधकाला थोडसं व्रतस्थ राहणं जरूर आहे. आचरण सांभाळलंच पाहिजे. आपली वृत्ती इतकी
सात्विक, सरळ, निष्कपट, केल्याशिवाय हृदयात सद्गुरू किंवा भगवंत कसा साठणार?
श्रीराम जय राम जय जय राम
ReplyDelete